Monday, 28 July 2014

श्रावण सोमवार

आज श्रावणातील पहिला सोमवार . उपवासाचा सोमवार , असा म्हणायचं कारण कि माझ्या लक्षात तो तसाच आहे . आता मी उपवास वगैरे काही करत नाही पण श्रावणातील सोमवार म्हटलं कि मला हेच आठवतं .

शाळेत असताना मला श्रावण सोमवार खूप आवडायचे. सकाळपासूनच काहीतरी वेगळ आहे हे जाणवत राहायचं . खूप छान वाटायचं , उगाचच. आईला जेवण बनवायचं नसल्यामुळे तर जास्तच छान वाटायचं . तिच्या भोवती भोवती करत राहायचे मग मी. ती पण  ओरडायची नाही अशा वेळी.  आम्ही कर्नाटकी ब्राह्मण म्हणजे सीमेवरचे , आमच्यात उपवासाला हळद न घालता केलेलं दडपे पोहे , शिरा किंवा कांदा आणि हळद न घालता केलेले उप्पीट चालतं. त्यामुळे त्यादिवशी सकाळी नेहमीच्या पोळी - भाजी ऐवजी असा काहीतरी असायचं आणि बरोबर साबुदाण्याची खिचडी वगैरे . दुपारी शाळेत खायला पण हेच असायचं . श्रावण सोमवारी आमची शाळा लवकर सुटायची , ४ वाजता .शाळेतून परत येताना घराघरातून येणाऱ्या वासानी आधीच खूप भूक लागलेली असायची. कधी एकदा घरी जाऊन जेवेन असा होवून जायचं .   त्या दिवशी आई-बाबा पण लवकर यायचे . आई आल्या आल्या स्वयंपाकाला लागायची . उपवास सोडायचा म्हणून थोडसं काहीतरी गोड बनवलेलं असायचं . बाबा देवाची पूजा करून नैवेद्य दाखवायचे आणि मग आम्ही जेवायचो . अगदी ६-६.३० वाजता जेवण होवून पण जायचं आमचं . मग आम्ही दंगा करायला मोकळे होवून जायचो . जेवण लवकर झाल्यामुळे झोपेपर्यंत परत भूक लागायची . पण उपवास सोडला आहे ना ? मग आता काही खायचं नाही असा आई दटावायची, पण अगदी झोपताना थोडंस दुध द्यायची.
आजही श्रावण सोमवार येतोच पण आता तो वेगळा वाटत नाही . रोजच्या सारखाच एक दिवस , नेहमीसारखाच आठवड्याची सुरवात करणारा दिवस. आजच्यासारख कधीतरी जाणवत अरे तसा सोमवार हवा , वाट बघायला लावणारा , उपवासाला पोहे आणि शिरा खायची इच्छा असणारा. लवकर घरी येवून जेवण करायला लावणारा , असा श्रावण सोमवार , हरवलेला .

Wednesday, 16 July 2014

लहानपणीची आठवण -3

लहानपणी एखादी गोष्ट जरं  मनात ठसली असेल तर ती कायम मनात तशीच रहाते. तसचं काहीसं माझं झालं आहे ते मुंबई आणि पुण्याबद्दल .
मी ६ वीच्या  मे महिन्याची गोष्ट . माझी मावशी बदलापूर ला राहते ती आणि माझी सगळ्यात लहान मावस बहिण, जी माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी आहे , ती आली होती. परत जाताना सहज विषय निघाला आणि मी पण त्यांच्याबरोबर जायचं ठरलं . आईने परवानगी दिली , एका आठवड्याची . खूप खुश झाले मी . मुंबैबार्हेर राहणाऱ्या सगळ्यांसाठी ठाणे आणि उपनगरं वगैरे सगळ मुंबई मधेच येतं . त्यामुळे आपण मुंबई ला जाणार याचाच आनंद खूप झाला मला. नाना , मावशीचे मिस्टर आम्हाला घ्यायला आले होते , ते रेल्वे मध्ये होते त्यामुळे तिकीटाची फारशी गडबड नं होता नाना ,मावशी , स्वाती आणि मी आम्ही निघालो . पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास आणि तो पण रेल्वे ने म्हणून खूप उत्साहात होते मी . बाबांबरोबर प्रत्येक सुट्टीत बेळगावला जरी जात असले तरी सगळ प्रवास लाल डब्याने व्हायचा, त्यामुळे रेल्वे च आकर्षण खूप होतं . 
मावशी बदलापूर ला राहत असल्यामुळे आम्ही कल्याण ला उतरून बदलापूर ची लोकल पकडली . माझ्यासाठी सगळाच नवीन , त्यामुळं आधी काही कळलंच नाही . 
आम्हाला सवय , कोल्हापूर ला बस ने उतरलं कि सरळ रिक्षा करायची आणि १५ मिनिटांत घरी . पण इथे परत दुसरी गाडी पकडायची म्हणजे सगळचं वेगळं . शेवटी बदलापूर स्टेशन ला रिक्षा पकडून आम्ही घरी आलो . आणि सगळ्यात आधी जाणवला तो इथला उन्हाळा . एवढा उन्हाळा या आधी मी कधी बघितलाच नव्हता आणि लोकांच फलट मध्ये रहाणं पण . कोल्हापूर मध्ये तेव्हा फळात संस्कृती रुळली नव्हती अजून.
असो , एवढ्या उकाड्याची सवय नसल्यामुळे माझी अगदी तगमग व्हायची मगं मी आणि माझ्या  बहिणीने एक उपाय शोधून काढला . आम्ही बाथरूम मध्ये पाणी भरायचो . पाणी जिथून बाहेर जायचं तिथे कपड्याचे गोळे कोंबून ठेवायचे आणि त्या पाण्यामध्ये मस्ती करत राहायचो . अगदी १-२ दिवसच केला असेल असा , कारण , तिसर्या दिवशी खालच्या मजल्यावरच्या फळात चे मालक आले आणि त्यांनी मावशी कडे तक्रार केली कि त्यांच्या बाथरूम मध्ये पाणी गळत आहे , मगं काय , मावशी बरीच ओरडली आणि आमचं खेळण बंद झालं . मग आम्ही संध्याकाळी सायकल चालवायला जाऊ लागलो . मावशी २ रु. द्यायची . त्यावेळी भाड्याने १रु मध्ये अर्धा का एक तास मिळायची सायकल. १-२ दिवस सायकल चालवली मग स्वाती म्हणाली आपण पाणीपुरी खाऊया . मी म्हटलं मावशी ओरडेल ना गं . तर ती म्हणाली आपण सांगायलाच नको . मग काय , आम्ही ते २ रु घेवुन पाणीपुरी खाल्ली . पण रात्री जेवण जाईना . मावशीला वाटल पोटाच काहीतरी बिघडलं असेल . दुसर्या दिवशी परत तेच . माग मात्र मावशीला संशय आला . तिने रात्री विचारलं तसा मी सत्याचा अवतार असल्यामुळे मावशीला सांगून टाकलं आणि मग मावशी स्वातीला जे ओरडली , कि ज्याच नाव ते. झालं , स्वाती खूप चिडली माझ्यावर , बोललीच नाही मग माझ्याशी . मला कळेना आपलं काय चुकलं ते ? खरंतर माझा परत यायचा दिवस जवळ येत चालला होता  आणि नानांनी एक दिवस सांगितलं कि आपण उद्या मुंबई बघायला जाणार आहोत. मी खूप खुश झाले , काय काय सांगितलं त्यांनी समुद्र , गेट वे ऑफ इंडिया , म्हातारीचा बूट , मत्स्यालय वगैरे , वगैरे . 
दुसर्या दिवशी लवकर उठून मावशीने जेवण तयार करून बरोबर घेतलं आणि आम्ही सगळे बदलापूर स्टेशन कडे निघालो . व्ही टी च्या लोकल मध्ये मावशीबरोबर मी आणि स्वाती चढलो . रविवार चा दिवस असल्यामुळे ट्रेन ला गर्दी कमी होती. आम्हाला बसायला जागा मिळाली . मी तिसर्या जागी बसले होते . जसा आम्ही दादर ला पोहीचालो तशी डब्यातली गर्दी वाढली , मावशी माझ्या समोरच्या बाकावर बसली होती . तीच लक्ष होता माझ्याकडे . माझ्या शेजारी एक बाई येवून बसली आणि मला आत मध्ये ढकलायला लागली मला अगदी नकोस होवून गेलं . मी मावशीकडे बघितलं तर ती ने डोळ्यानीच सांगितलं कि तू हळूच ढकल तिला . मग काय, मी पण हातच कोपर रुतवलं त्या बाईच्या हातामध्ये . तिला बहुतेक ते लागल असाव , तशी उठून मोथाने बडबडायला लागली , कशी लोक असतात बघा , हि बाई (मावशीकडे बोट दाखवून ) या मुलीला सांगते ढकल  तिला , बैस बाई बैस . ती बाई बराच वेळ बडबड करत राहिली . मला जाम भीती वाटत होती . मी मावशीकडे हळूच बघितलं तर मावशीने लक्षच नाहीये असा दाखवलं माग मी पण दुर्लक्ष केलं . गाडी पुढे धावतचं होती. आणि मावशीने खिडकीजवळ बोलावून समोर बोट दाखवून सांगितलं , बघ, आपण आता मुंबई मध्ये आलो , उतरायचं आहे आता . आणि मला अजूनही आठवतात त्या स्टेशन च्या बाहेर असणाऱ्या चाळी . माझ्यासाठी मुंबई ची तीच पहिली ओळख ठरली . अजूनही त्या माझ्या डोळ्यासमोर तशाच दिसतात . 
माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती . आम्ही व्ही .टी . ला उतरलो . नानांनी विचारलं आपण आता साध्या बस ने जायचं कि डबल डेकर ने ? "डबल डेकर " मी आणि स्वाती एका सुरात ओरडलो . मग आम्ही डबल डेकर च्या वरच्या मजल्यावर बसून जाताना रस्त्यावरची लोकं आणि दुकान सगळ छोट वाटत होतं. आजूबाजूच्या त्या इमारती मी अगदी डोळे मोठे करून बघत होते . आपण कुठेतरी दुसर्या देशात आलो आहोत असा वाटत होता मला.  आणि आम्ही गेट वे ला पोहोचलो    माझ्या आयुष्यात पहिल्यांदा समुद्र बघितला मी . डोळे विस्फारून बघतच राहिले . एवढ अफाट पाणी ! आणि अगदी निळाशार नसाल तरी निळसर पाणी . मला त्याच्या प्रेमात पडायला वेळ लागला नाही. नानांनी सांगितलं आपण इथे जेट्टी ने फिरून येवू. मला काहीच कळलं नाही . पण जेव्हा आम्ही बोटीत बसायला लागलो तेव्हा कळलं जेट्टी म्हणजे बोट. आणि आपल्याला बोट लागते हे पण . 
तिथून आम्ही गिरगाव चौपाटी वर गेलो. आणि खऱ्या अर्थाने मी समुद्र बघितला . मी आणि स्वाती समुद्राच्या पाण्यामध्ये बराच वेळ खेळत राहिलो . खूप मज्जा आली . ते खारं पाणी तोंडात पण गेलं आणि पाण्याची चव कळली . माझ्यासाठी हे सगळ स्वप्नवत होतं . आपण कधी समुद्र बघू असा मला वाटल पण नव्हतं . तिथून मग तारापोरवाला मत्सालय बघायला गेलो , एवढे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मी पहिल्यांदाच बघितले . हरकून गेले अगदी . तिथून आम्ही टक्सी ने निघालो . पहिल्यांदा मी टक्सी मध्ये बसत होते . जाताना आजूबाजूच्या इमारती खूप उंच उंच वाटत होत्या . कायम वाडे आणि बसकी घर पाहणाऱ्या मला त्या इमारती म्हणजे काहीतरी वेगळंच वाटत होतं. आणि आम्ही म्हातारीच्या बूटापाशी पोहोचलो , मला तो बूट इतका आवडला कि काही बोलायची सोय नाही. पण आधी जेवू आणि मग खेळ असा नानांनी सांगितलं . म्हणून मग आधी जेवलो . म्हातारीच्या बुटावर चढताना मज्जा आली. बराच वेळ खेळत राहिलो आम्ही.  नानांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग आम्ही परत यायला निघालो . खरतर बरीच दमले होते . परत येताना मी आणि स्वाती मावशीच्या मांडीवर डोक ठेवून झोपून गेलो . आणि दोनच दिवसांनी मी आणि मावशी कोल्हापूर ला परत आलो. परत आल्यावर मात्र तिथल्या सगळया गोष्टी सांगून आई च खूप डोकं खाल्लं होतं मी . 
माझ्या आठवणीत मुंबई कायम हि अशीच राहिली . 


Thursday, 26 June 2014

लहानपणीची अजून एक आठवण

लहानपणीची अजून एक आठवण म्हणजे माझा झालेला अक्सिडेंट. दचकु नका असे , फार मोठा नाही , छोट्टासा . खूप धडपडी असल्याने असे छोटे मोठे प्रसंग बरेचदा आलेत. तर झालं असं कि मी आणि माझी वाड्यात राहणारी मैत्रीण प्रिया (वय वर्षे ६) कशावरून तरी भांडलो होतो आणि म्हणून बोलत नव्हतो , सकाळपासुन. साधारण ४ च्या सुमाराला ढोल आणि फटाक्यांचा आवाज ऐकू आला तशी मी वाड्याच्या बाहेर येवुन दारात उभी राहिले. असेन साधारण ५ वर्षांची . शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम सुरु होता निवृत्ती चौकात (त्याला अर्धा शिवाजी पुतळा पण म्हणतात , कारण तिथे बसवलेला महाराजांचा पुतळा अर्धा आहे ), म्हणजे घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर. तोच आवाज ऐकुन प्रिया पण बाहेर आली. पण बोलायचं नव्हतं ना ? आता काय करायचं ? थोडा वेळ आम्ही दोघी पण एकमेकींकडे न बघता कार्यक्रम सुरु होता तिकडे बघत होतो . फटक्यांमध्ये मधेच एक बॉम्ब फुटला आणि आम्ही दोघी पण दचकलो . दोघींना पण कळलं कि आपण दचकलो , मग जी हसायला सुरवात झाली त्यात सकाळचा अबोला कुठल्याकुठे गेला . दोघींनी पण ढोल वाजवत होते तिथे जायचं ठरवलं. तिकडे जायचं तर समोरचा रस्ता ओलांडावा लागला असता. म्हणून मग आम्ही एकमेकींचे हात धरले आणि निघालो , जवळ जवळ पळतच . आणि तेवढ्यात एक ब्रेक चा करकचून आवाज आला आणि काही कळायच्या आत मी आणि प्रिया रस्त्यावर पडलो . आजूबाजूचे लोक गोळा झाले .आम्ही खूप घाबरलो होतो . त्यामुळं धड उठता पण येत नव्हतं . वाड्या समोर असणाऱ्या दुकानदारांनी आम्हा दोघींना उचललं आणि घरी नेलं . घरी नशिबान कुणी ओरडलं नाही . तसंपण फारसं लागल नव्हतंच . पण लाड मात्र खूप झाले . प्रियाच्या आईने आम्हाला गरम गरम तूप मेतकुट भात खायला घातला होता . अर्थात . त्यात पण माझ आणि प्रियाच सुरु होतंच , कुणाला जास्त लागल आहे यावरून . दोघींना पण वाटत होता कि आपल्याला जास्त लागल आहे .
त्यावेळी भीती हा प्रकारच माहिती नव्हता . आमचा वाडा म्हणजे मध्ये अंगण आणि दोन्हीबाजूला खोल्या . तसाच समोरच्या ज्या दोन बाजूच्या खोल्या होत्या त्यावर आजीचा शिवण क्लास ची खोली होती . त्याच्या बाजूला अजून एक खोली आणि तिला काटकोनात अजून एक खोली होती , ती स्वंयपाकघराच्या वरती होती . आजीच्या स्वयंपाक घराच्या मागे न्हाणी होती आणि त्याच्यामागे परत अंगण होतं . त्या अंगणापलीकडे अजून दोन खोल्या , आणि समोर दोन खोल्या . मला खोड होती , आजोबा झोपले आहेत असा बघून मी अंगणात ठेवलेल्या दगडांच्या राशीवरून , न्हाणीच्या पत्र्यावर चढायचे आणि तेथून वर स्वयंपाक खोलीच्या वरच्या खोलीच्या पत्र्यावर . तो पत्रा दोन बाजुनी उतरता होता. त्याच्या टोकावर जाऊन , डोक बाहेर काढून , रस्त्यावरून येणारी जाणारी वाहनं बघत बसणं मला आवडायचं . मला तशी बघून समोरच्या तरुण मंडळाची मुलं , आजोबांकडे सांगायला यायची . आजोबा चिडून यायचे , ओरडून मला खाली उतरायला लावायचे . मी उतरायचे आणि धूम ठोकायचे . परत दुसर्या दिवशी तोच उद्योग.
फक्त एकदा हे सगळ परत अनुभवायचं आहे . आता सगळंच स्वप्नवत वाटतं . 

Tuesday, 24 June 2014

लहानपणीची आठवण

          आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणाच्या काही आठवणी कधीच विसरल्या जात नाही. खूप आनंदाच्या किंवा खूप दुःखाच्या आठवणी लक्षात असतात असा काही नाही . पण मनात कोरल्या गेलेल्या असतात . त्यातल्याच काही म्हणजे आजारी असतानाच्या  किंवा खूप लागला वगैरे असतानाच्या आठवणी . या आठवणी लक्षात राहाण्याच मुख्य कारण म्हणजे त्यावेळी झालेले खूपसारे लाड . एरवी कोण करत हो असे लाड? धम्मक लाडु आणि चापट पोळी खाण्याचे दिवस ते . तर असो , एवढ पाल्हाळ पुरे झालं.
          लहानपणी खुप धडपडी होते मी . त्यामुळं सततं पडणं आणि लागणं तर ठरलेलं असायचं. त्याचीच आठवण येतेय आत्ता . साधारण ३-४ वर्षाची असताना मी आणि केदार (माझा भाऊ ) आम्ही फुग्याने खेळत होतो . ते नाही का मोठे फुगे येतात ?? गोल , सफरचंदासारखे ? त्या तशा फुग्याने खेळत होतो आम्ही , ते पण कॉट वरती, उभेराहुन. आपण बॅडमिंटन खेळतो ना तसे . संध्याकाळची वेळ होती . त्याचवेळी आज्जी (आईची आई) आल्यामुळे आई तिथेच उभी राहून तिच्याशी गप्पा मारत होती. आणि त्याचेवेळी एकदम लाईट गेली . त्याचवेळी केदार ने फुगा माझ्या बाजूला मारला तो तिरका गेला. आणि मी खेळायच्या नादात त्या फुग्याला मारायला गेले आणि कॉट संपला आहे हे लक्षातच आलं नाही. दाणकन हातावर पडले . मला काय झालं ते कळलचं नाही . खूप रडले होते एवढंच आठवतंय. रात्रभर हात खूप दुखत होता आणि ने शेकला , बाम वगैरे लावला. या सगळ्या गोंधळात बाबा नव्हते , ते सकाळी आले . आल्या आल्या त्यांना झालेला गोंधळ कळला आणि मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो . हाताला प्लास्टर घातलं आणि ते जवळ जवळ १५ दिवस तसंच होतं . पण त्या काळात जी काय बडदास्त होती , अहाहा , ती काय विचारावी .
आईच्या नोकरीमुळे आजी -आजोबा जो पर्यंत होते तो पर्यंत दिवसभर आम्ही त्यांच्याकडे असायचो . त्यांचा वाडा होता . आणि वाड्यात २-३ बिर्हाड होती . आम्ही सगळे मिळून ५-६ जण असायचो . धमाल यायची खेळायला . खूप मस्ती सुरु असायची . असाच एकदा खेळत असताना, केदार जोरात पडला आणि त्याच्या गुडघ्याला लागलं. खूप जोरात आपटल्यामुळ लागलं पण तसचं होतं . आता जर आजी-आजोबांना कळलं तर आपली काही खैर नाही असा वाटून रडूच यायला लागलं . मी ४ वर्षांची आणि केदार ६ वर्षाचा असेल . त्याला ३ चाकी सायकल घेतलेली होती , डब्बल सीट . माझ्या डोक्यात काय आल कुणास ठाऊक , मी म्हटलं आपण डॉक्टर काकांकडे जाऊ (आमचे फमिली डॉक्टर होते , डॉक्टर माळी म्हणून ), तू मागे बैस आणि मी सायकल चालवते. तो पण तयार झाला . त्याला मागे बसवून मी त्याला डॉक्टर काकांच्याकडे घेवून गेले , साधारण ३-४ कि. मी . अंतर असेल . तिथे पोहोचल्यावर मी खाली थांबले (दवाखाना पहिल्या मजल्यावर होता ) , कारण सायकल कुणीतरी घेवून जाइल अशी भीती वाटत होती . त्याला एकट्याला आलेलं बघून डॉक्टर काकांना खूप आश्चर्य वाटलं . त्यांनी सगळी चौकशी केली . आम्ही दोघेच त्या सायकल वरून आलो आहे यावर आधी त्यांचा विश्वासच नाही बसला. ते लगेच खाली उतरून आले. मला सायकल पाशी बघून त्यांचा विश्वास बसला . मला नि सायकलीला ते वरती घेवून गेले . केदार च ड्रेसिंग झालं , डॉक्टर काकुंनी काहीतरी खाऊ दिला खायला . आणि काका त्यांच्या स्कूटर वरून आम्हाला सोडायला आले . आता आश्चर्य करायची पाळी आजोबांची होती . डॉक्टर काकांनी जे झालं होतं ते सगळं सांगितलं . ओरडण तर सोडाच , आजोबाना खूप कौतुक वाटलं होतं , त्यामुळ संध्याकाळी आईपुढ खूप कौतुक झालं आणि आईस्क्रीम पण मिळालं .

Monday, 23 June 2014

"रविवारची सकाळ "

कधी अळासावलेली तर कधी उत्साहानं भरलेली
कधी कान्देपोह्याची तर कधी डोश्याची
कधी गडावरची तर कधी कळसुबाई शिखरावरची
कधी रामायण बघणारी तर कधी कार्टून बघणारी
कधी प्रेमान भरलेली तर कधी रुद्रावतार धारण केलेली
कधी चहाच्या कपात बुडालेली तर कधी कॉफ्फी च्या वासानं दरवळलेली
कधी पांघरुणात गुरफटलेली तर कधी जोग्गिंग साठी तयार झालेली
कधी देवळाच्या समोर रांग लावणारी तर कधी भाजीवाल्या समोर जाउन उभी राहणारी
कधी सुट्टीच्या मुड मध्ये असणारी तर कधी आठवडयाच ऑफिसच प्लानिंग करणारी
कधी अभंग वाणी मध्ये रमणारी तर कधी 'रंगोली' ऐकणारी
कधी वाफाळता चहाचा कप हातात देवून आश्चर्य चकित करणारी तर कधी कामाचा ढीग उपसणारी
कधी पेपर मध्ये बुडालेली तर कधी कॉम्पुटर मध्ये मान घालून बसलेली
कधी कोवळ्या उन्हान न्हायलेली तर कधी धुक्यामध्ये गुरफटलेली
कधी पावसामुळ गढूळलेली तर कधी नुकताच पाउस पडून गेल्यामुळं स्वच्छ झालेली
कधी नव्या पालवीमुळे उत्साहित झालेली तर कधी झाडाच्या पडण्याने व्यथित झालेली
अशी हि "रविवारची सकाळ ", शांत, शांत… अक्ख्या जगाची शांतता घेवून आलेली