Thursday, 26 June 2014

लहानपणीची अजून एक आठवण

लहानपणीची अजून एक आठवण म्हणजे माझा झालेला अक्सिडेंट. दचकु नका असे , फार मोठा नाही , छोट्टासा . खूप धडपडी असल्याने असे छोटे मोठे प्रसंग बरेचदा आलेत. तर झालं असं कि मी आणि माझी वाड्यात राहणारी मैत्रीण प्रिया (वय वर्षे ६) कशावरून तरी भांडलो होतो आणि म्हणून बोलत नव्हतो , सकाळपासुन. साधारण ४ च्या सुमाराला ढोल आणि फटाक्यांचा आवाज ऐकू आला तशी मी वाड्याच्या बाहेर येवुन दारात उभी राहिले. असेन साधारण ५ वर्षांची . शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम सुरु होता निवृत्ती चौकात (त्याला अर्धा शिवाजी पुतळा पण म्हणतात , कारण तिथे बसवलेला महाराजांचा पुतळा अर्धा आहे ), म्हणजे घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर. तोच आवाज ऐकुन प्रिया पण बाहेर आली. पण बोलायचं नव्हतं ना ? आता काय करायचं ? थोडा वेळ आम्ही दोघी पण एकमेकींकडे न बघता कार्यक्रम सुरु होता तिकडे बघत होतो . फटक्यांमध्ये मधेच एक बॉम्ब फुटला आणि आम्ही दोघी पण दचकलो . दोघींना पण कळलं कि आपण दचकलो , मग जी हसायला सुरवात झाली त्यात सकाळचा अबोला कुठल्याकुठे गेला . दोघींनी पण ढोल वाजवत होते तिथे जायचं ठरवलं. तिकडे जायचं तर समोरचा रस्ता ओलांडावा लागला असता. म्हणून मग आम्ही एकमेकींचे हात धरले आणि निघालो , जवळ जवळ पळतच . आणि तेवढ्यात एक ब्रेक चा करकचून आवाज आला आणि काही कळायच्या आत मी आणि प्रिया रस्त्यावर पडलो . आजूबाजूचे लोक गोळा झाले .आम्ही खूप घाबरलो होतो . त्यामुळं धड उठता पण येत नव्हतं . वाड्या समोर असणाऱ्या दुकानदारांनी आम्हा दोघींना उचललं आणि घरी नेलं . घरी नशिबान कुणी ओरडलं नाही . तसंपण फारसं लागल नव्हतंच . पण लाड मात्र खूप झाले . प्रियाच्या आईने आम्हाला गरम गरम तूप मेतकुट भात खायला घातला होता . अर्थात . त्यात पण माझ आणि प्रियाच सुरु होतंच , कुणाला जास्त लागल आहे यावरून . दोघींना पण वाटत होता कि आपल्याला जास्त लागल आहे .
त्यावेळी भीती हा प्रकारच माहिती नव्हता . आमचा वाडा म्हणजे मध्ये अंगण आणि दोन्हीबाजूला खोल्या . तसाच समोरच्या ज्या दोन बाजूच्या खोल्या होत्या त्यावर आजीचा शिवण क्लास ची खोली होती . त्याच्या बाजूला अजून एक खोली आणि तिला काटकोनात अजून एक खोली होती , ती स्वंयपाकघराच्या वरती होती . आजीच्या स्वयंपाक घराच्या मागे न्हाणी होती आणि त्याच्यामागे परत अंगण होतं . त्या अंगणापलीकडे अजून दोन खोल्या , आणि समोर दोन खोल्या . मला खोड होती , आजोबा झोपले आहेत असा बघून मी अंगणात ठेवलेल्या दगडांच्या राशीवरून , न्हाणीच्या पत्र्यावर चढायचे आणि तेथून वर स्वयंपाक खोलीच्या वरच्या खोलीच्या पत्र्यावर . तो पत्रा दोन बाजुनी उतरता होता. त्याच्या टोकावर जाऊन , डोक बाहेर काढून , रस्त्यावरून येणारी जाणारी वाहनं बघत बसणं मला आवडायचं . मला तशी बघून समोरच्या तरुण मंडळाची मुलं , आजोबांकडे सांगायला यायची . आजोबा चिडून यायचे , ओरडून मला खाली उतरायला लावायचे . मी उतरायचे आणि धूम ठोकायचे . परत दुसर्या दिवशी तोच उद्योग.
फक्त एकदा हे सगळ परत अनुभवायचं आहे . आता सगळंच स्वप्नवत वाटतं . 

Tuesday, 24 June 2014

लहानपणीची आठवण

          आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणाच्या काही आठवणी कधीच विसरल्या जात नाही. खूप आनंदाच्या किंवा खूप दुःखाच्या आठवणी लक्षात असतात असा काही नाही . पण मनात कोरल्या गेलेल्या असतात . त्यातल्याच काही म्हणजे आजारी असतानाच्या  किंवा खूप लागला वगैरे असतानाच्या आठवणी . या आठवणी लक्षात राहाण्याच मुख्य कारण म्हणजे त्यावेळी झालेले खूपसारे लाड . एरवी कोण करत हो असे लाड? धम्मक लाडु आणि चापट पोळी खाण्याचे दिवस ते . तर असो , एवढ पाल्हाळ पुरे झालं.
          लहानपणी खुप धडपडी होते मी . त्यामुळं सततं पडणं आणि लागणं तर ठरलेलं असायचं. त्याचीच आठवण येतेय आत्ता . साधारण ३-४ वर्षाची असताना मी आणि केदार (माझा भाऊ ) आम्ही फुग्याने खेळत होतो . ते नाही का मोठे फुगे येतात ?? गोल , सफरचंदासारखे ? त्या तशा फुग्याने खेळत होतो आम्ही , ते पण कॉट वरती, उभेराहुन. आपण बॅडमिंटन खेळतो ना तसे . संध्याकाळची वेळ होती . त्याचवेळी आज्जी (आईची आई) आल्यामुळे आई तिथेच उभी राहून तिच्याशी गप्पा मारत होती. आणि त्याचेवेळी एकदम लाईट गेली . त्याचवेळी केदार ने फुगा माझ्या बाजूला मारला तो तिरका गेला. आणि मी खेळायच्या नादात त्या फुग्याला मारायला गेले आणि कॉट संपला आहे हे लक्षातच आलं नाही. दाणकन हातावर पडले . मला काय झालं ते कळलचं नाही . खूप रडले होते एवढंच आठवतंय. रात्रभर हात खूप दुखत होता आणि ने शेकला , बाम वगैरे लावला. या सगळ्या गोंधळात बाबा नव्हते , ते सकाळी आले . आल्या आल्या त्यांना झालेला गोंधळ कळला आणि मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो . हाताला प्लास्टर घातलं आणि ते जवळ जवळ १५ दिवस तसंच होतं . पण त्या काळात जी काय बडदास्त होती , अहाहा , ती काय विचारावी .
आईच्या नोकरीमुळे आजी -आजोबा जो पर्यंत होते तो पर्यंत दिवसभर आम्ही त्यांच्याकडे असायचो . त्यांचा वाडा होता . आणि वाड्यात २-३ बिर्हाड होती . आम्ही सगळे मिळून ५-६ जण असायचो . धमाल यायची खेळायला . खूप मस्ती सुरु असायची . असाच एकदा खेळत असताना, केदार जोरात पडला आणि त्याच्या गुडघ्याला लागलं. खूप जोरात आपटल्यामुळ लागलं पण तसचं होतं . आता जर आजी-आजोबांना कळलं तर आपली काही खैर नाही असा वाटून रडूच यायला लागलं . मी ४ वर्षांची आणि केदार ६ वर्षाचा असेल . त्याला ३ चाकी सायकल घेतलेली होती , डब्बल सीट . माझ्या डोक्यात काय आल कुणास ठाऊक , मी म्हटलं आपण डॉक्टर काकांकडे जाऊ (आमचे फमिली डॉक्टर होते , डॉक्टर माळी म्हणून ), तू मागे बैस आणि मी सायकल चालवते. तो पण तयार झाला . त्याला मागे बसवून मी त्याला डॉक्टर काकांच्याकडे घेवून गेले , साधारण ३-४ कि. मी . अंतर असेल . तिथे पोहोचल्यावर मी खाली थांबले (दवाखाना पहिल्या मजल्यावर होता ) , कारण सायकल कुणीतरी घेवून जाइल अशी भीती वाटत होती . त्याला एकट्याला आलेलं बघून डॉक्टर काकांना खूप आश्चर्य वाटलं . त्यांनी सगळी चौकशी केली . आम्ही दोघेच त्या सायकल वरून आलो आहे यावर आधी त्यांचा विश्वासच नाही बसला. ते लगेच खाली उतरून आले. मला सायकल पाशी बघून त्यांचा विश्वास बसला . मला नि सायकलीला ते वरती घेवून गेले . केदार च ड्रेसिंग झालं , डॉक्टर काकुंनी काहीतरी खाऊ दिला खायला . आणि काका त्यांच्या स्कूटर वरून आम्हाला सोडायला आले . आता आश्चर्य करायची पाळी आजोबांची होती . डॉक्टर काकांनी जे झालं होतं ते सगळं सांगितलं . ओरडण तर सोडाच , आजोबाना खूप कौतुक वाटलं होतं , त्यामुळ संध्याकाळी आईपुढ खूप कौतुक झालं आणि आईस्क्रीम पण मिळालं .

Monday, 23 June 2014

"रविवारची सकाळ "

कधी अळासावलेली तर कधी उत्साहानं भरलेली
कधी कान्देपोह्याची तर कधी डोश्याची
कधी गडावरची तर कधी कळसुबाई शिखरावरची
कधी रामायण बघणारी तर कधी कार्टून बघणारी
कधी प्रेमान भरलेली तर कधी रुद्रावतार धारण केलेली
कधी चहाच्या कपात बुडालेली तर कधी कॉफ्फी च्या वासानं दरवळलेली
कधी पांघरुणात गुरफटलेली तर कधी जोग्गिंग साठी तयार झालेली
कधी देवळाच्या समोर रांग लावणारी तर कधी भाजीवाल्या समोर जाउन उभी राहणारी
कधी सुट्टीच्या मुड मध्ये असणारी तर कधी आठवडयाच ऑफिसच प्लानिंग करणारी
कधी अभंग वाणी मध्ये रमणारी तर कधी 'रंगोली' ऐकणारी
कधी वाफाळता चहाचा कप हातात देवून आश्चर्य चकित करणारी तर कधी कामाचा ढीग उपसणारी
कधी पेपर मध्ये बुडालेली तर कधी कॉम्पुटर मध्ये मान घालून बसलेली
कधी कोवळ्या उन्हान न्हायलेली तर कधी धुक्यामध्ये गुरफटलेली
कधी पावसामुळ गढूळलेली तर कधी नुकताच पाउस पडून गेल्यामुळं स्वच्छ झालेली
कधी नव्या पालवीमुळे उत्साहित झालेली तर कधी झाडाच्या पडण्याने व्यथित झालेली
अशी हि "रविवारची सकाळ ", शांत, शांत… अक्ख्या जगाची शांतता घेवून आलेली


Saturday, 21 June 2014

मार्जार प्रेम

आमची मांजरं , खरतरं या विषयावर लिहीण्यासारख खूप आहे. कारण, माझ्या आईला मांजरांची आवड भरपूर आणि आमच्या बोळात बेवारशी मांजरांची पिल्लं आणुन सोडणारे पण भरपुर. अशा या पिल्लांसाठी आमच्या घरात खासचं जागा. कधी कधी तर एकाच वेळी ४-५ मांजर नक्की असायची. भूक लागली कि घरात नुसता गोंधळ घालायची .
बाबांचाही फक्त वैतागले नसले तर या गोष्टीला आक्षेप असायचा नाही.ते स्वतः सकाळी उठल्या उठल्या या मांजराना दुध घालायचे. अशीच एक बोळात सोडलेली मांजरी  होती . जेव्हा सोडली तेव्हा ते लहान पिल्लू होतं. तिला खूप कळायचं असा माझं प्रामाणिक मत आहे. तसा ती जाणवून पण द्यायची. एकदा ती शिवणाच्या मशीन च्या मागे झोपली होती. ती पलीकडच्या बाजूला असल्यामुळे दिसत न्हवती. बाबा गावहून  आले होते आणि नेहमीप्रमाणे ओरडत होते ," किती पसारा आहे हा?, कुणाला आवरायला नको ," वगैरे वगैरे. त्यातच ते पटकन बोलून गेले ," त्यात तुमची हि मांजरं , सगळीकडे घाण करुन ठेवतात", त्याचं हे वाक्य पुरा व्हायच्या आत हि बया मशिनच्या मागून उठली आणि बाबांच्या कडे बघून जोरात 'म्यावं, म्यावं' करायला लागली . आधी बाबा दचकले आणि माग जे हसायला लागले, पुढच सगळ बोलायचचं विसरले. या मनीच नाव मी 'खुळाबाई' ठेवलं होतं . ती खुळीच होती. तिला पिल्लं झाल्यावर त्यांच्याकड जायचीच नाही ही. त्यांना दुध घालून जगवायचा खूप प्रयत्न केला , पण ती जगलीच नाहीत . आणि हि खुळी पण.
बरेचदा, आमच्याकडे येणारी मांजरं आजारी असायची , त्यांना डॉक्टर कडे घेवून जाण , औषधपाणी करणं वगैरे सगळ करूनसुद्धा काही वेळा हि पिल्लं मारून जायची , खूप वाईट वाटायचं अशावेळी . जे कुणी त्यांना असा सोडून गेलं असेल अशा लोकांचा खूप राग यायचा इतकं आजारी पडेपर्यंत ठेवायचं कशाला ? मुळात आधी सांभाळता येत नाही तर सांभाळू नये असा वाटायचं .
या सगळ्या मांजरांबरोबर आमच्या घरी आमचा पमेरिअन क्रॉस असा कुत्रा पण होता. त्याचं नाव होतं "चिट्ट्या". नेहेमीपेक्षा वेगळ काहीतरी हंव म्हणून ठेवलेलं . त्याच्याबद्दल, परत कधीतरी . तर तो लहान असताना , नुसता कापसाचा गोळा होता, काळा -पांढरा. घरी येणाऱ्या लोकांना आमच्यातल्या मांजरांची सवय होती. आमच्या घरात मांजर असणार हे पक्कच असायचं.असेच एकदा बाबांचे मामेभाऊ आमच्या घरी आले होते , पलंगावर बसले होते आणि चिट्ट्या त्यांच्यापुढून धावत गेला , त्यांना नीट दिसला नसावा तो, ते म्हणाले ,"व्यंका (बाबांचं नाव व्यंकटेश आहे), काय रे ? तुमच मांजर कुत्र्यासारखं कसा दिसतंय?" हसून हसून आमची वाट लागली होती .
आता मात्र एकाच मांजरी आहे आईकडे , आणि विशेष म्हणजे हे मांजरीच वेड शर्वरी मध्ये पण उतरलं आहे . त्यामुळे हि मांजरी तिची खूप आवडती आहे . सुट्टीसाठी कोल्हापूर ला गेली कि तिच्या खणायची सगळी जबाबदारी शर्वरी वरच असते . मध्ये ७-८ दिवस नाहीशी झाली होती हि , तर शर्वरीचा जीव वर खाली होत होता . रोज ३-४ वेळा तरी तीच नाव काढल्याशिवाय राहत न्हवती ती . ती परत आल्यावर , तिला कुठं ठेवू आणि कुठं नको असा झालं होतं तिला.


Friday, 20 June 2014

पंढरीची वारी

आषाढ जसंजसा  यायला लागतो तसतशी ओढ लागते ती वारीची . मी अजून एकदाही वारी केली नाहीये . पण इच्छा मात्र खूप आहे . वारकर्यांच्या बरोबर जाउन फक्त एकदा तरी वारी करायची आहे. त्यांची भक्ती , त्यांच विठ्ठलाशी समर्पित असणं , एकमेकांना 'माउली' म्हणून पायाला हात लावून नमस्कार करणं , सगळं सगळं अनुभवायचं आहे . त्यांच्या बरोबर रांगेत उभ राहून विठ्ठलाच गोजिरवाणं रूप बघायचं आहे.
आपली संत परंपरा खूप मोठी आहे .सगळे संत पंढरपूरच्या विठ्ठालाच्या पायाशी जमा झाले , त्याच्या भक्तीमध्ये बुडाले.
विठ्ठलाच्या पायाशी लीन होताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ,
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।तेणें मज लावियला वेधु ।खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।हें तंव कैसेंनि गमे ।परेहि परतें बोलणें खुंटलें ।वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।उभाचि स्वयंभु असे ।समोर कीं पाठिमोरा न कळे ।ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।म्हणवूनि स्फुरताती बाहो ।क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।आसावला जीव राहो ॥५॥
तर तुकाराम महाराज म्हणतात 
आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु
हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥
आम्हां धातु विठ्ठल मातु विठ्ठलुगातु विठ्ठलु आनंदे ॥२॥
आम्हां राग विठ्ठलु रंग विठ्ठलुसंग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥
आम्हां ताल विठ्ठलु मेल विठ्ठलुकल्लोळ विठ्ठलु कीर्तने ॥४॥
आम्हां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलुमत्ता विठ्ठलु वदनी ॥५॥
आम्हां मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलुएका जनार्दनी अवघा विठ्ठलु ॥६॥

एका लेखामध्ये स्मिता तळवलकर यांनी लिहीलं होतं , कि वारकर्यांचा विठ्ठल नामाचा गजर जेव्हा टिपेला जातो तेव्हा मंदिराचे कळस पण डोलतात . त्या गेल्या होत्या हे खरा आहे का बघायला . नक्की आठवत नाही पुढच मला , पण वातावरण एवढ विठ्ठल नामानं भारलेलं असतं कि ते कळस डोलताना दिसतात असा काहीसं लिहिलं होत त्यांनी .  
हे सगळं अनुभवायचं आहे , एकदा तरी वारी ला जायचं आहे .