Tuesday, 19 January 2016

मृगजळ

तू एक मृगजळ
हातात येता येता नाहीसं होणारं
तू एक चंद्र
पौर्णिमेला उगवून अमावास्येला गायब होणारा
तू रातराणीचा सुगंध
रात्रीत उमलून सकाळी गायब होणारा
तू पहाटेच स्वप्न
खरा होण्याची वेडी अशा दाखवणारा
तू  प्राजक्ताच फुल
पहाटे पुरतंच आयुष्य लाभलेला
तू नदीचा आवेग
कवेत घेवून सोडून देणारा
तू माझ मन
राज्य करता करता निघून जाणारा
--अनघा 

Saturday, 16 January 2016

मुक्त

एक मोकळं आभाळ हवंय
उडण्यासाठी
एक मोकळा कॅनव्हास हवाय
व्यक्त होण्यासाठी
एक मोकळा अवकाश हवाय
झेप घेण्यासाठी
एक कुऱ्हाड हविये
या साखळ्या तोडण्यासाठी
एक हात हवाय
तोल सांभाळण्यासाठी
एक मुक्त मन हवंय
मनाला मुक्त करण्यासाठी 

--अनघा

Sunday, 10 January 2016

अर्थ


काही सांगायचे असते तेव्हाच शब्द हरवतात
शब्दांना शोधायचे असते तेव्हाच अर्थ हरवतात

गाळलेल्या जागांमधला अर्थ खुप काही सांगुन जातो
बरेचदा अर्था एेवजी अनर्थ करुन जातो

समजुतीच्या कुंपणामध्ये अर्थ बागडत असतो
हरवलेला शब्द कुंपण तोडुन आत शिरतो

आता काहीच उरलेलं नसतं
असतो तो फक्त अनर्थ, सगळीकडे व्यापून उरलेला

--अनघा

Friday, 8 January 2016

समुद्र


एक समुद्र तुझ्या ओंजळीमधे सामावलेला

अव्यक्त मनाच्या हळव्या कोपर्यात दडलेला


हळव्या नात्यांच्या आठवणीत हरवलेला
जमिनीवरून चंद्राला साद घालणारा

चंद्राच्या चांदणीने उचंबळणारा
किनार्याच्या साथीने चालणारा

एक समुद्र, तुझ्या ओंजळीमधुन
माझ्या ओंजळीत उतरणारा...
--अनघा