Wednesday, 10 December 2014

थळ - एक अविस्मरणीय अनुभव

रोजच्या रुटीन चा कंटाळा यायला लागला  कि मन निसर्गाकडं ओढलं जातं . त्याला ताजतवानं होण्यासाठी निसर्गाची तहान लागते. मी पण खूप कंटाळले होते . ऑफिस ते घर , घर ते ऑफिस करून , सुट्टीच्या दिवशी माॅलला फेरफटका मारून मारून . काहीतरी छानस करावंसं वाटत होतं . पण काय कराव हे काही सुचंत नव्हंत . उपेंद्र म्हणाला, तुला एका छानशा जागी घेवून जातो यावेळी . म्हणून त्याने थळ ला बुकिंग केलं . नुसतच मोघम सांगितलं थळ बद्दल, अलिबाग जवळ आहे म्हणून  . नेट वरती माहिती बघितली तर तिथून जवळ एक लाईट हाऊस आहे असं कळलं . जातानाच प्लान केला लाईट हाऊस बघायचच म्हणुन. दोन दिवसाचा बेत ठरला .
सकाळी लवकर  उठून आम्ही अलिबाग च्या रस्त्याला लागलो . कर्नाळा बर्ड सेन्चुरीच्या इथून जाताना , प्रत्येकवेळी वाटतं इथे आलं पाहिजे, यावेळी पण परत एकदा ठरवलं कि इथे येवू आपण . जाताना "जैत रे जैत "मधला सुळका लागला . आणि मनात गाणं घुमायला लागलं , 'लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला '. मन प्रसन्न झालं .  आजुबाजुच्या झाडांमधून उगवणारा सुर्य बघायची मजा काही वेगळीच असते .
निसर्गाची पण नशा असते एक . बेभान व्हायला होतं . मनाच पाखरू होतं आणि भटकत राहतं,  झाडांवरून  , पानांवरून , फुलांवरून . बघता बघता आम्ही थळ ला पोहोचलो . थोडे चुकून , पुढे मागे जात शेवटी इच्छित स्थळी पोहोचलो आणि लक्षात आलं कि किहीम बीच अगदी जवळ आहे , जास्तीत जास्त १० मिनिटांवर .



जिथे उतरलो होतो तिथून जवळच एक सुंदर तलाव होता . सकाळच्या वेळी फुललेली कमळं ,  तिथे असणारे बगळे , आजुबाजूच थंड आणि शांत वातावरण. असं वाटतच नव्हंत कि आपण मुंबईच्या जवळ आहोत . एक वेगळंच जग , एक वेगळाच अनुभव.








































फ्रेश झालो आणि तिथल्या स्वागतिकेला जवळपास बघायला काय काय आहे विचारलं . तसं तिने मांडवा बीच , करमरकर शिल्प संग्रहालय, किहीम बीच सांगितला . इथून लाईट हाऊस किती लांब आहे विचारलं तर म्हणाली , 'तसा ब-यापैकी लांब आहे , पण गाडी जाते तिथं पर्यंत '.
आम्ही सगळ्यात आधी किहीम बीच ला जायचं ठरवलं , शर्वरी ला पाण्यात खेळायचं होतं . अर्थात मला पण . दुपारी मांडवा आणि मग करमरकर संग्रहालय .
किहीम बीच वरती पोहोचल्यावर गर्दी अगदीच कमी आहे हे जाणवलं . तसं उपेन्द्राला वाटलं आपण काशीद बीच ला जाऊ . काशीद बीच पण जवळ आहे तिथून साधारण २०किमी  वगैरे असेल . पण मला मात्र वाटलं कि आपण इथेच थांबू . काशीद ला गर्दी खूप असते , त्यापेक्षा हा शांत आहे . हो नाही करता करता शेवटी आम्ही किहीम लाच थांबायचं ठरवलं .



मी आणि शर्वरी लगेच पाण्यात शिरलो . लाटांबरोबर खेळण्याची मजा काही औरच असते . वेळेच भान निघून जातं. समोर पसरलेला अफाट समुद्र ,नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी आणि त्याला टेकलेलं आभाळ . यावर असणारे ठिपके म्हणजे आपण . समोरून येणाऱ्या लाटा अंगावर झेलत आम्ही कमरेएवढ्या पाण्यात उभे होतो . मोठ्या लाटेबरोबर  मागे ढकललो जायचो आणि परत पुढे यायचो . थोडे मागे होवून येणाऱ्या लाटांवर उड्या मारण्याची मजा शब्दात सांगतां येणं अवघड . एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचा खेळ खेळताना परत एकदा लहान झाल्यासारखं वाटलं .

खूप वेळ खेळलो आम्ही . शेवटी साधारण १ वाजता भूक लागल्यावर बाहेर आलो . मी ताडीची फळं आणि शर्वरी ने शहाळं घेतलं . मग सावकाश आम्ही परत आलो . इतके थकलो होतो कि जेवण करून मस्त ताणून दिली . ४ वाजता कशीबशी जाग आली . थंडीचे दिवस असल्याने आणि तसा प्रदेश अनोळखी असल्याने मांडव्याला लवकर जायचं ठरवलं होतं . त्याप्रमाणे ५-५.१५ ला बाहेर पडलो .




मांडवा , अग्निपथ मधून भेटलेला . तस्करांसाठी सोयीच ठिकाण म्हणून माहिती असलेला . खूप उत्सुकता होती , मांडवा बघायची . जसे आम्ही मांडव्याजवळ पोहोचलो तसं डोळ्याचे पारणे फेडतील असे बंगले दिसायला लागले .झाडांमधून लपलेले , भले मोठे असे . बघता बघता आम्ही मांडवा जेट्टी जवळ पोहोचलो .




 लोकांची ही गर्दी . तिथून गेट वे ला जायला . हा मुंबईला पोहोचायचा सगळ्यात जवळचा मार्ग . सकाळी ८. १५ पासून बोट आहे गेट वे साठी . तासा दीड तासात मुंबई .


 मांडव्याच्या  किनार्यावरून मुंबईचे दिवे दिसतात . आम्ही बराच वेळ थांबलो , येणा-या आणि जाणा-या लोकांची गर्दी बघत .
























मांडव्याच्या किना-यावरुन गेल (GAIL ) चे दिवे लांबून  एखाद्या अनिमेटेड सिनेमा मधील स्वप्नांच्या शहरासारखे दिसतात .






बराच अंधार झाल्यावर आम्ही तेथुन निघालो . आता करमरकर संग्रहालय शोधायचं होतं. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळेजण मदत करायला अगदी तयार. " इथून सरळ जावा , पुढे राईट घ्या , आणि मग थोडे पुढे जाउन लेफ्ट घ्या ". इतक्या सूचना असून पण रस्ता चुकायचा तसा चुकतोच . शेवटी विचारत विचारत एका वळणावर पोहोचलो . इथून आम्हाला राईट घ्यायचा होता . आम्ही वळलो तसा सगळा रस्ता अंधारात बुडालेला होता . काय करावं कळेना , म्हणून जवळ असलेल्या काकांना विचारलं . तर ते म्हणाले ," मी इथून जवळचं ६ मैलांवर राहतो . तुम्ही मला तिथे सोडा आणि मग तसेच डावीकडे सरळ जा , सासवण्यात पोहोचाल ".
आम्हाला दुसरा काही पर्यायच नव्हता . काका गाडीत बसले आणि मग गप्पा सुरु झाल्या . तेवढ्यात समोरून एक भली मोठी कार पास झाली . तसे काका म्हणाले ," आमचं गाव आता ५star झालं आहे. " आणि मग बोलण्याच्या नादात कळलं कि त्यांची १०० एकर जमीन आहे . त्यांच्या एका बाजूला सचिन तेंडूलकरने जमीन घेतली आहे आणि जवळच जुही चावला ने पण .
आम्ही एका तळ्यावरून थोडे पुढे आलो आणि कळलं कि त्या तळ्याच्या पलीकडे संजय मांजरेकर चा बंगला आहे आणि त्याने आपल्या आईच्या नावाने तळ्याभोवती बाक ठेवले आहेत . रस्त्यावर अजीबात लाईट नव्हते त्यामुळे आजूबाजूचा अंदाज फारसा येत नव्हता .आम्हाला आलेला टेन्शन बघून काका थोडा पुढपर्यंत आले आणि मग सरळ जावा सांगून निघून गेले . आम्ही तसेच पुढे आलो , आणि शेवटी सासवणेला पोहोचलो . तिथे करमरकर संग्रहालय सगळ्यांना माहिती आहे .
जशा पाय-या चढून गेलो तशा सुनंदा करमरकर ( शिल्पकारांची सून ) आम्हाला  खुर्चीत बसलेल्या दिसल्या .


 त्यांनी लगेच आत या म्हटलं आणि शेजारच्या दिवाणाकडे बोट दाखवून बसायला सांगितलं . त्यांना बोलायची खूप हौस आहे . आणि विषय पण भरपूर आहेत . बोलायच्या ओघात त्यांनी बराच काही सांगितलं . त्या एकट्या तिथे राहतात . मदतीला एक आज्जी आहेत आणि एक त्यांनी सांभाळलेला मुलगा आहे . घरातली शिस्त लष्करी आहे . शिल्पकारांचा मुलगा लष्करात होता. अतिशय व्यवस्थित आहे घर त्याचं. त्या खाली रहातात आणि वरती संग्रहालय आहे .
सुनंदाताई , वय वर्षे ८० . गेली २१ वर्षे एकट्या राहतात तिथे , त्यांचा मुलगा , सुन आणि दोन्ही नाती अमेरिकेत असतात . दर सहा महिन्यांनी मुलगा किंवा सुन चक्कर मारतात . या पण कधी कधी तिकडे जातात . त्या ठणठणीत आहेत , स्वयंपाक वगैरे करतात अजून .त्यांच्याकडे १९६० मधला ओवन आहे आणि अजूनही आम्ही त्यात बिस्कीट वगैरे करतो म्हणाल्यावर मी थक्क झाले . प्रचंड उत्साही आहेत त्या .  त्यांना बघितल्यावर मला त्या खूप आवडल्या . तरुणपणी दिसायला त्या नक्की सुरेख असतील हे पण जाणवलं. कलकत्त्याला रहात   असताना त्यांनी मदर तेरेसां बरोबर काम केलं आहे.
 आम्ही संग्रहालय बघायला गेलो . शिल्पं अतिशयं सुरेख आहेत . खूप बारकाईने केलेलं काम जाणवत . सुनंदाताई म्हणाल्या तसं शिल्पकारांचं नुसतं डोळ्यांच काम बघून पण थक्क व्हायला होतं .


आपल्याला डोळ्यांमधला फरक जाणवायला लागतो . कुणाचे डोळे काळे असतील , तर कुणाचे निळे, हा फरक स्पष्ट जाणवतो . चेह-यांवरचे भाव तर अप्रतिमच !





त्यांनी केलेलं एक शिल्प आहे , हिरा कोळीणीच . साधारण १५-१६ वर्षांच्या त्या मुलीचं शिल्प इतकं अप्रतिम आहे , कि ते तिथे जाऊनचं पहावं.




स्वत:च्या मुलीचं ती ४ आठवड्याची असताना केलेला चेहरा , नंतर वेगवेगळ्या वयातली शिल्पं तर परीसस्पर्श जाणावूनच देतात. शिवरायांचा पुतळा तर निव्वळ अप्रतिम .


गांधीजींच स्वतः समोर बसून केलेलं शिल्प , रबिन्द्रनाथ टागोरांच आधुनिक  प्रकारातलं शिल्प, अशी तिथे ठेवलेली सगळी शिल्पं डोळ्याचं पारणं फेडतात. धन्य तो शिल्पकार ! आजच्या दिवसातला , हे संग्रहालय म्हणजे कळस ठरलं .







अतिशय छान वाटत होतं आम्हाला परत येताना .

दुसरा दिवस उजाडला तोच पक्ष्यांच्या किलबिलाटाने .
































































आता वेळ होती लाईट हाऊस ची  . आम्ही नेहमीप्रमाणं विचारत विचारत निघालो . तर ते अलिबागच्या थोडं पुढं असल्याचं कळंल . आम्हाला वाटलं रेवदांड्याला आहे . म्हणून तिथपर्यंत गेलो तर कळंल कि ते अजून थोडं पुढे मुरुड - जंजिरा च्या वाटेवर आहे . गावाच नाव आहे "कोर्लाई" . गाव अगदी छोटं आहे . रस्ते जेमतेम एक गाडी जाईल असे . गावाच्या टोकाला , डोंगरावरती लाईट हाऊस आहे . वाटेवरती मासळी वाळवताना बायका दिसत होत्या .



किनार्याजवळ थोड्या उंचीवर बांधून घेतलेले चौथारे आणि त्यावर  वाळंत घातलेली मासळी .























 लाईट हाऊस पर्यंत जाण्याची वाट म्हणजे एक कच्चा रस्ता . एका बाजूला डोंगर आणि दुस-या बाजूला समुद्र . त्यातून समोरून जर दुसरी गाडी आली तर दोघांपैकी एकाला मागे जाण्याशिवाय पर्याय नाही .








लाईट हाऊस छोटं आहे . आणि सोलर वरती चालंत . तिथे असणारे लाईट हाऊसमन सगळी माहिती देतात , आणि फी आहे फक्त १०रु. आपण अगदी वरती लाईट जिथे असतो तिथपर्यंत जाऊ शकतो . त्या लाईटच्या दोन मिनटात किती फे-या होतात यावरती तो कोणत्या ठिकाणी आहे हे समुद्रातील जहाजांना कळतं .लाईट हाऊस आणि परिसर अतिशय सुंदर आहे . जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम आहे. या ठिकाणाचं कितीही वर्णन केलं तरी अपुरं आहे .








यावेळी परत निघताना खूप समाधानी वाटत होतं . एक अविस्मरणीय अनुभव होता . परत जाउन सगळं नेहमीप्रमाणे सुरु होणारच होतं , पण निसर्गाच्या सहवासातले हे दोन दिवस कसे गेले ते कळलंच नाही .

Friday, 5 December 2014

जगणं

तुझ्या पाऊलखुणा शोधतेय
समुद्राच्या लाटांनी लपवलेल्या
आपण एकत्र चालत असताना उमटलेल्या

मला ओळखू येत नाही आहेत आता त्या वाटा 
ज्या आपण एकत्र तुडवल्या होत्या
आता फक्त माझीच पावलं उमटलेली दिसतात धुळीवर

आपण एकत्र लावलेला मोगरा फुलत नाही आता
त्याला पण एकटं वाटत रे ,
माझ्यासारखं

आपलं जग सुनं सुनं आहे आता ,
तुझ्या हाका नाहीत  , कुरवाळणं नाही
तुझा स्पर्श नाही

सगळं थांबलाय , स्तब्ध झालंय , माझ्यासारखं
ये ना तू , परत एकदा , सगळं जिवंत करायला
माझं जगणं परत सुरु करायला 

Wednesday, 26 November 2014

माझं मन

बेधुंद मनाच्या शिडकाव्यात लपलेलं प्रेम
हिरवाईच्या कणाकणात दडलेलं प्रेम
बेभान वाऱ्यात वहावंत चाललेल्या नौकेसारखं माझं मन
मनाच्या तळाशी असणारे प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या उत्तरदाखंल असणारं तुझं स्मित...
मन व्याकुळ होतं, जगण्याचे बंध सांभाळताना घायाळ होतं
तुझ्या प्रेमाची फुंकर लागते त्याला जगताना ... 
मनापासून जगण्यासाठी नाहीतंर रहातं एकाकी...
 उदासवाणं... 
मन माझं

Sunday, 23 November 2014

तुझं माझं नातं

एका शांत ठिकाणी , एक संध्याकाळ
तुझ्या माझ्या नात्यामधे गुंतलेली,
बरोबर आहे तो समुद्र, अथांग, अभंग
मनाच्या अस्वस्थतेत आज शांतता आहे
जशी त्याच्या पोटात असते
जशी बुध्दाच्या चेहर्यावर असते
ती निरामय निरव शांतता 
आतुन येत माझ्या चेहर्यावर पसरलेली
तुझ्या माझ्या नात्याला पुर्ण करणारी

Monday, 17 November 2014

मनं वाळत चालली आहेत..

मनं वाळत चालली आहेत..
झाडांमधला हिरवेपणा लोप पावतो आहे तशी
मनं वाळत चालली आहेत... 
नात्यांमध्ये अडकण नको की जबाबदारी नको
मनं वाळत चालली आहेत 
फ़क्त माझं, मला चा घोष वाढत चालला आहे
मनं वाळत चालली आहेत...
रस्त्यांवरच्या फटक्या पोरांकड नाक उडवून बघताना 
मनं वाळत चालली आहेत
अपघाताचे फोटो घेण्यात धन्यता मानणारी 
मनं वाळत चालली आहेत
जीवघेण्या स्पर्धांमध्ये स्वत:च्या २-३ वर्षाच्या मुलांना ढकलणारी 
मनं वाळत चालली आहेत
मुलांचे बोबडे बोल ऐकण्यापेक्षा टीव्ही वरच्या मालिकांमध्ये नाहीतर खरेदी मध्ये गुंतलेली 
मनं वाळत चालली आहेत
बलात्काराच्या बातम्या बघुन आपल्या पर्यन्त नाही ना पोहोचल?म्हणत 
मनं वाळत चालली आहेत
थंड पडलेल्या रक्ताने एक एक दिवस ढकलत 
मनं वाळत चालली आहेत
जगण्याचा अर्थ हरवत असतानाच,
दुकानापुढे बसलेल्या म्हाताऱ्या आज्जीला जेव्हा जेवायला म्हणून शर्वरी २० रुपये देते, सहजपणे...
तेव्हा वाटतं मन वाळली नाहीत अजुन, ओलावा आहे 
थोड पाणी घालायची गरज आहे...

Wednesday, 12 November 2014

शुन्य

मोबाईल चा एक चौकोन
मनावर आणि भावनांवर राज्य गाजवणारा
मनाला मोहात पाडणारा
मनाच्या अस्वस्थतेच्या कारणांपैकी एक
एका खोटारड्या जगाचं दार
कुणी कुणाच नाही , पण सगळे बांधले गेलेले
बहुतेक सगळा दिखाऊपणा
काय उरतं हातातं ? एक भलं मोठ शुन्य
स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न घेवून उभं असलेलं शुन्य
मला या शून्यात अडकल्यासारखं वाटतंय
काहीच घडत नसताना पण बरंच घडतंय
पण जे घडतंय ते त्रासदायक होत
विचार , विचार आणि नुसते विचार
ज्यातुन हातात येत शुन्य
याच शून्यातून सगळ उभ करायची रग कुठ गेली?
हेच शुन्य त्रासदायक होतंय आता
हे शुन्य नको , हे अस्तित्व नको
आपण आपल्याला नकोसे होतो तेव्हा काय होतं ?


Friday, 7 November 2014

एक गारुडी

एक गारुडी , मनावर गारुड करणारा
एक सूर्यास्त , मनावर मोहिनी घालणारा
आणि दोन्ही जर एकत्र बघायला मिळणार असेल तर ? हा गारुडी म्हणजे अजून कुणी नाही तर सगळीकडे व्यापून राहिलेला समुद्र आहे .अशा या समुद्रात बुडणारा सुर्य पाहणे म्हणजे सौंदर्याची परिसीमा . 
सगळ्या धावपळीतून सुटका झाली कि या अशा सगळ्या गोष्टींची ओढ लागते मनाला . सगळीकडे शांतता असावी , मनाचे सगळे लाड पुरवावेत असा वाटत रहातं . आणि मनाला ओढ लागते समुद्राची , समुद्राच्या गाजेची , त्या खारट वासाची आणि पाय रुतणार्य पिवळसर पांढर्या वाळू ची .
मला समुद्र पाहताक्षणीच आवडला होता , अगदी प्रेमात पडले होते म्हणा ना . पण तो मनामध्ये खोल जाउन बसला जेव्हा माझ्या मोठ्या आत्याची बदली वेंगुर्ल्याला झाली तेव्हा . उभादांड्याला रहायची ती . तिथून समुद्र अगदी हाकेच्या अंतरावर . रात्री झोपताना त्याची गाज ऐकत झोपायची . त्या वेळी त्याच्याइतक जवळचं कुणीच वाटल नाही . खारदांड्याचा समुद्र . स्वच्छ समुद्र किनारा , आजूबाजूला मासळीचा वास , आणि समोर पसरलेला अफाट समुद्र . त्याच वर्णन करायला शब्द खूप तोडके आहेत . मी सकाळ संध्याकाळ समुद्रावर जायची . कधी आत्याबरोबर , तर कधी आत्येबहिणी बरोबर , पण रोज त्याला भेटायचा नेम कधी चुकला नाही . तिथल्या स्वच्छ किनार्यावर भटकताना मजा यायची. तिथे मिळणारे शिंपले गोळा करून रोज घरी घेवून यायचे मी. आत्या ज्यांच्याकडे रहायची त्यांना ते जिवंत शिपले दिलेले आठवतात मला . त्याची चटणी करून खातात असा सांगितलं होतं त्यांनी. त्या काकूंनी शिंपल्याचा वास जावा म्हणून ते अगदी साबणात वगैरे घालून धुवून दिले होते मला. अर्थात, त्याचा फारसा उपयोग झाला न्हवता, त्याचा वास काही कमी झाला न्हवता. पुढे ते शिंपले वापरून मी एक भिंतीवर टांगायला चित्र बनवलं आणि बरेचसे एक मातीच्या सुरई वरती वापरले होते .सगळ्यात जास्त आवडलं होतं ते वेंगुर्ल्याच लाईट हॉउस . तिथे वर पर्यंत चालत जायचं आणि मग खाली मोठ्या मोठ्या दगडांवर आपटणार्या त्याच्या लाटा बघायच्या .
अगदी तसाच तो वरळी ला पण भेटायचा . असेल प्रेमिकांचा साक्षी , पण माझ्यासाठी मात्र तोच एक प्रेमाच रूप होऊन यायचा . मी आणि स्मिता खूप वेळा जायचो वरळी ला , सी लिंक ने . तिथे बुडणाऱ्या सूर्याला पाहून बरेचदा उदास वाटायचं , पण त्याच बरोबर त्याच भव्य रूप पण जाणवत राहायचं. बघता बघता तो सूर्याचा लालसर गोळा समुद्रात बुडुन जायचा. आणि मग समोर असायचा तो संधीप्रकाशातला प्रचंड समुद्र . आजूबाजूला काय आहे याच भान विसरलं जायचं. काय काय दडलं असेल त्याच्या पोटात , अजून कुणालाही पूर्णपणे माहिती नाही . आपण किती लहान आहोत त्याच्यापुढे याची मात्र जाणीव खूप तीव्रतेने करून द्यायचा.  तो . कशाचा माज करायचा त्याच्यापुढे? एवढा प्रचंड आहे तो कि तो माझ्याबरोबर आहे यानेच खूप ताजतवानं होतं मन. निसर्गाची एक महान कलाकृती आहे तो .
खरतर मला पाण्याची भीती खूप वाटते , पण समुद्राची वाटली नाही . काशीद ला समुद्रात शर्वरी बरोबर खेळताना आलेल्या मजेची अजून कशाशीही तुलना नाही होवू शकंत. अर्थात तिथ मी माझी एक अंगठी त्याला देवून आले होते . माझी आठवण  राहावी म्हणून :)
असाच तो भेटला मालवणला. खेळांच्या गर्दीत अडकलेला , स्वताचा छोटासा तुकडा त्याने सगळ्यांना खेळता याव म्हणून देवु केलेला . पण त्या स्वच्छ पाण्याने पण मनाला मोह पडतोच. त्या तुकड्याच्या पलीकडे तो तसाच आहे अफाट , अथांग , मनावर गारुड करणारा . त्याच्यावरची नजर हटत नाही . प्रत्येक वेळी नव्याने समोर येणारा तो , मोहात पडतोच . क्वचितच कुणी असेल ज्याला त्याचा सौंदर्य , भव्यपणा जाणवला नसेल .
काहीही असेल तरी , एकदा मला सफर करायची आहे , एकटीने . अथांग समुद्रात फक्त मी एकटी . विचाराने थरकाप उडतो पण थ्रिल पण वाटतं .

  

Thursday, 6 November 2014

उबदार

ऑफिस च्या दुपारच्या वेळी मनाला कधीतरी स्पर्शून जाते ती झुळूक…. 
सहज मन भूतकाळात शिरतं  आठवत राहतो तो आजोबांचा (आईच्या वडिलांचा) वाडा 
त्या  कैक अशा दुपारच्या वेळा 
अतिशय शांत वातावरणात , दुपारच्या उन्हाचे कवडसे झेलत खिडकीतुन  बघणारी मी 
छोटीशी ४-५ वर्षांची , तशीच दिसतेय 
मधलं अंगण … एका बाजूला खोल्या … खोल्याच, घरं नाही म्हणता येत तर दुसर्या बाजूला भिंत 
लांबच लांब पसरलेलं घर 
त्या अंगणात मधून मधून डोकं वर काढणारे दगड 
(खेळता खेळता कधीतरी टोचायचे पण… )
पुढच्या बाजूच्या वरच्या मजल्यामुळे अंगणात पडणारी सावली , आणि तिथे वाजणारी थंडी 
अंगणात एका बाजूला आज्जीने लावलेले पेरू आणि आवळे 
स्वस्तिकाच्या फुलांच झाड 
तर अंगणाच्या शेवटी मागच्या बाजूला प्राजक्त 
प्राजक्ताच्या समोर आजीचा वरच्या मजल्यावरचा शिवणाचा क्लास "मिनरा" नावाचा 
आजीच्या तिन्ही मुलीच्या  अक्षरापासून असलेला 
त्या क्लास ची खोली भली लांबडी शिवणाच्या मशीन नि भरलेली 
आजी ला म्हशीने धडक दिल्यापासून ती काही वरती जात नाही 
त्यामुळं वरती राज्य माझचं 
सगळ्यापासून लपून दारच कुलूप न काढता , शेजारच्या खोलीच्या छपरातून खिडकी पकडून स्वताला आत ढकलून देणं हा आवडता छंद 
नाहीतर अंगणामध्ये बसणं , ऊन खात 
अलीकडे असा सारखं होतं माझं 
आजोबा आणि वाडा सारखे आठवत राहतात 
आता तो वाडा नाहीये तर तीन वेगवेगळे बंगले उभे आहेत 
त्यातलाच एक आईचा पण आहे , 
तरीपण  स्वप्नात येताना तो जुना वाडाच येतो , येताना मात्र उबदार झुळूक घेऊन येतो 

Monday, 3 November 2014

एक स्वप्न

एक सकाळ ,
थोडीशी धुक्यात गुरफटलेली ,
थंडीने हात दिलेली,
मन प्रसन्न करणारी ,
आजूबाजूला येणारे पक्ष्यांचे आवाज ,
पायाखाली असणारी मातीची पायवाट,
त्या पायवाटेच्या शेवटी दिसणारी माती आणि शेणानं सारवलेली झोपडी
पायवाटेच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडांची दाटी
त्या झाडांच्या  पायथ्याशी फुललेली रान फुल
या सगळ्यात येणारा सकाळचा रानाचा गंध , थोडा ओल्या मातीचा आणि थोडा झाडांचा
पायाखाली चुरडली जाणारी ती वळलेली पानं ,काटक्या , फुलं
सगळ्याचा मनावर चढलेला अंमल
झोपडीत उकळी घेणारा आल्याचा चहा
आताच जाणवतो आहे मनाला
त्या झोपडीच्या अवतीभोवती थोडं साफ केलेलं अंगण
अंगणाच्या भोवतीने लावलेले गावठी गुलाब
त्याच्या मागे असलेली विहीर
त्यावर कुरकुरणारा रहाट
अधे मध्ये पाणी काढल्याचा आवाज
सकाळ थोडी वर येतेय आता , धुक्यातून , थंडीतून
पण फक्त वाढणारा उजेड जाणवून देतोय सुर्यानारायणाचं वरती येण
नाहीतर इथल्या झाडीत उजेड सदा हरवल्यासारखा सापडतो
पक्षी आता आपल्या कामाला निघून गेलेत
मी मात्र शांत
आजूबाजूला सगळ्या शांततेत हरवलेली
एखाद्या योग्याला सुद्धा मिळणार नाही अशी जागा … माझ्या मनातली … माझ्या स्वप्नातली

Wednesday, 17 September 2014

स्वप्नं

स्वप्नं तुझी  माझी , इथे असलेल्या प्रत्येकाची
काही छोटी छोटी, तर काही मोठी मोठी
काही एकमेंकात मिसळणारी, तर काही स्वतंत्र अस्तित्व असणारी 
काही मागच्या पानावरून सुरु होणारी , तर काही रोज नवीन पान उघडणारी
काही चाफ्याच्या सुगंधाने न्हायलेली , तर काही रातराणीच्या वासाने धुंदावलेली
काही रोजच्या जगण्यातली , तर काही उद्याची
काही  साधी सरळ , तर काही गुंतागुंतीची
काही मनातून आलेली , तर काही पूर्णपणे अनोळखी
काही भूतांची,  तर काही देवांची
काही नवीन घरांची , तर काही जुन्या घरातल्या आठवणींची
काही खोल काळोखातून आलेली, तर काही दिवसाच्या उजेडातली
काही पहाटेच्या प्रजाक्तांच्या फुलांची,  तर काही संध्याकाळच्या दिव्यांची
काही रेंगाळणारी , तर काही पटकन संपणारी
काही लक्षात राहणारी , तर काही पटकन विसरली जाणारी
काही ठसा उमटवणारी , तर काही आठवावी लागणारी
काही मन प्रसन्न करणारी , तर काही उदास करणारी
काही मन हळवं करणारी , तर काही राग आणणारी
काही कल्पना देणारी, तर काही चटके देणारी
काही  वास्तवतेच्या निखार्यांवर भाजलेली , तर काही पर्यांच्या राज्यात पोहोचलेली
काही मन मोहरून टाकणारी , तर काही जखमेवर मीठ चोळणारी
काही भरारी घेणारी तर काही पंख तुटलेली , असहाय्य
स्वप्नं तुझी  माझी , इथे असलेल्या प्रत्येकाची , प्रत्येकाच्या जगण्याचा भाग असलेली , कल्पनांना बळ देणारी, कधी जगण्याचा अर्थ उलगडणारी , तर कधी प्रत्यक्षात उतरणारी

स्वप्नं तुझी  माझी, कधी एकत्र होणारी तर कधी वेगवेगळया वाटांवर जाणारी

स्वप्नं तुझी  माझी, नवीन विश्व निर्माण करणारी , जगण्याचा बंध घट्ट करणारी.

याच स्वप्नांना नाव पण वेगवेगळी आहेत , कुणी त्याला ध्येय म्हणत तर कुणी पुढचा विचार , माझ्यासाठी मात्र ते पण स्वप्नच असतं . 

Monday, 15 September 2014

वाढदिवस - १० सप्टेंबर


या वर्षी शर्वरीच वाढदिवस काही तरी वेगळ्या पद्धतीने साजरा करावा असा ठरवलं. पण कराव हे काही सुचत नव्हतं. तीच किशोर वय सुरु होणार आता मग काहीतरी वेगळ सेलेब्रेशन असाव असा मला वाटत होतं . त्यात मागच्या दोन वर्षापासून तिला तिचा वाढदिवस क्लब हाउस मध्ये साजरा करायचा होता . यावर्षी ठरवलं कि तो तसाच करू . पण वेळ अगदी कमी होता. मागच्या वर्षी तिला जसं आश्चर्यचकित केलं होतं, यावर्षी मात्र तसं करायचं नाही असं ठरवलं . तयारी करताना तिची मदत घ्यायची , म्हणजे तिला पण आपण मदत केल्याच समाधान मिळेल आणि मला पण मदत होईल असा दुहेरी विचार केला . 
कामाला सुरवात करण्याआधी कामाची यादी तयार केली . सगळ्यात आधी मैत्रिणींची यादी केली. हो नाही करत करत सगळ्या मिळून १८ मुली झाल्या , आणि माझा एक मित्र आणि त्याची बायको आणि एक मैत्रीण , तिच्या मुली आणि तिचा नवरा , माझा भाऊ - वहिनी , असे सगळे मिळून जवळ जवळ २०-२५ जणांची यादी तयार झाली . 
सगळ्यात आधी केक कसा असावा हे काही माझ ठरत नव्हत , आणि श्रद्धा मदतीला आली माझ्या . अंधेरील्या 'स्वीट आर्ट ' बेकारी तून केक आणायचं ठरवलं . स्वीट  आर्ट च्या शेहला ने मला मदत केली . तिने पाठवलेल्या एक डिझाईन चा केक मी सांगितला , हा मात्र शर्वरी साठी सरप्राईज होता . 
 मग कार्यक्रम कसा करावा यावर आम्ही चर्चा केली , मला नेल आर्ट स्पर्धा ठेवावी असं वाटत होतं . या वयामध्ये मुलींना मेकअप च आकर्षण जर जास्त असतं , त्यामुळे या स्पर्धेत त्यांना मजा येईल असं वाटलं . त्यानंतर हौजी आणि संगीत खुर्ची खेळायची ठरवलं . या सगळ्यासाठी बक्षिसं ठरवली आणि सगळ्यात चांगल्या ड्रेस साठी सुद्धा बक्षीस ठेवलं . 
आता मात्र परतीच्या गिफ्ट आणि या स्पर्धान्साठीच्या गिफ्ट साठी काय घ्याव यावर विचार सुरु केला . श्रेयोसीने (ऑफिस मधील मैत्रीण)  खूप मदत केली . आम्ही परतीच गिफ्ट म्हणून लिपस्टिक , काजळ आणि नेलपेंट ठरवलं . ६ तारखेला मी आणि श्रेयोसी ने जाउन सगळी खरेदी केली . नेल आर्ट मध्ये जी जोडी जिंकेल त्यांना कानातल्या रिंगा आणि हौजी आणि चांगल्या ड्रेस साठी केसात लावायचे बीड्स आणि हेअरबँड घेतला. नेल आर्ट च समान घेतलं सगळं . आता सगळ पॅक
करायचं होतं. पण वेळचं नव्हता , ७ तारखेला काही कामासाठी पुण्याला जायचं ठरलं आणि मला मात्र आता सगळ कसं होणार  याच टेन्शन यायला लागलं होतं.   
त्यातच यावर्षी वाढदिवस विशेष असल्यामुळे सगळ्यांना आमंत्रण पत्रिका देवू असा ठरवलं , पण मला माझ्या मनासारखी स्टिकर्स मिळेनात , शेवटी ऑनलाईन मागवली , पण ती वेळेत मिळतील अशी खात्री वाटत नव्हती . वाढदिवस होता १०सप्टेम्बर ला आणि ८ तारखेला दुपारी माझ्या हातात ती  स्टिकर्स मिळाली . जवळ जवळ १७ आमंत्रण तयार करायची होती , मग काय, ऑफिस मधून आल्यावर जे करायला बसले ते २ तासामध्ये संपवलं .
आमंत्रण पत्रिका 
 शर्वरी ते घेवून लगेच पळाली . शाळेतल्या मैत्रीणी  सोडून बाकी सगळ्यांना आमंत्रण देवून आली. मी मात्र आता गिफ्ट पॅक करत बसले . सगळ पॅकींग झालच नाही.
९ सप्टेंबर उजाडला आणि मला मात्र कधी एकदा हे सगळ काम संपवते असं झालं . त्यातच शर्वरी साठी वाढदिवसाचा ड्रेस घ्यायचा राहिला होता. संध्याकाळी घरी आल्यावर आधी हातातलं काम संपवलं आणि मग आम्ही दोघी ड्रेस घ्यायला बाहेर पडलो. पहिल्यांदाच जाणीव झाली कि आपल्या लेकीची आवड निवड बदलतेय आता. मला जे आवडत होतं त्याला ती नको म्हणत होती आणि तिला जे आवडत होतं त्याला मी . असं करत करत साधारण एका तासाभरात तिने तिच्या आवडीचा ड्रेस घेतलाच.
रात्री १२ वाजता शर्वरीला मिळालेला चोकोलेट बुके 
१० तारखेला मात्र ती उठायच्या आधी आम्हाला हॉल सजवायचा होता. सकाळी लवकर उठून फुगे फुगवले . यावेळेची कलर थीम होती हलका गुलाबी आणि पांढरा रंग . फुगे लावून झाल्यावर ग्रीटिंग कार्ड्स च्या पताका तयार केल्या आणि त्या पण हॉल मध्ये लावल्या . हॉल  एकदम सजला . शर्वरी ला तो खूप आवडला . आज शाळेला जायचं नाही म्हणत शेवटी तयार झाली , मग शाळेचा ड्रेस घालावा का नाही यावर थोडी चर्चा होवून , शेवटी शाळेचाच ड्रेस घालायचं ठरवलं. 
मी मात्र स्मिता ला सुट्टी घ्यायला लावली . मला मदतीची खूप गरज होती. उपेंद्र आधीच छोले - पुरी सांगून आला होता. शर्वरी शाळेला गेल्यावर , मी आणि स्मिता जाऊन बाकीची खरेदी करून आलो . नेमक त्या दिवशी ठाण्यामध्ये भयानक ट्राफिक होतं . आम्हाला यायला ३ वाजले . तोपर्यंत उपेंद्र पण आला ऑफिस मधून . क्लब हाउस चा हॉल मोठा असल्याने फक्त भरपूर फुगे लावावेत असा ठरलं . त्याप्रमाणे आम्ही हॉल सजवला . जवळ जवळ ५० फुगे लावले . 


शर्वरी साधारण ७ वाजता शाळेतून परत आली , आणि आम्ही मुलीना ७.३०ला बोलावले होते .


सगळेच जण  फटाफट तयार होवून हॉल वर गेलो. सगळ्या मुली  येईपर्यंत ८-८.१५ झाले . खूप बडबड चालली होती . जी नवीन मैत्रीण येईल तिला बाकीच्या सगळ्याजणी , 'ओ हो , चमकली चमकली ' करून चिडवत होत्या .


त्याचा दंगा बघून मजा येत होती . जशा सगळ्या जमल्या तसा सगळ्यात आधी केक कापला .
                                        

आणि नेल आर्ट स्पर्धा सुरु केली . कारण हे सगळ करेपर्यंतच ८. ३० झाले होते . नेल आर्टचं सगळं सामान मध्ये ठेवलं आणि मुलीना गोल करून बसवलं , अर्ध्या तसाचा वेळ दिला आणि प्रत्येकीला एकाच हाताची नखं रंगवायला सांगितली . मुली धमाल करत होत्या . नेलपेंट लावत होत्या , काढत होत्या . असं करत करत अर्धा तास कधी संपला ते कळाल नाही .

 त्यांना सांगितलं आपण कोण जिंकाल ते नंतर बघू , आता तुम्ही हौजी खेळा . त्या मध्ये त्यांचा दंगा सुरु झाला आणि आम्ही डिशेस भरायला  सुरवात केली .



मुलींचं खाण आणि होऊझी दोन्ही एकदमच संपलं , त्यांच्यात ज्या जिंकल्या त्यांना बक्षिसं मिळाली .
 संगीत खुर्ची सुरु करायच्या आधी त्यांची नेल आर्ट्स बघितली आणि त्यातल्या जिंकलेल्या जोडीला बक्षीस दिलं . उशीर झाला असल्यामुळे शर्वरीच्या काही मैत्रिणी घरी जायला निघाल्या होत्या म्हणून मग सगळ्यांनाच परतीच्या गिफ्ट्स द्यायला सुरवात केली . प्रत्येक गिफ्ट वर नाव असल्यामुळे काहीही गोंधळ झाला नाही .
आता मात्र त्यांनी संगीत खुर्ची खेळायला सुरवात केली . धमाल करत होत्या सगळ्या . संगीत खुर्ची मध्ये जी जिंकली तिला बक्षीस दिलं आणि मग सगळ्याच आपापल्या घरी निघाल्या . सगळ आवरून आम्ही घरी परत आलो आणि मग शर्वरी ला मिळालेल्या सगळ्या गिफ्ट्स उघडायची घाई झाली . सगळ्याच गिफ्ट्स खूप छान होत्या , त्यामुळ ती एकदम खुश झाली . यावर्षीच सेलेब्रेशन तिला खूप आवडलं आणि माझा जीव भांड्यात पडला . 

Friday, 12 September 2014

रिकाम मन

एखादं काम पूर्ण झाल्यावर येणारं रिकामपण , मनाला व्यापून टाकतं. जस नवीन येणारं काम व्यापातं तसं . पण नवीन कामामध्ये ते पूर्ण करण्याची झिंग असते तशी मनाच्या रिकामपणात नसते, असतो तो भकासपणा, उदासी . खूप भीती वाटते मला मनाच्या या रिकामपणाची. काहीतरी हरवतं आहे असा वाटत राहतं, आणि नक्की काय होत आहे ते काळत नाही. मग बेचैन व्हायला होतं , जगण अवघड आहे असा वाटायला लागतं. मी तुझ्याकडे यायचा प्रयत्न करते , पण तू पण हरवून गेलेला असतोस . आजूबाजूला दाट धुक असतं , वाट सापडत नाही.. डोळ्यापुढे फक्त अंधार असतो , पुढे काय कराव ते उमगत नाही . यातून बाहेर पडणार हे माहिती असत, पण बाहेर येण्यासाठी हातात काहीतरी काम याव लागतं, मन त्यामध्ये गुंताव लागतं . तसा झाल, तरच परत एकदा जगायची उमेद वाढते , जग परत एकदा सुंदर होत आणि मनामध्ये मला तू पण सापडतोस .
पण हे सगळ खूप पुढचं आहे. आत्ता मन रिकाम आहे, काहीतरी शोधतं आहे , हात रिकामे असल्याची भावना जास्त तीव्र आहे . पूर्ण झालेल्या कामाच्या समाधानापेक्षा आताच रिकामपण भयानक आहे . काम पूर्ण झाल्याच समाधान १-२ दिवस टिकतं , पण नंतर येणारी पोकळी खायला उठते . खूप एकटं एकटं वाटत राहतं. सगळे भोवती असून पण एकटेपण जात नाही . हे एकटेपण नको वाटत  . तू तरी बरोबर रहावस अस वाटत राहत …. मी शोधते तुला , तुझा हात पकडायचा प्रयत्न करते, पण तू पण सुट्टी घेतल्यासारखा निघून गेलेला असतोस . तू असशील तर मग माझ मन रिकाम होणारच नाही हे माहिती असल्यासारखा. 
आता वाट बघतेय तुझी , तू आलास कि एकटं वाटणार नाही , सगळ भरून जाइल. मला माहिती आहे, तू येशील तेव्हा काहीतरी नवीन काम सोबत आणशिलचं , मग परत नवीन काहीतरी सुरु होईल … नवीन काम , नवीन झिंग आणि परत त्यात बुडणं होईलंच.


Saturday, 6 September 2014

शर्वरीचा वाढदिवस - 2013

शर्वरीचा वाढदिवस जवळ येतो आहे तसतसं मला मी मागच्या वर्षी केलेलं सेलेब्रेशन आठवलं . मुलं किती पटपट मोठी होतातं. वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही . मागच्या वर्षी तिने वयाची १२ वर्षे पूर्ण केली म्हणून काहीतरी वेगळ कारावसं ठरवलं होतं . बराच विचार करून एक कल्पना सुचली , तिला १२ गिफ्ट द्यायच्या , साधारण १-११/२ तासाच्या अंतराने आणि त्याबरोबर छोटी कार्ड्स पण. आणि ती १३ मध्ये प्रवेश करणार म्हणून एक स्पेशल गिफ्ट पण.

कार्ड्स आणि मेसेजेस
 

 





     
          



           











  

     


एकदा हि कल्पना ठरल्यावर मग तयारी सुरु झाली . आधी लिस्ट केली काय काय घ्याव याची
१. ड्रेस १
२. छोट दागिने ठेवायचं कपाट
३. हेअर पिन्स
४. पेंडंत आणि चेन
५. ब्रेसलेट
६. कानातले टोप्स
७. ड्रेस २
८. बो
९. हेअर बंड
१०. नेकलेस
११. पर्स
१२. कंगवा
आणि स्पेशल म्हणून चिंटू ची पुस्तकं
लिस्ट पण तयार झाली. मग शर्वरीला न काळता , रोज संध्याकाळी जाउन खरेदी सुरु झाली . आणि माग शर्वरी झोपल्यावर त्या सगळ्या गिफ्ट चं पकिंग. सगळ नीट होईल का याची जरा धाकधूक होतीच. पण सगळ व्यवस्थित तयार झालं .





 ग्रीटिंग कार्ड वरती लिहायच्या मजकुरासाठी वैभु आणि श्रेयोसी ने मदत केली .  तसाच आम्ही एक वेळापत्रक पण तयार केलं , कितीवाजता कोणती गिफ्ट आणि कोणतं कार्ड द्यायचं याचं .





शेवटी ९ सप्टेंबर ला सगळ तयार होत . रात्री १२ वाजता तिला चोकलेट,केक  आणि टेडी घरी येईल याची पण व्यवस्था झाली . पण नेमकी शर्वरी लवकर झोपली .
सकाळी लवकरच उठली जरा , ती उठायच्या आधी तिच्या बेडवर टेडी आणि चोकॉलेट ठेवून दिले होते ,


उठल्या उठल्या तिची नजर तिथेच गेली आधी . मग काय ! मादाम खुश एकदम !







आणि मग आमचा गिफ्ट द्यायचा सिलसिला सुरु झाला . दर १-११/२ तासाने एक कार्ड आणि गिफ्ट तिला देत होते . तिला खूप गम्मत वाटत होती .





त्यातच तिच्या मैत्रीणीना घेवून आम्ही लंच आणि सिनेमा बघायचा कार्यक्रम ठरवला होता. तशातच तिला अधे मध्ये गिफ्ट्स मिळत होत्या .
तिचा आनंद बघून मला पण खूप मज येत होती . मागचा आठवडा जी काही धावपळ झाली त्याच सार्थक झाल्यासारख वाटलं .
पण, त्यामुळे पुढचे वाढदिवस पण तसेच व्हायला हवेत असा पण वाटलं . आता पण तिचा वाढदिवस जवळ आला आहे . एक कल्पना आहे मनात , त्याची धावपळ सुरु आहे सध्या. त्याबद्दल सगळ झालं कि मग लिहेन.