Tuesday 20 December 2016

तुझ्यापाशी व्यक्त होताना शब्द नाही सापडत आता
मनातल्या आवेगाला वाट नाही मिळत आता

तुझ्या अस्तित्वाने भरून गेलेल्या आभाळाचा तुकडा हवाय
तुझ्यामध्ये व्यक्त होण्यासाठी तुझी साथ हवीये

कोंडून ठेवलेलं आभाळ व्यक्त व्हायला धडपडतंय
मनाच्या पिंजऱ्यातुन मुक्त्तता मगतंय

 फक्त एकदा साथ दे त्याला
त्याच आभाळच जगण जगू दे त्याला

त्याला तुझी साथ दे
तुझ्या अस्तित्वाचा आधार दे
व्यक्त होण्यासाठी तुझ्या मनाचा कोपरा दे 

Wednesday 19 October 2016

"आज तू ये स्वप्नांत" , ती म्हणाली
तो हसला तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला , "मग त्या स्वप्नात येणाऱ्या फुलपाखरांचं काय? "
"तू फुलपाखरू बनून ये", ती लाडाने म्हणाली , " मी पण फुलपाखरू असेन मग . आपण खूप फिरू. या फुलावरून त्या फुलावर . आवडलेल्या फुलावर बसून गप्पा मारू . अगदी अगदी थकेपर्यँत उडत राही ".
तो हसला . त्याच खूप प्रेम होत तिच्यावर , तिच्या हळवेपणावर , तिच्या बालिशपणावर, तीच्या वेडेपणावर आणि महत्वाचं म्हणजे  त्याच्यावर असणाऱ्या प्रेमावर . हळवा झाला तो .
तिच्या डोक्यावर हळुवार थोपटून निघाला . तसा त्याचा हात पकडून त्याच्या बोटांवरून आपली बोट फिरवत ती म्हणाली , " ये ना , फुलपाखरांना कॅन्सर होत नाही . एक पूर्ण आयुष्य मिळेल आपल्याला ".
घशाशी आलेला हुंदका दाबत , कसाबसा निघतो म्हणत तो हॉस्पिटल च्या बाहेर पडला

Monday 13 June 2016

ती आजीच्या घरातली दुपार
पायऱ्यांवर पडलेले उन्हाचे कवडसे
शांत असलेले नळ
घराघरात पसरलेली संथ शांतता
मधूनच ऐकु येणारी कुकर ची शिट्टी

अशीच पाय पसरून बसलेली दुपार
वरच्या पायऱ्यांवरुन घरंगळत आलेली
उन्हाच्या कवडशात पाय ताणून झोपलेली मनी
दबकत पावलांनी चालणारी लुका छुपी नाहीतर भातुकली
आजीच्या स्वयंपाकघरातून चोरून आणलेले शेंगदाणे आणी गुळ
परसदाराचे तोडलेले पेरू आणी आवळे
त्याला लावून खायला आणलेले तिखट मीठ
हळू आवाजात मारलेल्या गप्पा

अशीच मरगळलेली दुपार
मरगळलेली वाहन विश्रांतीच्या तयारीत असलेली
बंद व्हायच्या बेतात असणारी दुकानं
समोरच्या पठाण काकांच्या दुकानातून जाऊन आणलेल्या गोळ्या
त्याची वाटणी , हळू आवाजातली भांडण आणि मग मारामारी

सगळं कसा लख्ख आठंवत
तुला दाखवावंस वाटतं
पण सगळंच कसं स्वप्नासारखं
दाखवता न येणार
सांगता सांगता काहीतरी निसटल्याची हुरहूर वाटायला लावणारं
हाताने पकडायला जावं तर विरून जाणार

एका शांत दुपारच चित्र , आजीच्या घरातलं



Thursday 25 February 2016

 तुझ्या श्वासांना ओठावर झेलायचं आहे मला
माझ्यातल्या तुला जग दाखवायचं आहे मला

तुझ्या भोवती रेंगाळणारं माझ जग
तुझ्या श्वासंवारती हिंदकळणारं माझ जग
तुझ्या ओठांच्या स्पर्शान वेडं होणारं माझ जग
तुझ्या कुशीत सामावणारं माझ जग

तुझ्या आवेगात झोकून द्यायचं आहे मला
माझ्यातल्या तुला जग दाखवायचं आहे मला

स्वतःला तुझ्यामध्ये विसरून जगायचं आहे मला
माझ्यातल्या तुला जग दाखवायचं आहे मला 

Wednesday 17 February 2016

तुझ्या आठवणींचा गुंता
गुंत्यात अडकलेली मी
सोडवावा म्हटल तर 
अजुनच अडकत जाणारी

सरळ कराव्या तर
ना सुरवात ना शेवट
सगळ्या एकमेकात अडकलेल्या

कापुन काढल्या परवा
आज बघितलं तर
तुझ्या आठवणींचा गुंता
गुंत्यात अडकलेली मी
--अनघा