Thursday, 26 June 2014

लहानपणीची अजून एक आठवण

लहानपणीची अजून एक आठवण म्हणजे माझा झालेला अक्सिडेंट. दचकु नका असे , फार मोठा नाही , छोट्टासा . खूप धडपडी असल्याने असे छोटे मोठे प्रसंग बरेचदा आलेत. तर झालं असं कि मी आणि माझी वाड्यात राहणारी मैत्रीण प्रिया (वय वर्षे ६) कशावरून तरी भांडलो होतो आणि म्हणून बोलत नव्हतो , सकाळपासुन. साधारण ४ च्या सुमाराला ढोल आणि फटाक्यांचा आवाज ऐकू आला तशी मी वाड्याच्या बाहेर येवुन दारात उभी राहिले. असेन साधारण ५ वर्षांची . शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम सुरु होता निवृत्ती चौकात (त्याला अर्धा शिवाजी पुतळा पण म्हणतात , कारण तिथे बसवलेला महाराजांचा पुतळा अर्धा आहे ), म्हणजे घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर. तोच आवाज ऐकुन प्रिया पण बाहेर आली. पण बोलायचं नव्हतं ना ? आता काय करायचं ? थोडा वेळ आम्ही दोघी पण एकमेकींकडे न बघता कार्यक्रम सुरु होता तिकडे बघत होतो . फटक्यांमध्ये मधेच एक बॉम्ब फुटला आणि आम्ही दोघी पण दचकलो . दोघींना पण कळलं कि आपण दचकलो , मग जी हसायला सुरवात झाली त्यात सकाळचा अबोला कुठल्याकुठे गेला . दोघींनी पण ढोल वाजवत होते तिथे जायचं ठरवलं. तिकडे जायचं तर समोरचा रस्ता ओलांडावा लागला असता. म्हणून मग आम्ही एकमेकींचे हात धरले आणि निघालो , जवळ जवळ पळतच . आणि तेवढ्यात एक ब्रेक चा करकचून आवाज आला आणि काही कळायच्या आत मी आणि प्रिया रस्त्यावर पडलो . आजूबाजूचे लोक गोळा झाले .आम्ही खूप घाबरलो होतो . त्यामुळं धड उठता पण येत नव्हतं . वाड्या समोर असणाऱ्या दुकानदारांनी आम्हा दोघींना उचललं आणि घरी नेलं . घरी नशिबान कुणी ओरडलं नाही . तसंपण फारसं लागल नव्हतंच . पण लाड मात्र खूप झाले . प्रियाच्या आईने आम्हाला गरम गरम तूप मेतकुट भात खायला घातला होता . अर्थात . त्यात पण माझ आणि प्रियाच सुरु होतंच , कुणाला जास्त लागल आहे यावरून . दोघींना पण वाटत होता कि आपल्याला जास्त लागल आहे .
त्यावेळी भीती हा प्रकारच माहिती नव्हता . आमचा वाडा म्हणजे मध्ये अंगण आणि दोन्हीबाजूला खोल्या . तसाच समोरच्या ज्या दोन बाजूच्या खोल्या होत्या त्यावर आजीचा शिवण क्लास ची खोली होती . त्याच्या बाजूला अजून एक खोली आणि तिला काटकोनात अजून एक खोली होती , ती स्वंयपाकघराच्या वरती होती . आजीच्या स्वयंपाक घराच्या मागे न्हाणी होती आणि त्याच्यामागे परत अंगण होतं . त्या अंगणापलीकडे अजून दोन खोल्या , आणि समोर दोन खोल्या . मला खोड होती , आजोबा झोपले आहेत असा बघून मी अंगणात ठेवलेल्या दगडांच्या राशीवरून , न्हाणीच्या पत्र्यावर चढायचे आणि तेथून वर स्वयंपाक खोलीच्या वरच्या खोलीच्या पत्र्यावर . तो पत्रा दोन बाजुनी उतरता होता. त्याच्या टोकावर जाऊन , डोक बाहेर काढून , रस्त्यावरून येणारी जाणारी वाहनं बघत बसणं मला आवडायचं . मला तशी बघून समोरच्या तरुण मंडळाची मुलं , आजोबांकडे सांगायला यायची . आजोबा चिडून यायचे , ओरडून मला खाली उतरायला लावायचे . मी उतरायचे आणि धूम ठोकायचे . परत दुसर्या दिवशी तोच उद्योग.
फक्त एकदा हे सगळ परत अनुभवायचं आहे . आता सगळंच स्वप्नवत वाटतं . 

Tuesday, 24 June 2014

लहानपणीची आठवण

          आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणाच्या काही आठवणी कधीच विसरल्या जात नाही. खूप आनंदाच्या किंवा खूप दुःखाच्या आठवणी लक्षात असतात असा काही नाही . पण मनात कोरल्या गेलेल्या असतात . त्यातल्याच काही म्हणजे आजारी असतानाच्या  किंवा खूप लागला वगैरे असतानाच्या आठवणी . या आठवणी लक्षात राहाण्याच मुख्य कारण म्हणजे त्यावेळी झालेले खूपसारे लाड . एरवी कोण करत हो असे लाड? धम्मक लाडु आणि चापट पोळी खाण्याचे दिवस ते . तर असो , एवढ पाल्हाळ पुरे झालं.
          लहानपणी खुप धडपडी होते मी . त्यामुळं सततं पडणं आणि लागणं तर ठरलेलं असायचं. त्याचीच आठवण येतेय आत्ता . साधारण ३-४ वर्षाची असताना मी आणि केदार (माझा भाऊ ) आम्ही फुग्याने खेळत होतो . ते नाही का मोठे फुगे येतात ?? गोल , सफरचंदासारखे ? त्या तशा फुग्याने खेळत होतो आम्ही , ते पण कॉट वरती, उभेराहुन. आपण बॅडमिंटन खेळतो ना तसे . संध्याकाळची वेळ होती . त्याचवेळी आज्जी (आईची आई) आल्यामुळे आई तिथेच उभी राहून तिच्याशी गप्पा मारत होती. आणि त्याचेवेळी एकदम लाईट गेली . त्याचवेळी केदार ने फुगा माझ्या बाजूला मारला तो तिरका गेला. आणि मी खेळायच्या नादात त्या फुग्याला मारायला गेले आणि कॉट संपला आहे हे लक्षातच आलं नाही. दाणकन हातावर पडले . मला काय झालं ते कळलचं नाही . खूप रडले होते एवढंच आठवतंय. रात्रभर हात खूप दुखत होता आणि ने शेकला , बाम वगैरे लावला. या सगळ्या गोंधळात बाबा नव्हते , ते सकाळी आले . आल्या आल्या त्यांना झालेला गोंधळ कळला आणि मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो . हाताला प्लास्टर घातलं आणि ते जवळ जवळ १५ दिवस तसंच होतं . पण त्या काळात जी काय बडदास्त होती , अहाहा , ती काय विचारावी .
आईच्या नोकरीमुळे आजी -आजोबा जो पर्यंत होते तो पर्यंत दिवसभर आम्ही त्यांच्याकडे असायचो . त्यांचा वाडा होता . आणि वाड्यात २-३ बिर्हाड होती . आम्ही सगळे मिळून ५-६ जण असायचो . धमाल यायची खेळायला . खूप मस्ती सुरु असायची . असाच एकदा खेळत असताना, केदार जोरात पडला आणि त्याच्या गुडघ्याला लागलं. खूप जोरात आपटल्यामुळ लागलं पण तसचं होतं . आता जर आजी-आजोबांना कळलं तर आपली काही खैर नाही असा वाटून रडूच यायला लागलं . मी ४ वर्षांची आणि केदार ६ वर्षाचा असेल . त्याला ३ चाकी सायकल घेतलेली होती , डब्बल सीट . माझ्या डोक्यात काय आल कुणास ठाऊक , मी म्हटलं आपण डॉक्टर काकांकडे जाऊ (आमचे फमिली डॉक्टर होते , डॉक्टर माळी म्हणून ), तू मागे बैस आणि मी सायकल चालवते. तो पण तयार झाला . त्याला मागे बसवून मी त्याला डॉक्टर काकांच्याकडे घेवून गेले , साधारण ३-४ कि. मी . अंतर असेल . तिथे पोहोचल्यावर मी खाली थांबले (दवाखाना पहिल्या मजल्यावर होता ) , कारण सायकल कुणीतरी घेवून जाइल अशी भीती वाटत होती . त्याला एकट्याला आलेलं बघून डॉक्टर काकांना खूप आश्चर्य वाटलं . त्यांनी सगळी चौकशी केली . आम्ही दोघेच त्या सायकल वरून आलो आहे यावर आधी त्यांचा विश्वासच नाही बसला. ते लगेच खाली उतरून आले. मला सायकल पाशी बघून त्यांचा विश्वास बसला . मला नि सायकलीला ते वरती घेवून गेले . केदार च ड्रेसिंग झालं , डॉक्टर काकुंनी काहीतरी खाऊ दिला खायला . आणि काका त्यांच्या स्कूटर वरून आम्हाला सोडायला आले . आता आश्चर्य करायची पाळी आजोबांची होती . डॉक्टर काकांनी जे झालं होतं ते सगळं सांगितलं . ओरडण तर सोडाच , आजोबाना खूप कौतुक वाटलं होतं , त्यामुळ संध्याकाळी आईपुढ खूप कौतुक झालं आणि आईस्क्रीम पण मिळालं .

Monday, 23 June 2014

"रविवारची सकाळ "

कधी अळासावलेली तर कधी उत्साहानं भरलेली
कधी कान्देपोह्याची तर कधी डोश्याची
कधी गडावरची तर कधी कळसुबाई शिखरावरची
कधी रामायण बघणारी तर कधी कार्टून बघणारी
कधी प्रेमान भरलेली तर कधी रुद्रावतार धारण केलेली
कधी चहाच्या कपात बुडालेली तर कधी कॉफ्फी च्या वासानं दरवळलेली
कधी पांघरुणात गुरफटलेली तर कधी जोग्गिंग साठी तयार झालेली
कधी देवळाच्या समोर रांग लावणारी तर कधी भाजीवाल्या समोर जाउन उभी राहणारी
कधी सुट्टीच्या मुड मध्ये असणारी तर कधी आठवडयाच ऑफिसच प्लानिंग करणारी
कधी अभंग वाणी मध्ये रमणारी तर कधी 'रंगोली' ऐकणारी
कधी वाफाळता चहाचा कप हातात देवून आश्चर्य चकित करणारी तर कधी कामाचा ढीग उपसणारी
कधी पेपर मध्ये बुडालेली तर कधी कॉम्पुटर मध्ये मान घालून बसलेली
कधी कोवळ्या उन्हान न्हायलेली तर कधी धुक्यामध्ये गुरफटलेली
कधी पावसामुळ गढूळलेली तर कधी नुकताच पाउस पडून गेल्यामुळं स्वच्छ झालेली
कधी नव्या पालवीमुळे उत्साहित झालेली तर कधी झाडाच्या पडण्याने व्यथित झालेली
अशी हि "रविवारची सकाळ ", शांत, शांत… अक्ख्या जगाची शांतता घेवून आलेली


Saturday, 21 June 2014

मार्जार प्रेम

आमची मांजरं , खरतरं या विषयावर लिहीण्यासारख खूप आहे. कारण, माझ्या आईला मांजरांची आवड भरपूर आणि आमच्या बोळात बेवारशी मांजरांची पिल्लं आणुन सोडणारे पण भरपुर. अशा या पिल्लांसाठी आमच्या घरात खासचं जागा. कधी कधी तर एकाच वेळी ४-५ मांजर नक्की असायची. भूक लागली कि घरात नुसता गोंधळ घालायची .
बाबांचाही फक्त वैतागले नसले तर या गोष्टीला आक्षेप असायचा नाही.ते स्वतः सकाळी उठल्या उठल्या या मांजराना दुध घालायचे. अशीच एक बोळात सोडलेली मांजरी  होती . जेव्हा सोडली तेव्हा ते लहान पिल्लू होतं. तिला खूप कळायचं असा माझं प्रामाणिक मत आहे. तसा ती जाणवून पण द्यायची. एकदा ती शिवणाच्या मशीन च्या मागे झोपली होती. ती पलीकडच्या बाजूला असल्यामुळे दिसत न्हवती. बाबा गावहून  आले होते आणि नेहमीप्रमाणे ओरडत होते ," किती पसारा आहे हा?, कुणाला आवरायला नको ," वगैरे वगैरे. त्यातच ते पटकन बोलून गेले ," त्यात तुमची हि मांजरं , सगळीकडे घाण करुन ठेवतात", त्याचं हे वाक्य पुरा व्हायच्या आत हि बया मशिनच्या मागून उठली आणि बाबांच्या कडे बघून जोरात 'म्यावं, म्यावं' करायला लागली . आधी बाबा दचकले आणि माग जे हसायला लागले, पुढच सगळ बोलायचचं विसरले. या मनीच नाव मी 'खुळाबाई' ठेवलं होतं . ती खुळीच होती. तिला पिल्लं झाल्यावर त्यांच्याकड जायचीच नाही ही. त्यांना दुध घालून जगवायचा खूप प्रयत्न केला , पण ती जगलीच नाहीत . आणि हि खुळी पण.
बरेचदा, आमच्याकडे येणारी मांजरं आजारी असायची , त्यांना डॉक्टर कडे घेवून जाण , औषधपाणी करणं वगैरे सगळ करूनसुद्धा काही वेळा हि पिल्लं मारून जायची , खूप वाईट वाटायचं अशावेळी . जे कुणी त्यांना असा सोडून गेलं असेल अशा लोकांचा खूप राग यायचा इतकं आजारी पडेपर्यंत ठेवायचं कशाला ? मुळात आधी सांभाळता येत नाही तर सांभाळू नये असा वाटायचं .
या सगळ्या मांजरांबरोबर आमच्या घरी आमचा पमेरिअन क्रॉस असा कुत्रा पण होता. त्याचं नाव होतं "चिट्ट्या". नेहेमीपेक्षा वेगळ काहीतरी हंव म्हणून ठेवलेलं . त्याच्याबद्दल, परत कधीतरी . तर तो लहान असताना , नुसता कापसाचा गोळा होता, काळा -पांढरा. घरी येणाऱ्या लोकांना आमच्यातल्या मांजरांची सवय होती. आमच्या घरात मांजर असणार हे पक्कच असायचं.असेच एकदा बाबांचे मामेभाऊ आमच्या घरी आले होते , पलंगावर बसले होते आणि चिट्ट्या त्यांच्यापुढून धावत गेला , त्यांना नीट दिसला नसावा तो, ते म्हणाले ,"व्यंका (बाबांचं नाव व्यंकटेश आहे), काय रे ? तुमच मांजर कुत्र्यासारखं कसा दिसतंय?" हसून हसून आमची वाट लागली होती .
आता मात्र एकाच मांजरी आहे आईकडे , आणि विशेष म्हणजे हे मांजरीच वेड शर्वरी मध्ये पण उतरलं आहे . त्यामुळे हि मांजरी तिची खूप आवडती आहे . सुट्टीसाठी कोल्हापूर ला गेली कि तिच्या खणायची सगळी जबाबदारी शर्वरी वरच असते . मध्ये ७-८ दिवस नाहीशी झाली होती हि , तर शर्वरीचा जीव वर खाली होत होता . रोज ३-४ वेळा तरी तीच नाव काढल्याशिवाय राहत न्हवती ती . ती परत आल्यावर , तिला कुठं ठेवू आणि कुठं नको असा झालं होतं तिला.


Friday, 20 June 2014

पंढरीची वारी

आषाढ जसंजसा  यायला लागतो तसतशी ओढ लागते ती वारीची . मी अजून एकदाही वारी केली नाहीये . पण इच्छा मात्र खूप आहे . वारकर्यांच्या बरोबर जाउन फक्त एकदा तरी वारी करायची आहे. त्यांची भक्ती , त्यांच विठ्ठलाशी समर्पित असणं , एकमेकांना 'माउली' म्हणून पायाला हात लावून नमस्कार करणं , सगळं सगळं अनुभवायचं आहे . त्यांच्या बरोबर रांगेत उभ राहून विठ्ठलाच गोजिरवाणं रूप बघायचं आहे.
आपली संत परंपरा खूप मोठी आहे .सगळे संत पंढरपूरच्या विठ्ठालाच्या पायाशी जमा झाले , त्याच्या भक्तीमध्ये बुडाले.
विठ्ठलाच्या पायाशी लीन होताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ,
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।तेणें मज लावियला वेधु ।खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।हें तंव कैसेंनि गमे ।परेहि परतें बोलणें खुंटलें ।वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।उभाचि स्वयंभु असे ।समोर कीं पाठिमोरा न कळे ।ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।म्हणवूनि स्फुरताती बाहो ।क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।आसावला जीव राहो ॥५॥
तर तुकाराम महाराज म्हणतात 
आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु
हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥
आम्हां धातु विठ्ठल मातु विठ्ठलुगातु विठ्ठलु आनंदे ॥२॥
आम्हां राग विठ्ठलु रंग विठ्ठलुसंग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥
आम्हां ताल विठ्ठलु मेल विठ्ठलुकल्लोळ विठ्ठलु कीर्तने ॥४॥
आम्हां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलुमत्ता विठ्ठलु वदनी ॥५॥
आम्हां मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलुएका जनार्दनी अवघा विठ्ठलु ॥६॥

एका लेखामध्ये स्मिता तळवलकर यांनी लिहीलं होतं , कि वारकर्यांचा विठ्ठल नामाचा गजर जेव्हा टिपेला जातो तेव्हा मंदिराचे कळस पण डोलतात . त्या गेल्या होत्या हे खरा आहे का बघायला . नक्की आठवत नाही पुढच मला , पण वातावरण एवढ विठ्ठल नामानं भारलेलं असतं कि ते कळस डोलताना दिसतात असा काहीसं लिहिलं होत त्यांनी .  
हे सगळं अनुभवायचं आहे , एकदा तरी वारी ला जायचं आहे . 

Thursday, 19 June 2014

शर्वरीचा ताप

"आई ग, उठ ना , खूप थंडी वाजतेय", शर्वरीच्या (वय वर्ष १२) हाकेने झोप चाळवली माझी. ए. सी. मुळे होत असेल असा , असा विचार करून तिच्यावर अजून एक रजई पांघरली . परत ," आई, खूप थंडी वाजतेय गं ". असा आवाज ऐकल्यावर मात्र चंगलीच जाग आली मला. आणखीन एक रजई पांघरत ए सी बंद केला आणि तिच्या गळ्याला हात लावून बघितला , तर हाताला चटका बसला. गडबडीत उपेंद्र ला उठवलं आणि क्रोसिन शोधायला सांगितली . क्रोसिन घेतल्यावर मात्र ताप लगेच उतरला तिचा . साधारण ४ वाजता परत झोपले.
रविवार चा दिवस मात्र फ्रेश होती ती . दुपारी परत अंग तापतय असा वाटल्यावर , क्रोसिन दिली तीला . माग फ्रेश झाली. दुसर्या दिवशीपासून शाळा सुरु होणार म्हणून थोडी खरेदी करायची होती. "बरं वाटतय आता मला , मी पण येणारच" असा हट्ट करून शर्वरी पण आमच्याबरोबर आली. जाता जाता शेजारच्या हॉस्पिटल मध्ये दाखवून जाऊ असा विचार करून आम्ही निघालो . त्यांनी कॅल्पोल आणि झीफी लिहून दिली आणि तीन दिवसात जर फरक नाही पडला तर मलेरिया ची टेस्ट करायला सांगितली . खरेदी संपता संपता शर्वरी ला परत थंडी वाजायला सुरवात झाली. आम्ही गडबडीने घरी आलो आणि तिला कॅल्पोलची गोळी दिली. थोड्या वेळाने तिला बरं वाटल .
रविवारी साधारण २ वाजता परत ताप यायला लागला. यावेळी मात्र तिच्या एका हाकेसरशी उठले मी . लगेच कॅल्पोल द्याव का यावर माझी आणि उपेंद्र ची चर्चा झाली . शेवटी हॉस्पिटल मधेच फोन करून विचारव असा ठरलं . तोपर्यंत ताप १०३ झाला होता. डॉक्टरांचा परत फोन येईपर्यंत तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायाला सुरवात केली . तापाचा चटका थोडा कमी वाटला. खूप थंडी वाजत होती तिला . कॅल्पोल दिल्यावर पण ताप उतरला नाही . उतरल्यासारखा वाटला पण थर्मामीटर वर चेच्क केला तर १०२ होता . त्यातच डोक दुखतंय , पाय दुखत आहेत म्हणुन रडारड सुरु झाली तिची . आता मात्र काळजी वाटायला लागली होती . ताप तरी कमी यायला हवा होता . थोड्या वेळाने तापाच्या ग्लानी ने झोपली ती . कदाचित आता ताप कमी होईल असा वाटून गेला मला.
सोमवार सकाळी तीच पोट पण दुखायला लागलं आणि चक्कर पण यायला लागली. मग मात्र डॉक्टरांच्या कडे परत जावून याव असा ठरवलं आम्ही. साधारण ९-९.३० वाजता त्याच हॉस्पिटल मध्ये घेवून गेलो तिला. डॉक्टर औषध बदलून देतील असा वाटल आम्हाला. डॉक्टरांनी तपासाल तर ताप १०१. ८ होता . म्हणजे रात्री चढलेला ताप उतरलाच न्हवता. त्यांनी सांगितलं , तुम्ही अडमिट करा तिला . मलेरिया किंवा व्हायरल असू शकतो . जोपर्यंत रक्त तपासात नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही. झालं , मला काहीच सुचेनास झाल, काळजी अजूनच वाढली. शर्वरी ला अडमिट करायचं ठरवलं. अडमिट करेपर्यंत ठीक होती ती , पण जसा सलाईन लावण्यासाठी दोन नर्सेस नि तिचा हात धरला तशी घाबरली ती. रडायला लागली . इंजेक्शन ला खूप घाबरणारी ती , सलाईन साठी तयारच होईना. "झालं  , झालं ", म्हणत त्यातल्या एका नर्सने सुई खुपसली. मग तर तिने ठणाणा करायला सुरवात केली.  तिथूनच तपाण्यासाठी म्हणून त्यांनी रक्त घेतलं आणि अण्टिबयोटिक ची बाटली लावली . १-२ मिनिटात शांत झाली ती . माग मात्र हात दुखतोय म्हणायला लागली. तिच्या हातावरून हात फिरवत असताना , मला मात्र खूप वाईट वाटत होतं. सतत दंगा-मस्ती करणारी माझी लेक अशी शांत पडलेली बघून कसातरीच होत होता मला. यावर्षी शाळेच्या सुरवातीलाच आमची हॉस्पिटल वारी झाली.
ती थोडी शांत झालेली बघून मी आई-बाबांना फोन लावला . आपण कितीही मोठे झालो, अनुभवी झालो तरी आई-बाबांपेक्षा कधीच मोठे होत नाही. दोघांनी पण समजूत घातली . सगळ ठीकच होईल म्हणून सांगितलं. मगं जरा बरं वाटलं.
रिपोर्ट काय येईल याची सारखी धाकधूक लागून राहिली होती. मलेरिया असू नये , व्हायरलचं असावा , एवढी एकचं इच्छा होती. तिचे एकामागून एक सलाईन सुरूच होते.  उपेंद्रच्या आणि माझ्या घर ते हॉस्पिटल आणि हॉस्पिटल ते घर अशा फेर्या सुरु झाल्या . दुपारी तिच्यासाठी तुप मेतकुट भात घेवून आले पण चार घासांच्यावरती तिने तो खाल्ला नाही. साधारण ४-४.३० वाजता रिपोर्ट आला आणि मलेरिया नाही हे कळलं . हुश्श वाटल एकदम , डोक्यावरच ओझं उतरल्यासारखं वाटलं. तोपर्यंत ताप पण उतरतं आला होता . आता तो १०० वर होता. रात्री झोपताना तिला सलाईन लावू नका म्हणून सांगितलं , कारण तिला एकाच कुशीवर झोपणं अवघड गेलं असतं. तशीपण अनोळखी जागा म्हणून तिला झोप आली नाहीच , आणि तिला झोप नाही म्हणून मी पण झोपले नाही.
सकाळी उपेंद्र आला आणि मी नाश्त्याला तिला काहीतरी करून घेवून याव म्हणून घरी गेले . परत आले तर शर्वरी छान गाढ झोपली होती. तिला तसाच झोपु दिलं. सोमवार रात्रीपासून तिला ताप न्हवता. त्यामुळे घरी जाण्यासाठी डॉक्टरांना विचारव असा ठरवलं . डॉक्टर राउंड ला आल्यावर ते नाही म्हणाले, उद्या सोडू असा सांगितलं त्यांनी. ताप उतरला असला तरी तीच पोट मात्र दुखत होतं अजुन , म्हणून त्यांनी सोनोग्राफी करून यायला सांगितली. सोनोग्राफी साठी जाताना , सलाईन ची सुई तशीच होती . पण ती टोचतयं आणि हात खूप दुखतोय म्हणून शर्वरी रडायला लागली . मग नर्स ला बोलावून ती सुई च काढायला सांगितली . तर परत आल्यावर सलाईन नको म्हणून अधे मध्ये दंगा सुरु झाला तिचा . सोनोग्राफी झाली आणि तो पण रिपोर्ट नॉर्मल आला . आता मात्र डॉक्टरांनी तुम्ही संध्याकाळी घरी घेवून जावू शकता असा सांगितलं . पण जायच्या आधी दोन इंजेक्शन घ्यायची होती  , आणि ती पण शिरेत , म्हजे सलाईन जसा देतात तशी . ते आईकून शर्वरीन आधीच दंग सुरु केला. तिला कसबस शांत केलं. आणि संध्याकाळच संध्याकाळी बघू म्हणून सांगितलं. घरी परत जायचं या विचारानेच फ्रेश झाली ती एकदम. ५.३०-६ ला नर्से नि इंजेक्शन दिलं , थोडा दंग केला, पण घरी जायचं आहे या आनंदाने लगेच गप्प पण झाली.
शेवटी घरी आलो आम्ही . ३ दिवसाची काळजी संपली .  आता मात्र सक्त ताकीद आहे तीला, हा एक आठवडा खेळण बंद . विश्रांती घ्यायची . सध्यातरी 'हो' म्हटलं आहे तिने .

Tuesday, 17 June 2014

संध्याकाळ

मस्त धुपाचा वास असलेली, हवेत किंचींत थंडावा असलेली 'संध्याकाळ'
शुभंकरोती म्हणणारी, उदबत्तीचा वास असणारी  'संध्याकाळ'
मनाला हुरहुर लावणारी, सुर्याला बुडताना बघणारी  'संध्याकाळ'
कुटुंबा समवेत बाहेर फिरायला येणारी 'संध्याकाळ'
कुटुंबाची हक्काची असणारी 'संध्याकाळ'
उद्याचे plans ठरवणारी  'संध्याकाळ'
मित्रांची मैफल जमवणारी 'संध्याकाळ'
पावसाळ्यात अंधार उगाचच मनात पण दाटुन आणणारी  'संध्याकाळ'
दिवस संपला म्हणुन थकलेलं मन आणि शरीर घरी घेवुन जाणारी 'संध्याकाळ'
प्रवासातली 'संध्याकाळ'
हरीहरन , जगजीतसिंग च्या गझ़़ल ऐकणारी 'संध्याकाळ'
जगाच एकटेपण घेउन येणारी 'संध्याकाळ'
समुद्रावरची मन शांत करणारी  'संध्याकाळ'
अभ्यास करणारी 'संध्याकाळ'
कधी मनाला सावरणारी तर कधी बेभान करणारी  'संध्याकाळ'
कुणाची तरी वाट पहाणारी 'संध्याकाळ'
लसणीच्या फोडणीच्या वासाची 'संध्याकाळ'
रस्त्याकडेला बसलेल्या भाजीवाल्यांच्या ओरडण्यची 'संध्याकाळ'
दिव्यंाची  'संध्याकाळ'
कट्ट्यावर जमणार्या आजोबांची 'संध्याकाळ'
नाक्यावर जमणार्या मित्रांची 'संध्याकाळ'
लोकलच्या खडखडाची, घरी परतणार्या आतुर मनांची  'संध्याकाळ'
मैत्रीणींबरोबर खरेदिचा बेत करणारी 'संध्याकाळ'
त्या दोघांच्या नाज़ुक क्षणांची साक्षीदार 'संध्याकाळ'
त्याला निरोप देताना मन दाटुन आलेली  'संध्याकाळ'


Friday, 13 June 2014

दिवाळी

माझ्या लहानपणाच्या ज्या काही गोष्टी मला आवडतात त्या मध्ये "दिवाळी" हा सण जास्त आवडतो.
कोल्हापूरच्या दिवाळीची मजा काही औरच होती. शाळेच्या सहामाहीच्या परीक्षा झाल्या रे झाल्या कि दिवाळी चे वेध लागायचे. कधी एकदा दिवाळी येते असा होवून जयच. याच मुख्य कारण म्हणजे दिवाळी ला वाजवायला मिळणारे फटके, नवीन कपडे आणि फराळ .
आईबरोबर महाद्वार रोड ला भटकून ड्रेस खरेदी व्हायची. मग घरही साफ सफाई आणि फराळाची तयारी. आईच्या नोकरीमुळे फराळाचा गोंधळ जास्त नसायचा. फक्त शंकरपाळी आणि चिवडा घरी व्हायचा, कधीतरी चकली पण , बाकीचं सगळं विकत आणलं जायचं. मी जशी ९-१० वीत गेले तसं शंकरपाळी मीच करायला लागले . आई घरात नसताना अशी लुडबुड करायला मज्जा यायची . तसे बरेच प्रयोग केले आहेत मी. कधी म्हैसूरपाक तर कधी जिलेबी , पावभाजी, मिसळ आणि वेगवेगळ्या भाज्या तर नेहमीचं केल्या जायच्या. असो, विषयांतर नको .
बाबा आणि केदार फटके घेवून यायचे , पण अगदी १-२ दिवस आधी. आकाशकंदील आणायचं खातं पण त्यांच्याकडेच होतं. त्यावेळी फार फ़शनबल आकाशकंदील मिळत नसत आणि वापरले पण जात नसत. आमचा आकाशकंदील ठरलेला असायचा , तो म्हणजे चांदणी.
जसजशी दिवाळी जवळ यायची तसतशी माझी excitement वाढत जायची. एकदम उत्साही वगैरे वाटायला लागायचं . या सगळ्यामध्ये रांगोळीची आणि पणतीची खरेदी हा पण महत्वाचा मुद्दा असायचा, अर्थात माझ्यापुरता. वेगवेगळे रंग आधीच आणून ठेवणे, पेपर वर उदबत्तीने भोकं पडून ठिपक्यांच्या रांगोळी ची तयारी करणे, रांगोळीची नवीन पुस्तकं आणून , रांगोळी काढायची प्रक्टिस करणे वगैरे सगळं सुरु असायचं. अशातच कॉलेज ला असताना संस्कारभारतीची रांगोळी शिकले , मग काय? दरवर्षी तीच रांगोळी काढायचे.
नरक चतुर्दशीचा आदला दिवस म्हणजे 'धनत्रयोदशी'. हि म्हणे बायाकांची दिवाळी असते, पण मला असले फरक कधीच मान्य न्हवते. त्यामुळे माझी दिवाळी माझ्या भावाबरोबर नरक चतुर्दशीलाच असायची .
बघता बघता नरक चतुर्दशीचा दिवस यायचा , उजाडायचा नाही कारण उजाडायच्या आतचं आई मला उठवायची , ते पण भल्या पहाटे ४ वाजता. थंडी असायची पण दिवाळी सुश्रु झाली या नादात ती बोचायाची नाही. पटकन चहा घेवून मी दारासमोरचा बोळ झाडून घ्यायचे. मग सडा घालायचा. आणि जिथे जिथे पाणी साचून राहिलं आहे तेवढंच फडक्याने टिपून घ्यायचे . रांगोळी काढायची माझी तयारी व्हायची. हळू हळू आजूबाजूच्या घरातून पण सगळ्या यायला सुरवात झाली असायची . रांगोळी काढताना पण एका झटक्यात जर ती झाली तर रांगोळी कसली? आधी ठिपक्यांची ठरलेली रांगोळी काढायची, ते ठिपके जोडताना कुठेतरी चुकायचं , माग ती पुसायची , दुसरी काढायची . कधी कधी वैतागून मी फ्री हान्ड काढून रिकामी व्हायचे. असा करत करत ५. ३० पर्यंत ती तयार व्हायची . मग मी घरात यायचे. बाबा आणि केदार तयार झालेले असायचे. मग अंगाला तेल लावून अभ्यंगस्नान व्हायचं आणि मी तयार व्हायचे. नवीन कपडे घालायची मजा यायची. माझे आणि केदार चे फटाके आधीच वाटलेले असायचे. त्याची पिशवी वेगळी आणि माझी वेगळी असायची. मला सुतळी बॉम्ब वाजवायची भीती वाटायची, त्यामुळे ते सगळे केदार कडे जायचे . माझ्याकडे लवंगी  फटका,लक्ष्मी तोटे , झाड , भुइचक्कर, पेन्सिली, दोर्या, नागगोळ्या , काडेपेटी आणि वेगवेगळ्या रंगाच्या आणि साध्या अशा फुलबाज्या असायच्या. यातसुद्धा फटके पुरावेत म्हणून आम्ही लवंगी ची माळ सोडून एक एक फटाकी उडवायचो . बोळातला केदार चा मित्र फटके उडवायची सुरवात करायचा ते पण दरवर्षी ५ वाजता एक सुतळी बॉम्ब लावून.
त्या दिवशीचे फटाके उडवून झाले की, मग आम्ही अंबाबाईला जाउन यायचो. परत आलो कि फराळ खायचा आणि मग परत हुंदडायला मोकळे. आई ला सुट्टी नसायची . मग एक चक्कर मोठ्या काकांकडे व्हायची.
संध्याकाळ झाली कि पणत्या लावायची तयारी करायची. मोठ्या दरवाजाच्या बाहेर दोन पणत्या आणि अंगणातल्या प्रत्येक कुंडीत एक , अशा पणत्या लावायचे मी. अंगणात टांगलेला आकाशकंदील आणि ओळीने तेवत असलेल्या पणात्यांमुळे अंगण एकदम सुरेख दिसायचं.
खरी मजा यायची ती लक्ष्मिपुजनाला. धाकट्या काकाचा फॅब्रीकेशन चा कारखाना होता , राजारामपुरीत. आमच लक्ष्मीपूजन तिथे व्हायचं. पुजेची सगळी तयारी करून सगळे काका-काकु आणि आम्ही सगळी भावंड तिथे पोहोचायचो. तिथे फुलं आणि फटाके आधीच आणून ठेवलेले असायचे . मी आणि माझ्या बहिणी , आम्ही जमीन झाडून घ्यायचो आणि त्यावर पाण्याचा सडा टाकायचो. आमच्यातली मोठी बहिण रांगोळी काढायची आणि आम्ही सगळ्या त्यात रंग भरायचं काम करायचो. कधी एकदा पूजा होते असा होवून जायचं. पूजा झाली रे झाली कि आम्ही लगेच फटाके उडवायला पळायचो . सगळेच बरोबर असल्यामुळे धमाल यायची.
दिवाळीत मी वाट बघायचे ती भाऊबीजेची. कारण त्या दिवशी मी आधीच घेतलेला ड्रेस मिळायचा मला . त्यावेळी वर्षातून दोनदाच मोठी खरेदी व्हायची , एक दिवाळी आणि दुसरा वाढदिवस, दिवाळीमधे दोन ड्रेस घेतले जायचे. अधे मधे कापड खरेदी क्वचित व्हायची.
ते दिवस खरचं खूप खास होते . सगळं लिमिटेड असून पण त्यातून मिळणारा आनंद अनलिमिटेड होता . खूप वाटत ते दिवस परत यावेत . मी जशी दिवाळी अनुभवली तशी माझ्या मुलीला पण अनुभवायला मिळावी. 

Wednesday, 11 June 2014

माझं कोल्हापूर

प्रजू च्या मुंजीनंतर परत येताना , परत एकदा काहीतरी माग ठेवून आल्याची जाणीव झाली. कळव्याला येवून आता ९-१० वर्ष झाली आहेत. पण अजूनही कोल्हापूर ची ओढ तशीच आहे. मधल्या काळात जायला न जमल्यामुळे ती कमी झाली असं उगाचच वाटत होतं. पण तसं काहीच नाहीये. ती ओढ , परत येतेनाच एकटेपण सगळं तसच आहे.
  कोल्हापूरची ओढ मला कायम वाटतं आली आहे. "माझं कोल्हापूर" आता बदलत चाललं आहे पण हे बदलण पण अपरिहार्य आहे. अंबाबाई ची महालक्ष्मी झाली आहे , आधी ज्या देवळातून जाताना कुणाची परवानगी लागत न्हवती तिथे आता दर्शन घेणार असाल तरच प्रवेश मिळतो, आणि दर्शनाला जाव तर लांबच लांब रांग असते. गेल्या ४-५ वर्षात मी फक्त मुखदर्शन घेतलं आहे.

मी शाळेत असताना कधीच रांगेत उभ रहाव लागल नहिये. देवळात आलो कि सरळ आत प्रवेश मिळायचा , अगदी नवरात्रीत सुद्धा. शाळा सुटली कि देवीच दर्शन घ्यायचं आणि मग घरी जायचं , हे अगदी शाळा B.Com. संपेपर्यंत सुरु होतं. अर्थात कॉलेज ला गेल्यावर रांगा सुरु झाल्याच होत्या पण आत्तासारखी परिस्थिती न्हवती.
अंबाबाईच्या देवाळाशेजारी  आमची शाळा आहे. "विद्यापीठ हायस्कुल ". घरापासून अगदी १० मिनिट चालत जाण्याच्या अंतरावर . साधारण ५वी ला गेल्यापासुन मी आणि केदार आम्ही दोघेच शाळेत जायला लागलो. तो ७वी मध्ये होता. वांगी बोळातून बाहेर महाद्वार रोड ला यायचं आणि मग तेथून अंबाबाई च्या देवळातून शाळेला जायचा आमचा शिरस्ता होता. अंबाबाई च्या देवळाच्या बाहेर आणि शाळेच्या बाहेर एक बाई गोळ्या , चिंचा , आवळे, ओली आवळासुपारी असं सगळं घेवून बसायची. कधीतरी घरातून मिळालेल्या चार आण्यात मनसोक्त खाता येईल असा मेवा यायचा . परवा सहज चौकशी केली तर ५-१० रुपयाच्या खाली काही मिळताच न्हवतं. पण चव मात्र तीच , तोंडाला पाणी सुटणारी.
शाळेच्या बाहेर , पटांगणातच बकरे सरांच एक दुकान होतं . साध्या फळकुटांनी बनलेलं. त्यांच्याकडे मिसळ मिळायची . पावाची (bread ) ची भाजी आणि त्यावर हरभर्याची रस्सा उसळ. मस्त तिखट असायची ती.आता तशी मिसळ कुठेच मिळात नाही.
अजून एक मोठा जाणवलेला बदल म्हणजे लोकांनी स्वत:च्या घराचं परिवर्तन यात्रेकरुंच्या निवासासाठी केल आहे . करूदेत बापडे , पण हा बदल इतका जास्त आहे कि, सगळीकडे असे यात्रेकरू निवास दृष्टीस पडत आहेत. अजून एक म्हणजे, रिक्शावाल्यांच्या तोंडची भाषा बदलत चालली आहे, काही वर्षापूर्वी जिथे अस्सल कोल्हापुरी भाषा ऐकू यायची तिथे आता "किधर जाना है ?" असा ऐकायला मिळतं.
तीच गोष्ट रंकाळ्याची. लहानपणीचा रंकाळा अजूनही आठवतो मला. स्वछ:, शालिनी पलेस पर्यंतच असणारा, रंकाळा. तिथे मी आणि माझी भावंड जायचो, जाताना भडंग, शेंगदाणे वगैरे घेवूनच जायचो. तिथल्या गवतात बसून कागदावर भडंग खायची मजा काही औरच होती. शालिनी पाय्लेस च्या समोरच्या बागेत जाण म्हणजे खूप लांब आल्यासारख वाटायचं. तिथे जाणं म्हणजे चैन होती. तिथे गाड्यावर मिळणारी पाव भाजी( हाफ प्लेट ) आणि आइसक्रीम खाल्ल कि दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटायचा. आता मात्र सगळं बदललं आहे, रंकाळा सुशोभित करण्याच्या नादात पाणी घाण होत चाललं आहे याकडे मात्र दुर्लक्ष होत चाललं आहे.



तरीही, काही गोष्टी अजूनही तशाच आहेत, शिवाजी पेठ , तिथली भाषा , रांगडेपण, लोकांमधली माणुसकी , मदतीला धावून जाणं, सगळ तसचं तर आहे. म्हणूनच माझ कोल्हापूर मला प्रिय आहे.
आणि म्हणूनच माझी ओढ पण तशीच आहे.