Wednesday, 19 October 2016

"आज तू ये स्वप्नांत" , ती म्हणाली
तो हसला तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला , "मग त्या स्वप्नात येणाऱ्या फुलपाखरांचं काय? "
"तू फुलपाखरू बनून ये", ती लाडाने म्हणाली , " मी पण फुलपाखरू असेन मग . आपण खूप फिरू. या फुलावरून त्या फुलावर . आवडलेल्या फुलावर बसून गप्पा मारू . अगदी अगदी थकेपर्यँत उडत राही ".
तो हसला . त्याच खूप प्रेम होत तिच्यावर , तिच्या हळवेपणावर , तिच्या बालिशपणावर, तीच्या वेडेपणावर आणि महत्वाचं म्हणजे  त्याच्यावर असणाऱ्या प्रेमावर . हळवा झाला तो .
तिच्या डोक्यावर हळुवार थोपटून निघाला . तसा त्याचा हात पकडून त्याच्या बोटांवरून आपली बोट फिरवत ती म्हणाली , " ये ना , फुलपाखरांना कॅन्सर होत नाही . एक पूर्ण आयुष्य मिळेल आपल्याला ".
घशाशी आलेला हुंदका दाबत , कसाबसा निघतो म्हणत तो हॉस्पिटल च्या बाहेर पडला