Monday, 28 July 2014

श्रावण सोमवार

आज श्रावणातील पहिला सोमवार . उपवासाचा सोमवार , असा म्हणायचं कारण कि माझ्या लक्षात तो तसाच आहे . आता मी उपवास वगैरे काही करत नाही पण श्रावणातील सोमवार म्हटलं कि मला हेच आठवतं .

शाळेत असताना मला श्रावण सोमवार खूप आवडायचे. सकाळपासूनच काहीतरी वेगळ आहे हे जाणवत राहायचं . खूप छान वाटायचं , उगाचच. आईला जेवण बनवायचं नसल्यामुळे तर जास्तच छान वाटायचं . तिच्या भोवती भोवती करत राहायचे मग मी. ती पण  ओरडायची नाही अशा वेळी.  आम्ही कर्नाटकी ब्राह्मण म्हणजे सीमेवरचे , आमच्यात उपवासाला हळद न घालता केलेलं दडपे पोहे , शिरा किंवा कांदा आणि हळद न घालता केलेले उप्पीट चालतं. त्यामुळे त्यादिवशी सकाळी नेहमीच्या पोळी - भाजी ऐवजी असा काहीतरी असायचं आणि बरोबर साबुदाण्याची खिचडी वगैरे . दुपारी शाळेत खायला पण हेच असायचं . श्रावण सोमवारी आमची शाळा लवकर सुटायची , ४ वाजता .शाळेतून परत येताना घराघरातून येणाऱ्या वासानी आधीच खूप भूक लागलेली असायची. कधी एकदा घरी जाऊन जेवेन असा होवून जायचं .   त्या दिवशी आई-बाबा पण लवकर यायचे . आई आल्या आल्या स्वयंपाकाला लागायची . उपवास सोडायचा म्हणून थोडसं काहीतरी गोड बनवलेलं असायचं . बाबा देवाची पूजा करून नैवेद्य दाखवायचे आणि मग आम्ही जेवायचो . अगदी ६-६.३० वाजता जेवण होवून पण जायचं आमचं . मग आम्ही दंगा करायला मोकळे होवून जायचो . जेवण लवकर झाल्यामुळे झोपेपर्यंत परत भूक लागायची . पण उपवास सोडला आहे ना ? मग आता काही खायचं नाही असा आई दटावायची, पण अगदी झोपताना थोडंस दुध द्यायची.
आजही श्रावण सोमवार येतोच पण आता तो वेगळा वाटत नाही . रोजच्या सारखाच एक दिवस , नेहमीसारखाच आठवड्याची सुरवात करणारा दिवस. आजच्यासारख कधीतरी जाणवत अरे तसा सोमवार हवा , वाट बघायला लावणारा , उपवासाला पोहे आणि शिरा खायची इच्छा असणारा. लवकर घरी येवून जेवण करायला लावणारा , असा श्रावण सोमवार , हरवलेला .

2 comments:

  1. गेल्या दोन दशकातील सर्वच क्षेञातील संक्रमणे फारच वेगाने झाली....तुमच्या लेखातून भूतकाळात सोनेरी क्षण ...प्रत्येकाला आपल्या बालपणात डोकवायला भाग पाडतात....लेखातून येणाऱ्या वर्णनामुळे डोळ्यांसमोर प्रसंग उभा राहतो...अगदी सहजपणे ..ही तुमची लेखनशैली छानच...

    ReplyDelete