Friday, 23 May 2014

वयम् मोठम् खोटम्

मला वक्तृत्वाची आवड पहिल्यापासून होती. पण नाटकांची आवड मात्र ५वी पासून लागली.  त्याचं झालं असं, ५वी मध्ये असताना सगळ्यात पहिल्यांदा मी एकांकीकेमध्ये काम केलं.एकांकीकेचं नाव होतं, पु. ल. देशपांडे लिखित 'वयम् मोठम् खोटम्'.
तर झालं असं, ५वी आणि ६वी च्या सगळ्या तुकड्यांमधून नोटिस फिरली, सगळ्या विद्यार्थ्यांनींनी शाळा सुटल्यावर तळघरात जमावे. त्याप्रमाणे आम्ही सगळ्याजणी तळघरात जमलो. बाईंनी सगळ्यांना बालभारतीचं  पुस्तक काढून धडा वाचायला सांगितला. अगदी ५-५ ओळी वाचल्या प्रत्येकीने. मग आमच्यामधील काही जणींना घरी जायला सांगितले. आता आम्ही फक्त २०-२५ जणीचं राहिलो. मग बाईंनी आम्हाला एक पुस्तक दिलं आणि त्यातील एक पान वाचायला सांगितलं . माझं वाचून झाल्यावर मला बाजूला बसायला सांगितलं. अजून १-२ जणी पण माझ्याबरोबर होत्या. उरलेल्या मुलींपैकी ३-४ ना घरी जायला सांगुन , बाईंनी परत एकदा वाचन घेतलं. असा करत करत आम्ही ६जणीच राहिलो फक्त. बाईंनी सांगितलं , ' तुमची नाटकात निवडं झाली आहे. उद्या माझ्याकडे येवून प्रत्येकीने पुस्तक घेवून जायचं आहे'.
मी पळत पळतच घरी आले. याआधी एकांकीकेत कधीही काम केलं  नसल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. आईला पण खुप कौतुक वाटलं. दुसर्या दिवशी बाईंकडे जाऊन पुस्तक  घेवून आले आणि सगळ्यात आधी ते वाचून काढालं. मला कुणाचं कुणाच काम मिळणार माहिती नसल्यामुळे उत्सुकता खुप होती. सगळ्यात आधी वाचनाची तालीम सुरु झाली आणि कळलं कि मी मुख्य भूमिकेत असणार आहे, 'आजोबा' च्या. एकांकीकेची सुरवात आणि शेवट माझ्याच वाक्याने होणार होता.
रोजच्या रोज तालीम सुरु झाली आमची. शाळा सुटल्यावर तळघरात जमत असू आम्ही. दुसर्या  कुणालाही आम्ही काय करतो हे कळू नये म्हणून बाई खबरदारी घ्यायच्या. आमची एकांकीका होती ती मुख्याध्यापक संघाच्या स्पर्धेसाठी. इथे मुलाचं आणि मुलींचं अशा दोन एकांकीका जातात. आणि मुलींची एकांकीका बसवणाऱ्या बाई आणि मुलाची एकांकीका बसवणारे सर यांच्यात पण स्पर्धा असायची. म्हणून बाई खबरदारी घ्यायच्या. असो, बघता बघता आमची एकांकीका आकाराला यायला लागली. खूप मज्जा यायची त्यावेळी. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे आम्हा सगळ्यांना सगळी एकांकीका पाठ झाली होती. त्यामुळे कुणी कुठे चुकली तर बाकीच्या सगळ्या भूमिकेचं भान विसरून तिला तीच काय चुकलं याची आठवण करून द्यायच्या. बाई ओरडायच्या मग आम्हाला.
कधी कधी आम्हाला तळघर मिळायचं नाही तालीमीसाठी, मग बाई रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत आमची तालीम घ्यायच्या.
स्पर्धेचा दिवस जसजसा जवळ यायला लागला तशा आमच्या तालमी पूर्ण पूर्ण दिवस व्हायला लागल्या. एकदा असाच बाईंनी आमची एकांकीका ६वी च्या वर्गासमोर करायची ठरवली. आधी आमच्या मधल्या ६वी च्या मुली लाजल्या . पण एकदा एकांकीका सुरु झाल्यावर मात्र आम्ही सगळ्या भान विसरून गेलो. आणि, तेवढ्यात आमच्यामधली एकजण वाक्य विसरली. आम्ही  सगळ्यांनी तत्परतेने तिला आठवण करून दिली. समोर बसलेला प्रेक्षकवर्ग फिदीफिदी हसायला लागला. आणि आम्हाला कळलं काय झालं आहे ते. आमच्यात हिम्मतच न्हवती बाईंकडे बघायची. आता मात्र बाईंनी बजावलं आम्हाला. आम्ही पण हो हो म्हटलं .
आमची एकांकिका स्पर्धेत काहीही विघ्न न येता सादर झाली.  आणि, विशेष म्हणजे दुसर्या क्रमांकाने आम्ही ती स्पर्धा जिंकली पणं. मलापण पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळालं. काही  दिवसांनी बक्षीस समारंभ होता . मला बेबी शकुन्तालांच्या हस्ते बक्षीस मिळालं.
                        यामध्ये जी आजोबा आहे ती मी आहे . 
                                                     बेबी शाकुंतलाच्या हस्ते बक्षीस घेताना

याच नाटकाची अजून एक आठवण म्हणजे आमच्या शाळेच्या शिक्षक दिनी ज्याला आम्ही केळवकर दिन म्हणतो,  त्या दिवशी या एकांकिका सगळ्या मुलांपुढे  सादर करायच्या असतात . त्या वर्षी भालजी पेंढारकर आले होते. मला अजूनही लख्खं आठवतं, एकांकिका संपल्यावर त्यांनी मला बोलावून आशीर्वाद दिले होते.
त्यांनतर काय आपली जागा फ़िक्स झाली. दरवर्षी  असायचेच , अपवाद फक्त ६ वीं आणि ८ वी चा. ८वी मधे मी संगीत संशयकल्लोळ मध्ये 'फाल्गुनराव' च काम केलं होतं.
         संशयकल्लोळ मधला फाल्गुनराव 
         ९ वी मध्ये केलेले नाटकं . नाव विसरले आता :(


या एकांकिकेने खूप काही दिला मला. माझा आत्मविश्वास वाढवला, नाटकांची गोडी लागली , वाचनाची आवड निर्माण झाली , पाटील बाईंसारख्या बाई मिळाल्या. शाळेत नंतर जरी एकांकिकेत कामं केली तरी , 'वयम् मोठम् खोटम्' च्या  वेळेची मजा काही औरचं होती.

Wednesday, 21 May 2014

पाऊस

ढगाळ हवा, पाऊस नुकताच पडून गेलेला. मी अशीच बाल्कनी मधुन बाहेर बघत बसले होते . बाल्कनी मध्ये लावलेली झाड बघता बघता मन हरवु लागलं. नजरेसमोर छान हिरवाईने नटलेला डोंगर उभा राहिला . पाउस नुकताच पडून गेल्यामुळे हवा स्वच्छ आणि प्रसन्न होती , हवेमध्ये थंडावा होता . त्या डोंगराच्या पायथ्याशी उभी होते मी. मला त्या डोंगरावर चढायच होतं . डोंगरमाथ्यावर उभ्या असलेल्या एकुलत्या एक झाडाकडे जायचं होता मला.
 मी डोंगर चढायला सुरवात केली. पायाखालच्या मऊ गवताचा स्पर्श जाणवत होता , सुखावत होता. पावसाचेच दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवागार आहे , हवा थंड आहे आणि मन प्रसन्न आहे. डोंगरमाथ्यावरच ते झाड पण हिरवंगार आहे, मलाच बोलावत आहे. आणि मला मगं अचानक जाणवलं, माझ्याबरोबर कुणीतरी आहे, मला त्या झाडाजवळ घेवून जात आहे , माझ्या मनातले विचार त्याला बरोबर काळत आहेत, बोलायची गरज नाही , त्या निरव शांततेत तो माझ्या बरोबर आहे. मधूनच हलकासा शिडकावा करून वातावरण प्रसन्न करत आहे. माझा 'पाऊस' , माझा लाडका 'पाऊस'.
त्याच बरसणं बघताना कधीच कंटाळा येत नाही , तल्लीन व्हायला होतं.
असा असाल तरी संध्याकाळी भरून येणार आभाळ आणि बरसणारा पाऊस उदास करतो मला . कसलीतरी  अनामिक हुरहूर दाटून येते मनात. आणि अशा वेळी सोबतीला येतात ते गुलजारसाब , अशावेळी त्यांच्या पुखराज किंवा रात पश्मिने कि वाचताना तंद्री लागून जाते . कधी कधी बरोबर असतातं ते जगजीत सिंग, हरिहरन, यांचा आवाज कुठतरी हरवून टाकतो मला. एक वेगळाच वातावरण निर्माण होत माझ्याभोवती. शब्दात वर्णन न करता येणारं, ते अनुभवायलाच हवं.
हाच पाऊस जेव्हा सकाळपासुन सुरु होतो , तेव्हा मात्र प्रसन्न वाटतं. ऑफिसला मस्तपैकी दांडी मारून कुठतरी भटकावं असा वाटायला लावणारा हा पाऊस असतो. मस्तपैकी भटकावं आणि टपरी वर मिळणारा गरम गरम चहा आणि वडापाव हादडावा.
दुपारी पडणारा पाऊस मात्र वेगळचं काहीतरी सांगतो. बर्याच जणांना चादर घेवून झोपायला लावणारा हा दुपारचा पाऊस , मला मात्र त्याच्याबरोबर खेळायला बोलावत असतो. मनसोक्त भिजावं असा वाटायला लावतो या वेळेतला पाउस. संध्याकाळचा पाउस जसा उदास करतो तसा दुपारचा पाऊस करत नाही. तो उत्साहात बरसात राहतो , मनात सुद्धा.
रात्रीच्या वेळी पडणारा पाऊस मात्र झोपायला लावतो, एका लयीत पडणारे पावसाचे पाणी बघून , त्याचा पडण्याचा लयीतला आवाज ऐकुन छान झोप येते.
दिवसाच्या सगळ्या प्रहरातला पाउस जरी मला आवडत असला तरी २६ जुलै चा पाऊस आठवला कि अंगावर आजही काटा उभा राहतो . शर्वरीला पाळणाघरात सोडलं आणि मी ऑफिसला गेले.  त्यावेळी मी ठाण्यातच कॅडबरी फॅक्टरी मध्ये काम करत होते. उपेंद्र पण ऑफिसला गेला. घरी सुट्टीसाठी म्हणून आलेली अमृता आणि स्वामिनाथ (माझे चुलत भाऊ- बहिण ) होते. थोड्याचवेळात पाणी रस्त्यावर साठायला लागलं होतं. स्वामिनाथ लगेच शर्वरीच्या पाळणाघरात जाउन तिला घेवून आला . तो घेवून आला हे खूप बऱ झालं होतं, कारण नंतर तीचं पाळणाघर पूर्णपणे पाण्यात बुडलं. दुपारपर्यंत उपेंद्र पण घरी आला. त्यावेळी घरी फोन नव्हता. त्यामुळे मला काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यातच उपेंद्रच्या फोनची बॅटरी संपत आली होती , घरात लाईट नव्हती. ऑफिस मध्ये पण काही कळलं नव्हतं. शेवटी ४ वाजता कळलं कि जास्त पाऊस झाल्यामुळे मुख्य ऑफिस सोडलं आहे. मग आम्हीपण निघालो . आधीतर मला रिक्षा पण मिळायला तयार नव्हती. कसाबसा एक जण तयार झाला आणि त्याने कळवा नाक्यापाशी सोडलं . मी नेहेमीप्रमाणं घरी जायला शास्त्री नगर पाशी वळले आणि समोर समुद्र आला . १० फुटांवर जे पाणी जमा झालं होतं ते नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच होतं . जवळ जवळ सगळ्याच इमारतींचा पहिला मजला पाण्यात बुडाला होता . काठाशी काही लोक थांबले होते , त्यांनी सांगितलं,ताई , तुम्ही ठाण्यात जावा नाहीतर कुणातरी नातेवाईकाकडे जा , पण आम्ही तुम्हाला या पाण्यातून जाऊ देणार नाही . हे ऐकुन फक्त रडायची बाकी होते मी . डोळ्यासमोर शर्वरी होती , ती माझ्याशिवाय राहाणं शक्यचं नव्हतं. कसही करून मला घरी पोहोचायालाच हवं होतं . माझ्या पण मोबाईलची बॅटरी आता संपत आली होती . उपेन्द्रचा फोन लागत नव्हता. त्याला मेसेज पाठवला मी अशी अशी इथे उभी आहे म्हणून . माझ्या नशिबान त्याने फोन चेक करावा म्हणून सुरु केला आणि त्याला माझा मेसेज मिळाला.  तोपर्यंत अजून कुठूनतरी घरी जाता येईल का हे बघण्यासाठी मी निघाले तिथून . पण सगळ्या वाट बंद झाल्या होत्या . परत आले तर त्या छातीभर पाण्यातून येताना उपेंद्र दिसला . मी लगेच पुढे झाले . त्याने माझा हात धरला आणि आम्ही त्या पाण्यातून निघालो. हे वाहणार पाणी पुढं खाडीला जाऊन मिळत होतं . पाण्याला वेग होता . काही मुलांनी मधेच एक रस्सी बांधली होती . तिला धरून आम्ही निघालो . माझ्या गळ्यापर्यंत पाणी येत होतं. हातातली पर्स वरती धरली होती. एकदा पाय पण सटकला माझा , उपेंद्रने धरले होते म्हणून बरे . शेवटी घरी आलो, लेकरू माझी वाटं बघत होतं . स्वामिनाथ पण घाबरला होता. आम्ही सगळे घरी सुखरूप होतो.  रात्रीतून इमारतीच्या शेजारून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज धडकी भरवत होता. त्या रात्री बहुतेक कुणी झोपलचं नाही . मधेच एक गाडी वहात येताना दिसली . तशा त्या पाण्यातच काही मुलं खाली उतरली आणि त्यांनी ती गाडी रस्त्यात बांधलेल्या दोरीने एका बाजूला बांधून ठेवली .  घरात लाईट नाही, पाणी नाही असे दोन दिवस काढले. नंतर त्या पावसाने केलेला हाहाकार समजला. आम्ही खरच नशीबवान ठरलो होतो.

Tuesday, 20 May 2014

लोकल चा प्रवास

कोल्हापूर सारख्या छोट्या शहरातुन मी जेव्हा कळव्याला राहायला आले, तेव्हा भांबावून गेले होते. रुजलेलं रोपट नवीन जागेत लावल्यावर सुरवातीला जसा मरगळतं , तशी अवस्था झाली होती. मुंबई तशी अनोळखी कधीच न्हवती. सिनेमापेक्षा व. पुं. च्या पुस्तकामधून मुंबईतील पाळणारा माणूस जास्त भेटला होता. एकीकडे सगळ्यांनी घातलेली भीती आणि दुसरीकडे व पुं च्या पुस्तकामधून दिसलेली माणुसकी . कसा मेळ घालणार होते देव जाणे.
अगदी सुरवातीच्या दिवसातली गोष्ट आहे. आम्हाला बांद्र्याला जायचं होतं. मी नवीनच असल्यामुळे मला लोकल मध्ये कितपत चढायला मिळेल असा वाटून उपेंद्रने एस. टी. ने जायचे ठरवलं . त्याप्रमाणे आम्ही मुलुंड पूर्वेला जाउन एस. टी.  पकडली. नॉर्मली जिथे पोहोचायला जास्तीत जास्त एक तास लागतो, तिथे आम्ही अडीच तासाने पोहोचलो. मी एस टी मध्ये खिडकी शेजारी बसले होते. याधी दोन वेळा मी मुंबई मध्ये येवून गेले होते पण त्याला फार वर्ष झाली होती . आधीच मला काही आठवण शक्य पण न्हवत. लहान मुल जसा नवीन खेळणं मिळालं कि तहान भूक विसरतं, तसा काहीसं शाल होत माझं. मी खिडकीबाहेरच बघत होते आणि तेवढ्यात मोठ्या आवाजात अचानक सुरु झालेल्या भांडणान तंद्री मोडली माझी. कंडक्टर आणि एक प्रवासी याच चांगलाच जुंपल होतं . प्रवाश्याकडे सुट्टे पैसे न्हवते आणि कंडक्टर कडे पण न्हवते. त्यावरून अगदी भ च्या बाराखडीतल्या शिव्या देवून दोघा पण भांडत होते. त्या कंडक्टर ने त्याला उतरून दिले. मी बघतच बसले. बापरे! कोल्हापूर मध्ये राहून पण पुर्णपणे ब्राह्मणी संस्कृतीत वाढलेल्या मला असा काही ऐकायची सवय न्हवति. खूप घाबरले होते त्यावेळी.
आता मात्र सगळ्याची सवय झाली आहे. लोक शिव्या  देतात , हमारी तुमरीवर येतात पण तेवढ्यापुरतेच . नंतर सगळं शांत असतं. अशा या मुंबईच्या आठवणी मात्र खूप आहेत. खूप काही शिकवलं हिने . सुरवातीला लोकल ने प्रवास करायला घाबरणारी मी नंतर मात्र सर्रास फिरू लागले. खूप वेगवेगळे अनुभव आले . सुरवातीच्या काळात आम्ही व्ही टी ला गेलो होतो, कशासाठी ते आठवत नाही आता. परत येताना उपेंद्रने मला लेडीज डब्यात बसवलं  आणि तो जेन्ट्स डब्यात शिरला. माझा पहिला लोकल प्रवास होता तो. ठाण्याला आपल्याला उतरायचं आहे असा त्याने सांगितलं मला. आणि माझ्या आजूबाजूच्या बायकांना सांगितला हिला ठाणं आल कि सांगा . त्या पण बायकांनी हो म्हणून सांगितलं . नंतर त्यांनी विचारलं पहिल्यांदा आली आहेस का? मी मानेनच हो म्हटलं. मला त्यांना उत्तर द्यायची पण भीती वाटत होती. आता आठवल कि जाम हसु येतं.
त्यानंतर काही दिवसांनी मी नोकरी करू लागले आणि लोकाल चा प्रवास माझ्या अंगवळणी पडला. मुंबई मधली माणुसकी बघायची असेल तर ती तुम्हाला लोकल मध्ये नक्की दिसेल. लहान मुल घेवून चढणाऱ्या बायकांच्या मुलांना मांडीवर घेण्यात दिसेल, गरोदर बाईला किंवा एखाद्या आज्जीला बसायला जागा मोकळी करून देण्यात असेल, कुणाला चक्कर आली तर पाण्याच्या बाटल्या पुढे होतातच पण चोकलेट आणि गोळ्या पण पुढे येतात.
असाच एकदा ऑफिस मधल ऑडीट च काम उशिरा संपवून येताना , दादर ला एक भिकारिण  चढली. बरोबर ९-१० महिन्याची मुलगी होती. मुलगी मोठी गोड होती. तहान लागली होती त्या छोटीला. तिने कुरकुर करायला सुरवात केली. गाडीत आम्ही ५-६ जणीच होतो. कुणाकडेच पाणी न्हवतं. ती भिकारीण थोडी वेडी पण असावी. एकटीच मोठ्यामोठ्याने बडबडत पण होती. गाडी कांजूर ला थांबली आणि हि त्या मुलीला सोडून खाली उतरली, पाणी आणायला. आणि गाडी सुटली . आम्हाला कुणालाच कळेना काय कराव ते. गाडीत पोलिस होता त्याला सगळ्यांनी सांगून बघितलं, अहो गाडी थांबवा. पण तो म्हणाला , नाही , गाडी कशाला थांबवायची? मी ठाण्याला उतरणार आहे , तिथ या मुलीला आश्रमात सोडतो , तसा पण ती भिकारीण कुठ सांभाळणार आहे? त्याच्या बोलण्यावर आम्ही चुटपूटात गप्प बसलो. गाडी ठाणे स्टेशन ला आल्यावर तो पोलीस त्या मुलीला घेवून गेला. झालं ते बरोबर झालं नाही असा वाटून हि गोष्ट  मनाला खुप लागुन राहिली.
अशा या लोकल प्रवासात एकदा मोबिले हरवून झाला आहे माझा, एकदा सोन्याच ब्रेसलेट पण. काहीही असाल तरी लोकल चा प्रवास मला आवडतो . तो नुसताच प्रवास नसतो तर एक जाणीव असते, लोकांच्या जगण्याची. 

Friday, 16 May 2014

मे महिन्याच्या आठवणी -२

      मी महिन्याच्या सुट्टीत बेळगावला काकाकडे जाण्याचा आमचा शिरस्ता होता. आम्ही सगळी मिळुन ८-१० भावंड असायचो. सगळे मिळुन धमाल करत असुं. पण खरी मजा यायची ती रात्रीच्या वेळी वीज गेल्यावर. त्यावेळी रॉकेल चे दिवे वापरले जायचे. ते पण घरी केलेले. औषधाच्या बाटलीत रॉकेल भरायचं, त्याच्या झाकणाला भोक पडायचं, त्यात कापडाची चिंधी घालायची वात म्हणून, झाला दिवा तयार.
      तर असा हा दिवा मध्यभागी तेह्वून आम्ही सगळे कोंडाळं करून बसलेलो असयचो. गप्पा सुरु असायच्या आणि मधेच माझ्या भावाला हुक्की यायची , ती भुताच्या गोष्टी सांगायची. माझा भाऊ प्रचंड खोडकर होता आणि गप्पिष्ट पण. त्याची आवडती गोष्ट होती एक, बरेचदा तीच सांगायचा, चांगला घोळवून घोळवून सांगायचा.
     तर गोष्ट अशी होती , एका गावाबाहेर एक घर होतं. त्या घरात आई आणि मुलगी, दोघीच राहायच्या . त्या घराला मागे एक अंगण होतं, आणि अंगणात एक वडाच झाड  होतं. त्या मुलीच्या आईने , मुलीला सांगितलं होता कि अंगणात कधीही जायचं नाही. ती मुलगी पण आईच ऐकायची . पण तिला उत्सुकता खूप होती.
     एकदा काय झालं? आईला जायचं होत बाजारात म्हणून ती मुलीला म्हणाली , "मी बाजारात जाउन येते . पण तू अंगणात मात्र जाऊ नको . आणि दार खिडक्या नीट लावून घे." मुलीला मनातून खूप आनंद झाला. ती होहो म्हणाली . जशी आई बाहेर पडली तशी हि अंगणात गेली . बघते तो काय , त्या वडाच्या झाडावर एक बाई बसलेली होती, ती तिच्याकडे बघत तिला ये,ये म्हणत होती (इथ त्याचा आवाज एकदम खर्जातला होवून जायचा , आणि आमच्या मध्ये भीती शिरायला लागलेली असायची ). तिला खूप भीती वाटली . ती पळत घरी आली आणि सगळी दारं घट्ट  लावून घेवून बसली.
      एवढ्यात पुढच्या दारावर टकटक झाली (इथ आमच्या कपाळावर घाम यायला सुरवात ). त्या मुलीने घाबरतच विचरला, "क…. क… कोण आहे?" "अगं मी आहे, आई तुझी, दार उघड". हुश्श म्हणत दरवाजा उघडला तिने . आईच होती समोर (इथे आम्ही पण लगेच हुश्श… ) . तेवढ्यात तीच लक्ष आईच्या पायाकडे गेलं , बघते तो काय! आईचे पाय उलटे (आम्ही जबरदस्त घाबरलेलो ). "आई , आई , पाय कसे गं उलटे झाले तुझे ? ". आई हसून म्हणाली ' अगं , मी बाजारात जायला निघाले होते नं , तेवढ्यात वादळ आलं. मी वळले घराकडं पण पाय मात्र बाजाराकडेच निघाले, म्हणून उलटे झाले गं ". (भीती आता पोटात शिरलेली असायची). "आई , आई, तू नाही म्हणतेस , पण मी आज मागच्या अंगणात गेले होते. तिथे वडाच्या झाडावर एक बाई बसलेली बघितली. पांढरी शुभ्र साडी , पांढरे केस, लाल लाल ओठ, कपाळावर भलं मोठा कुंकू, उलटे पाय. आणि आई ती मला हात लांब करून बोलावत होती . कोण आहे ग ती ?". इथे आमचा आवंढा गळ्यात अडकलेला असायचा. माझा भाऊ एक क्षण थांबायचा आणि झटक्यात हाताचे पंजे पसरून , डोळे मोठे करत आमच्या अंगावर येत "मीच ती" म्हणून असा ओरडायचा कि आम्ही समोर बसलेले सगळे किंचाळायला लागायचो. आणि हा मात्र फिदीफिदी हसत बसायचा.
 आणि मगं जे गोष्टींच पेव फुटायचं , अक्षरश: चढाओढीने गोष्टी सांगितल्या जायच्या. गोष्टी सांगताना आवेशात आलेले आम्ही सगळेजण झोपताना मात्र मध्ये झोपायचो.

Thursday, 15 May 2014

पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव

         बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
          गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून?
            यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते.
           गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा  ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
  यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.