Monday, 11 August 2014

कळसुबाई

कळसुबाई , महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर ,समुद्र सपाटी पासून ५४०० फुट उंचीवर असणारं हे शिखर . दोन वर्षापूर्वी 'शिखर वेध ' बरोबर जायचं नक्की केला , पण आयत्यावेळी तब्येतीच्या कारणास्तव जाता आलं नाही . मनाला सारख लागून राहिलं , आपण कळसुबाई ला जाऊ शकलो नाही . या वर्षी ठरवलं होतचं, काहीही झाल तरी कळसुबाई चा ट्रेक करायचाच.
शिखर वेध च्या तिसर्या बॅच बरोबर जायचं ठरवलं , पण ऐनवेळी शर्वरीची तब्येत बिघडली आणि माझ जाणं परत रद्द झालं. मनात आल यावर्षी पण कळसुबाई आपल्या नशिबात दिसत नाही , म्हणून मग पेब फोर्ट ला तरी जाऊ असा म्हणून तो ट्रेक ठरवला आणि त्याच दिवशी जगदीशचा (शिखरवेध चा सर्वेसर्वा) मेल आला कि चौथी बॅच १० ऑगस्ट ला जाणार आहे. मनात आलं पेब नको , कळसुबाई ला जाऊ . तसा सांगितलं जगदीशला . शेवटपर्यंत धाकधूक होती मनात . ऎनवेळी ट्रेक रद्द होईल अशी भीती वाटत राहिली . शर्वरी हट्ट धरून बसली , मी पण येते . जरा टेंशन आलं , आता कसा समजवायचं ? मग कशीतरी समजूत काढली . कळसुबाई ला जाण्यासाठी बस मला नाशिक - भिवंडी टोल नाक्याच्या इथे मला घेवून जाण्यासाठी थांबणार होती. आणि वेळ होती रात्री साधारण १२ वाजता ची . उपेंद्र सोडायला येणार होता. साधारण ११.४५ ला जगदीश ला फोन केला , तर त्यावेळी तो सायन ला होता येपर्यंत अजून अर्धा -पाऊण तास तरी सहज लागणार होता . तिथून तो ठाण्यात तीन हात नाक्याला अजून दोघांना घेवून मग मला घेण्यासाठी येणार होता. शेवटी १ वाजता बस आली आणि आम्ही निघालो . बस मध्ये डुलकी काढायचा प्रयत्न केला पण फारशी झोप लागली नाही. ४ वाजता आम्ही बारी ला पोहोचलो . आणि बस मधेच डुलकी काढली. हवा थंड होती . साधारण उजाडल्यावर एक एक जण खाली उतरायला लागला . आजुबाजूच वातावरण प्रसन्न होतं . हवा ढगाळ असली तरी , थंड असल्यामुळे मस्त वाटत होतं. आजूबाजूच्या घरातील बायका तिथेच असलेल्या बोर चे पाणी भरायला आल्या होत्या . त्या शांत वातावरणात तोच काय तो आवाज ऎकु येत होता. आमचा चहा आणि नाश्ता झाल्यावर आम्ही निघणार होतो.
साधारण ७ वाजता आम्ही सगळे आटोपून निघालो . सुरवातीला ओढ्यामधून जाताना पाणी खूप गार असल्याच जाणवलं . शेत पार केलं आणि आता चढायला सुरवात केली. मी अगदी हळू चढते , एक तर सवय नाही अज्जिबात त्यामुळे थकायला खूप चटकन होतं. दुसरं , फोटो काढायचे म्हणून कॅमेरा घेतला होता , त्याच ओझ होत खूप . हळू हळू वार जात होते , बाकी सगळे त्यामानान पटपट निघाले होते .चढताना काहीतरी खायला मिळेल म्हणून २-३ कुत्री पण आमच्या बरोबर चढायला लागली .
मी चढत असताना वाटेत थांबत होते, थांबले कि डासांसारखे किडे पायाला चावत होते. पायावर त्यामुळे लालसर वर्तुळ आणि जिथे तो किडा चावायाचा तिथे थोडा जास्त लाल असा दिसत होतं .  थोडी पुढे गेल्यावर , जगदीश ने कॅमेरा ब्याग घेतली , म्हणजे तरी मी पटपट चढेन असा वाटल त्याला . पण , आमची गोगलगाय काही आपला वेग बदलायला तयार नाही . असो , हा ट्रेक सोपा समजला जातो कारण वरपर्यंत जाण्यासाठी शिड्या आहेत, काही लोखंडाच्या तर काही दगडांच्या . पण अंतर जास्त आहे . आम्ही वर जात असताना अधे मध्ये येणारी पावसाची सर सगळ थंड करून सोडत होती . खूप छान वाटत होतं .डोक्यावरून जाणारे ते पावसाचे ढग अतिशय सुंदर दिसत होते . ट्रेक सोपा असला तरी लोखंडी शिडीवरून जाताना धडकी भरत होती. खाली पडलो तर कपाळमोक्ष नक्कीच होता . मधेच मी जगदीश ला विचारलं अजून किती बाकी आहे , तो म्हणाला आपण ६५ % पूर्ण केलं आहे . बापरे! एवढं चढून पण ६५% च?? मला वाटत होतं , फार तर १०-१५% राहिलं असेल आता. मध्ये मध्ये थांबत थांबत जात असताना आजूबाजूला निसर्गानं काय उधळण केली आहे ते दिसत होत. त्या शांत वातावरणात येणारा पक्ष्यांचा आवाज आणि दोन्ही बाजूला कोसळणाऱ्या धबधब्यांचा आवाज . आपण शहरात राहून कोणत्या गोष्टीना मुकतो हे खूप तीव्रतेन जाणवलं. साधारण ७०-७५ % ट्रेक पूर्ण झाल्यावर , थोडा थांबून शिडीवरून खाली बघितलं तर दरी दिसतचं नव्हती , सगळीकडे ढगांच पांघरूण दिसत होतं. फारतर १०-१२ फुटांपर्यंत झाडी दिसत होती , त्यापुढे ढगांच पांघरूण.
चढता चढता मधेच थांबून काढलेले  फोटो 



हा मेलेला साप आढळला . तसाच एक जिवंत साप पण दिसला होता . काहीतरी मटकावून शांत पडला होता . पोट बराच फुगलेलं होतं त्याचं . 













वरती जाताना वाटेत दोन ठिकाणी भजी आणि चहा विकणारी २-३ दुकानं होती . खूप इच्छा झाली , पण त्रास होईल (मागच्या ट्रेक चा अनुभव) म्हणून मी टाळलं. वाटेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमललेली दिसली . काही पांढरी तर काही जांभळी .





















हळू हळू वरती चढत शेवटी मी पोहोचले , पाय अतिशय दुखत होते . पण वरती पोहोचल्यावर सगळं विसरले . कळसुबाई आपण चढलो याचाच आनंद खूप झाला.  आजूबाजूला असणारे पावसाचे ढग त्यामुळे फारसं काही दिसत नव्हतं  . आपण पावसाच्या ढगात आहोत असा काहीसं मनाला वाटत होतं. वरती वारा मात्र भरपूर होता ,जोडीला पाउस आणि थंडी होतीच . आम्ही फार वेळ थांबू शकलो नाही . लगेच उतरायला सुरवात केली . आता मात्र परीक्षा होती . वर चढताना जाणवलं नाही पण उतरताना मात्र अन्तर खूप असल्याची जाणीव झाली. त्यातच सतत पाउस पडल्यामुळे परतीचा रस्ता निसरडा झाल्याची शक्यता खूप होती. हळू हळू उतरायला सुरवात केली . पाय मात्र आता जाम बोलायला लागले होते . प्रत्येक पाउल जड झालं होतं . त्यात सुद्धा शिड्या बर्या वाटत होत्या उतरताना , पण दगडांवरून उतरताना मात्र हालत वाईट होत होती . सगळीकडे निसरडं झाल्यामुळे खूप जपून उतरावं लागत होतं . आमच्या ग्रुप मधल्या एका मुलीच्या बुटाच सोल निघालं , तिला चालताना जाम त्रास होत होता. १-२ जण फ्लोटर घालून आले होते , त्यांचे पाय घसरत होते . बरीच कसरत चालू होती . मला मात्र आपण खालीपर्यंत कधी पोहोचणारच नाही असं काहीसं वाटायला लागलं होतं . अजून थोडा पुढे, अजून थोडा पुढे करत करत शेवटी मी खाली उतरले. येताना पाय आणि बूट इतके मातीने बरबटले होते कि ओढ्यातून तशीच चालत गेले , खरंतर बूट काढायची ताकदच राहिली नव्हती . पण ती खूप मोठी चूक झाली. पाणी खूप थंड होतं . बुटात पूर्ण पाणी  भरलं आणि पाय एकदम गार झाले . आमच्यातले काहीजण तिथ जवळच असणारा धबधबा बघायला गेले .मी मात्र तशीच चालत बस पर्यंत आले . आणि बूट काढून बसमध्ये ठेवले . बसमध्ये बसल्यावर  मात्र खूप बऱ वाटलं . एक लढाई जिंकल्याच समाधान मिळालं .

सगळे परत आल्यावर आम्ही जेवलो . जेवायला बटाट्याची भाजी , उसळ, चपाती , भात आणि वरण असा मेनू होता . जाम भूक लागली होती , त्यामुळे जेवण मस्त वाटलं एकदम . जेवण झाल्यावर आम्ही परत निघालो. बस मध्ये आता सगळेच डुलक्या काढायला लागले. साधारण ७ वाजता मी टोल नाक्याला पोहोचले . उपेंद्र आला होता घ्यायला . घरी येवून एकदा अंघोळ करून मेतकुट भात खाल्यावर मात्र मला एकदम सगळ्याच सार्थक झाल्यासारख वाटल  . पाय मात्र अजूनही खूप दुखत आहेत , पण एक समाधान पण आहे.

Saturday, 2 August 2014

मैत्री , मनान स्वीकारलेलं नात - मेधा

माझी दुसरी अत्यंत जवळची मैत्रीण म्हणजे मेधा . माझ्या घराजवळ रहायची पण आमची मैत्री व्हायला ११ वी उजाडायला लागली . आमची ओळख झाली ती एका कॉमन मैत्रिणीमुळे. आणि नंतर आम्हीच जास्त जवळच्या मैत्रिणी झालो . दोघी पण भांडायचो भरपूर , पण भांडलो नाही तर दिवस सुनासुना जायचा . तिला आणि मला , दोघींना पण भटकायची सवय खूप त्यामुळे एकत्र फिरायचो पण भरपूर . अर्थात, आमची जोडी लौरेल औंड हार्डी ची होती . ती एकदम नाजूक चणीची आणि बारीक होती पण काटक खूप .खुप रसिक, खरतर तिच्यामुळे मी पार्लर ला जायला लागले . कॉलेज मध्ये आमचे ग्रुप वेगवेगळे होते , पण जाण येण एकत्र आणि राहणं जवळं त्यामुळे आमच्यात कधी अंतर पडल नाही .
first year पासून आमच कॉलेज सकाळी असायचं. मग काय ? आम्ही लवकर उठून , तयार होवून एकत्रच जायचो. कॉलेज संपल कि एकत्रच परत यायचो. दुपारी माझ्या घरी कुणी असायचं नाही , मग मेधा थोडा वेळ येवून बसायची आणि मग झोपायला जायची . तिचे बाबा काही बाबतीत खूप शिस्तीचे होते , जसं दुपारी तिने थोडा वेळ झोपलं पाहिजेच हा दंडक होता त्यांच्यात . कधी कधी संध्याकाळचा स्वंपाक पण असायचा तिच्याकडे. तिची दुपारची झोप झाली कि आम्ही परत भटकून येत असु .
असा करता करता आमचं कॉलेज पूर्ण झालं , आणि दोघींना पण MBA करायचे वेध लागले . फक्त थोड्या उशिरा जाग्या झाल्यामुळे त्या वर्षीची CET झाली होती. मग मी कॉम्पुटर क्लास ला अडमिशन घेतली . माझा क्लास सकाळी असायचा. आम्ही आमचा दिनक्रम ठरवला .
सकाळी लवकर उठून आम्ही रंकाळ्यावर फिरायला जायचो. ५.४५ ला घरातून निघायचो , शालिनी पॅलेस समोर थोडावेळ बसायचो आणि मग परत यायचो . आवरून मी क्लास ला जायचे आणि साधारण ११-११. ३० पर्यंत परत यायचे . मगं ती आणि मी आम्ही भर उन्हाच्या बाजारात जायचो , रोज काही न काही आणायचं असायचं . बंर , मंडई घरापासून अगदी जवळ  असल्यामुळे कुणी नको पण म्हणायचे नाही . कधी कलिंगड आण तर कधी सीताफळ आण असा काही न काही कायम सुरु असायचचं . ते घेवून आम्ही माझ्या घरी यायचो आणि मनसोक्त हादडायचो. कधी कधी कलिंगडाच्या सोबतीला भजी वगैरे पण तळली जायची . धमाल असायची . संध्याकाळी आम्ही परत बाहेर पडायचो , कधी रंकाळा तर कधी भवानी मंडप असा फेरा मारायचो . तिथे दोघींमध्ये एक प्लेट पाणीपुरी नाहीतर अर्धी पावभाजी , नाहीतर सँडवीच, नाहीतर अर्धी चाट खायचोच , अगदी रोज .
   असच माझं एकदा शिवाजी विद्यापीठ मध्ये काम होतं म्हणून मी मेधा ला विचारलं तर ती येते म्हणाली . त्यावेळी माझ्याकडे लुना होती . आम्ही लुना घेवून जायचं ठरवलं . आणि विद्यापीठ परिसरात तिला लुना चालवायला द्यायचं मी कबुल केलं. काम संपवून परत येताना तिच्या हातात लुना होती,काय डोक्यातं आलं तिच्या देव जाणे . तिने एकदम भरधाव सोडली लुना , आणि एका वळणाला तिला ती आवरता न आल्यामुळे आम्ही दोघींनी साफ लोटांगण घातलं . त्यात तिचा पाय पायडलच्या मागे अडकला , भरपूर लागलं तिला . आमच्या सुदैवाने मागून काही मुलं येत होती , त्यांनी मदत केली . लुनाचा हेडलाईट तुटला होता आणि चाक पण वाकडं झालं होतं . परत येताना धाबे दणाणले होते आमचे , घरी काय सांगायचं ? अवतारावरून आम्ही पडलो होतो हे लगेच कळत होतं . शेवटी माझ्या घरी थोडं थांबून तिने घरी जायचं ठरवलं . माझ्या घरी लुना माझ्या हातात होती हे सांगायचं ठरलं आणि तिच्या घरी तिच्या . यामुळे बसणारा ओरडा कमी झाला असता आणि एकमेंकीना भेटण्यापासून  कुणी थांबवलं नसतं . घरी मी बाबांना सांगितलं तसं आणि हे पण सांगितलं कि लुना च हंड्ल वरखाली होत होतं म्हणून असं झालं. बाबा त्यावर केदार ला ओरडले . मला वाईट वाटलं पण काही इलाज नव्हता. मग आम्ही डॉक्टर कडे गेलो दोघी . जखमा बऱ्या व्हायला वेळ लागला पण आम्ही मात्र तशाच एकत्र राहिलो .
 पुढे २-३ महिन्यातचं तीच लग्न ठरलं आणि मग आमचं भटकण थोडं जास्त झालं. तिची आजी ओरडायची आम्हाला पण त्याने आम्हीला काही फरक पडा़चा नाही. बघता बघता लग्न झालं आणि ती सांगलीला गेली . आणि पूर्णपणे संसारात गुरफटली .
अजूनही आमच बोलणं होतं पण भेटणं मात्र खूप कमी झालं आहे , अर्थात यावर ती भरपूर शिव्या खाते कारण सध्यातरी तिच्याकडे आम्हा मैत्रिणींसाठी वेळ नसतो. अर्थात यात जमेची एकाच बाब म्हणजे तिची मुलगी आणि माझी मुलगी पण मैत्रिणी आहेत , खूप जवळच्या नाहीत पण एकमेकी बरोबर पूर्ण दिवस काढू शकतात असा तर नक्कीच आहेत .

Friday, 1 August 2014

मैत्री , मनान स्वीकारलेलं नात - पची

परवा ३ ऑगस्ट , मैत्री दिवस (friendship day ). असा दिवस जो आजकाल साजरा करायला बरेचजण धडपडतात. पण खरं तर हे नातं रोजच साजरं होतं , त्यासाठी विशिष्ट अशा दिवसाची काहीच गरज नसावी , असा मला वाटतं . सगळ्या नात्यांपेक्षा जास्त आपुलकीने जपलेले असा एकाच नातं असतं . मगं ते नवरा - बायकोमधील असो , आई -मुलांमधील मधील असो किंवा वडील-मुलांमधील असो.
अर्थात, या निमित्ताने मला माझ्या मित्र मैत्रिणींबद्दल काही न काही आठवत राहत , कडू गोड सगळंच . माझी मैत्री या शब्दाची ओळखच झाली ती एका मैत्रिणीमुळे.
साधारण ३-४थी मध्ये असू आम्ही तेव्हा . शनिवार असल्यामुळे आई लवकर घरी आली होती . दळप करायचं होता म्हणून ती आणि तिच्यामागे लागून मी , आम्ही गिरणी मध्ये गेलो . गिरणी घरापासून अगदी जवळ होती. अंगात शाळेचाच ड्रेस होता अजून. तिथे अजून एक माझ्यासारखीच मुलगी आणि तिची आई आल्या होत्या . तिच्या अंगावर पण माझ्याच शाळेचा युनिफॉर्म होता . अंगावर शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे त्या दोघींनी एकमेकींशी बोलायला सुरवात केली (म्हणजे आमच्या आयांनी ). मग आम्ही पण बोलायला लागलो. दोघी पण एकाच वयाच्या होतो पण शाळेत कधी बोललो न्हवतो. पण इथे मात्र बडबडायला सुरवात केली . मग ती घरी आली आणि येतंच राहिली . आमची घट्ट मैत्री झाली . भाऊ आणि माझा भाऊ पण एकाच वयाचे होते पण त्यांच्यात मात्र फारशी मैत्री जमली नाही . पण बरेचदा आम्ही चौघे एकत्र येवून धुमाकूळ घालायचो. तीच नाव प्रतिमा कुलकर्णी (पची). माझी सगळ्यात पहिली मैत्रीण. तिच्या आजीचा बंगला होता शिवाजी पार्क मध्ये , मी बरेचदा तिच्याबरोबर जायचे. तिच्याबरोबर असं जाणं खूप आवडायचं मला.  पुढे ५ वी ला आल्यावर मात्र आमच्या तुकड्या बदलल्या. ती वेगळ्या तुकडीत आणि मी वेगळ्या . दोघींना पण नवीन मैत्रिणी मिळाल्या . बरेचदा पाची ची आठवण यायची पण तोपर्यंत तिच्या पण मैत्रिणी झाल्या होत्याच. हळू हळू अंतर पडत गेलं. आधी नुसत्या बडबडणार्या आम्ही आता मात्र फारच कमी बोलत होतो . पुढे एकाच कॉलेज मध्ये असूनपण फारस बोलन व्हायचं नाहीच . त्यातच काका गेल्याच कळल आणि धक्काच बसला . तिच्या समोर पण जाऊ नये असा वाटत होतं ( किती मूर्खपणा होता तो , ते आता कळतंय ). मी आणि आई जाउन काकुना भेटून आलो . आमच B. Com. संपल आणि पची च लग्न झालं . अर्थात लग्नाला गेले होते मी पण एका लांबच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाव तशी .(काय होता एवढ मनात माझ्या ? कशाचा इगो होता? अजूनही लक्षात येत नाही ). ती त्याच दिवशी नागपूर ला जाणार होती . तिला निरोप द्यायला मी गेले होते , रेल्वे स्टेशन वर. तीच शेवटची भेट. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी केदार चा फोन आला मला , तुला "कृतिका उदर " म्हणून एक friendship request आली आहे ना FB वर ? ती पची आहे . मी तीनताड उडाले . पची ?? कृतिका उदर ?? काही संदर्भाच लागेना . मी request मान्य केली . मग आम्ही बोलायला लागलो. तिने तीच नावच बदललं होतं कृतिका म्हणून आणि अचानक तिचा फोन आला मला . खूप भरभरून बोलली, लग्नानंतर काय काय झालं ते , काका - काकुंबद्दल , भावड्या (तिचा भाऊ) बद्दल , लहानपणाच्या सगळ्या आठवणींबद्दल,  त्यावेळी ५वी मध्ये आम्ही ज्या पद्धतीने वेगळ्या झालो होतो ते खूप लागल होत तीला . कशी आणि काय समजावणार होते तिला ? ते वय इतक कळण्याच नव्हत, एवढंच कसबस बोलू शकले. ती मात्र मला खूप लागल होतं ते सांगत राहिली आणि खूप वर्षांनी जाणवलं आपण पण तेवढाच प्रेम केलं होतं तिच्यावर कारण तिच्यानंतर तशी मैत्री कुणाशी झालीच नाही.  त्या नकळत्या वयातल्या मैत्रीने खूप काही शिकवलं होतं जे आता जाणवत आहे. आता मात्र तिला अंतर द्यायचं नाही हे पक्क ठरवलं आहे . तिच्यामुळे मला मैत्री कळली , मैत्रीमधलं प्रेम कळल. सध्या ती फिनलंड ला राहते . त्यामुळे अजून तरी आमची भेट नाही . पण लवकरच भेटू आम्ही. 

Monday, 28 July 2014

श्रावण सोमवार

आज श्रावणातील पहिला सोमवार . उपवासाचा सोमवार , असा म्हणायचं कारण कि माझ्या लक्षात तो तसाच आहे . आता मी उपवास वगैरे काही करत नाही पण श्रावणातील सोमवार म्हटलं कि मला हेच आठवतं .

शाळेत असताना मला श्रावण सोमवार खूप आवडायचे. सकाळपासूनच काहीतरी वेगळ आहे हे जाणवत राहायचं . खूप छान वाटायचं , उगाचच. आईला जेवण बनवायचं नसल्यामुळे तर जास्तच छान वाटायचं . तिच्या भोवती भोवती करत राहायचे मग मी. ती पण  ओरडायची नाही अशा वेळी.  आम्ही कर्नाटकी ब्राह्मण म्हणजे सीमेवरचे , आमच्यात उपवासाला हळद न घालता केलेलं दडपे पोहे , शिरा किंवा कांदा आणि हळद न घालता केलेले उप्पीट चालतं. त्यामुळे त्यादिवशी सकाळी नेहमीच्या पोळी - भाजी ऐवजी असा काहीतरी असायचं आणि बरोबर साबुदाण्याची खिचडी वगैरे . दुपारी शाळेत खायला पण हेच असायचं . श्रावण सोमवारी आमची शाळा लवकर सुटायची , ४ वाजता .शाळेतून परत येताना घराघरातून येणाऱ्या वासानी आधीच खूप भूक लागलेली असायची. कधी एकदा घरी जाऊन जेवेन असा होवून जायचं .   त्या दिवशी आई-बाबा पण लवकर यायचे . आई आल्या आल्या स्वयंपाकाला लागायची . उपवास सोडायचा म्हणून थोडसं काहीतरी गोड बनवलेलं असायचं . बाबा देवाची पूजा करून नैवेद्य दाखवायचे आणि मग आम्ही जेवायचो . अगदी ६-६.३० वाजता जेवण होवून पण जायचं आमचं . मग आम्ही दंगा करायला मोकळे होवून जायचो . जेवण लवकर झाल्यामुळे झोपेपर्यंत परत भूक लागायची . पण उपवास सोडला आहे ना ? मग आता काही खायचं नाही असा आई दटावायची, पण अगदी झोपताना थोडंस दुध द्यायची.
आजही श्रावण सोमवार येतोच पण आता तो वेगळा वाटत नाही . रोजच्या सारखाच एक दिवस , नेहमीसारखाच आठवड्याची सुरवात करणारा दिवस. आजच्यासारख कधीतरी जाणवत अरे तसा सोमवार हवा , वाट बघायला लावणारा , उपवासाला पोहे आणि शिरा खायची इच्छा असणारा. लवकर घरी येवून जेवण करायला लावणारा , असा श्रावण सोमवार , हरवलेला .

Wednesday, 16 July 2014

लहानपणीची आठवण -3

लहानपणी एखादी गोष्ट जरं  मनात ठसली असेल तर ती कायम मनात तशीच रहाते. तसचं काहीसं माझं झालं आहे ते मुंबई आणि पुण्याबद्दल .
मी ६ वीच्या  मे महिन्याची गोष्ट . माझी मावशी बदलापूर ला राहते ती आणि माझी सगळ्यात लहान मावस बहिण, जी माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी आहे , ती आली होती. परत जाताना सहज विषय निघाला आणि मी पण त्यांच्याबरोबर जायचं ठरलं . आईने परवानगी दिली , एका आठवड्याची . खूप खुश झाले मी . मुंबैबार्हेर राहणाऱ्या सगळ्यांसाठी ठाणे आणि उपनगरं वगैरे सगळ मुंबई मधेच येतं . त्यामुळे आपण मुंबई ला जाणार याचाच आनंद खूप झाला मला. नाना , मावशीचे मिस्टर आम्हाला घ्यायला आले होते , ते रेल्वे मध्ये होते त्यामुळे तिकीटाची फारशी गडबड नं होता नाना ,मावशी , स्वाती आणि मी आम्ही निघालो . पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास आणि तो पण रेल्वे ने म्हणून खूप उत्साहात होते मी . बाबांबरोबर प्रत्येक सुट्टीत बेळगावला जरी जात असले तरी सगळ प्रवास लाल डब्याने व्हायचा, त्यामुळे रेल्वे च आकर्षण खूप होतं . 
मावशी बदलापूर ला राहत असल्यामुळे आम्ही कल्याण ला उतरून बदलापूर ची लोकल पकडली . माझ्यासाठी सगळाच नवीन , त्यामुळं आधी काही कळलंच नाही . 
आम्हाला सवय , कोल्हापूर ला बस ने उतरलं कि सरळ रिक्षा करायची आणि १५ मिनिटांत घरी . पण इथे परत दुसरी गाडी पकडायची म्हणजे सगळचं वेगळं . शेवटी बदलापूर स्टेशन ला रिक्षा पकडून आम्ही घरी आलो . आणि सगळ्यात आधी जाणवला तो इथला उन्हाळा . एवढा उन्हाळा या आधी मी कधी बघितलाच नव्हता आणि लोकांच फलट मध्ये रहाणं पण . कोल्हापूर मध्ये तेव्हा फळात संस्कृती रुळली नव्हती अजून.
असो , एवढ्या उकाड्याची सवय नसल्यामुळे माझी अगदी तगमग व्हायची मगं मी आणि माझ्या  बहिणीने एक उपाय शोधून काढला . आम्ही बाथरूम मध्ये पाणी भरायचो . पाणी जिथून बाहेर जायचं तिथे कपड्याचे गोळे कोंबून ठेवायचे आणि त्या पाण्यामध्ये मस्ती करत राहायचो . अगदी १-२ दिवसच केला असेल असा , कारण , तिसर्या दिवशी खालच्या मजल्यावरच्या फळात चे मालक आले आणि त्यांनी मावशी कडे तक्रार केली कि त्यांच्या बाथरूम मध्ये पाणी गळत आहे , मगं काय , मावशी बरीच ओरडली आणि आमचं खेळण बंद झालं . मग आम्ही संध्याकाळी सायकल चालवायला जाऊ लागलो . मावशी २ रु. द्यायची . त्यावेळी भाड्याने १रु मध्ये अर्धा का एक तास मिळायची सायकल. १-२ दिवस सायकल चालवली मग स्वाती म्हणाली आपण पाणीपुरी खाऊया . मी म्हटलं मावशी ओरडेल ना गं . तर ती म्हणाली आपण सांगायलाच नको . मग काय , आम्ही ते २ रु घेवुन पाणीपुरी खाल्ली . पण रात्री जेवण जाईना . मावशीला वाटल पोटाच काहीतरी बिघडलं असेल . दुसर्या दिवशी परत तेच . माग मात्र मावशीला संशय आला . तिने रात्री विचारलं तसा मी सत्याचा अवतार असल्यामुळे मावशीला सांगून टाकलं आणि मग मावशी स्वातीला जे ओरडली , कि ज्याच नाव ते. झालं , स्वाती खूप चिडली माझ्यावर , बोललीच नाही मग माझ्याशी . मला कळेना आपलं काय चुकलं ते ? खरंतर माझा परत यायचा दिवस जवळ येत चालला होता  आणि नानांनी एक दिवस सांगितलं कि आपण उद्या मुंबई बघायला जाणार आहोत. मी खूप खुश झाले , काय काय सांगितलं त्यांनी समुद्र , गेट वे ऑफ इंडिया , म्हातारीचा बूट , मत्स्यालय वगैरे , वगैरे . 
दुसर्या दिवशी लवकर उठून मावशीने जेवण तयार करून बरोबर घेतलं आणि आम्ही सगळे बदलापूर स्टेशन कडे निघालो . व्ही टी च्या लोकल मध्ये मावशीबरोबर मी आणि स्वाती चढलो . रविवार चा दिवस असल्यामुळे ट्रेन ला गर्दी कमी होती. आम्हाला बसायला जागा मिळाली . मी तिसर्या जागी बसले होते . जसा आम्ही दादर ला पोहीचालो तशी डब्यातली गर्दी वाढली , मावशी माझ्या समोरच्या बाकावर बसली होती . तीच लक्ष होता माझ्याकडे . माझ्या शेजारी एक बाई येवून बसली आणि मला आत मध्ये ढकलायला लागली मला अगदी नकोस होवून गेलं . मी मावशीकडे बघितलं तर ती ने डोळ्यानीच सांगितलं कि तू हळूच ढकल तिला . मग काय, मी पण हातच कोपर रुतवलं त्या बाईच्या हातामध्ये . तिला बहुतेक ते लागल असाव , तशी उठून मोथाने बडबडायला लागली , कशी लोक असतात बघा , हि बाई (मावशीकडे बोट दाखवून ) या मुलीला सांगते ढकल  तिला , बैस बाई बैस . ती बाई बराच वेळ बडबड करत राहिली . मला जाम भीती वाटत होती . मी मावशीकडे हळूच बघितलं तर मावशीने लक्षच नाहीये असा दाखवलं माग मी पण दुर्लक्ष केलं . गाडी पुढे धावतचं होती. आणि मावशीने खिडकीजवळ बोलावून समोर बोट दाखवून सांगितलं , बघ, आपण आता मुंबई मध्ये आलो , उतरायचं आहे आता . आणि मला अजूनही आठवतात त्या स्टेशन च्या बाहेर असणाऱ्या चाळी . माझ्यासाठी मुंबई ची तीच पहिली ओळख ठरली . अजूनही त्या माझ्या डोळ्यासमोर तशाच दिसतात . 
माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती . आम्ही व्ही .टी . ला उतरलो . नानांनी विचारलं आपण आता साध्या बस ने जायचं कि डबल डेकर ने ? "डबल डेकर " मी आणि स्वाती एका सुरात ओरडलो . मग आम्ही डबल डेकर च्या वरच्या मजल्यावर बसून जाताना रस्त्यावरची लोकं आणि दुकान सगळ छोट वाटत होतं. आजूबाजूच्या त्या इमारती मी अगदी डोळे मोठे करून बघत होते . आपण कुठेतरी दुसर्या देशात आलो आहोत असा वाटत होता मला.  आणि आम्ही गेट वे ला पोहोचलो    माझ्या आयुष्यात पहिल्यांदा समुद्र बघितला मी . डोळे विस्फारून बघतच राहिले . एवढ अफाट पाणी ! आणि अगदी निळाशार नसाल तरी निळसर पाणी . मला त्याच्या प्रेमात पडायला वेळ लागला नाही. नानांनी सांगितलं आपण इथे जेट्टी ने फिरून येवू. मला काहीच कळलं नाही . पण जेव्हा आम्ही बोटीत बसायला लागलो तेव्हा कळलं जेट्टी म्हणजे बोट. आणि आपल्याला बोट लागते हे पण . 
तिथून आम्ही गिरगाव चौपाटी वर गेलो. आणि खऱ्या अर्थाने मी समुद्र बघितला . मी आणि स्वाती समुद्राच्या पाण्यामध्ये बराच वेळ खेळत राहिलो . खूप मज्जा आली . ते खारं पाणी तोंडात पण गेलं आणि पाण्याची चव कळली . माझ्यासाठी हे सगळ स्वप्नवत होतं . आपण कधी समुद्र बघू असा मला वाटल पण नव्हतं . तिथून मग तारापोरवाला मत्सालय बघायला गेलो , एवढे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मी पहिल्यांदाच बघितले . हरकून गेले अगदी . तिथून आम्ही टक्सी ने निघालो . पहिल्यांदा मी टक्सी मध्ये बसत होते . जाताना आजूबाजूच्या इमारती खूप उंच उंच वाटत होत्या . कायम वाडे आणि बसकी घर पाहणाऱ्या मला त्या इमारती म्हणजे काहीतरी वेगळंच वाटत होतं. आणि आम्ही म्हातारीच्या बूटापाशी पोहोचलो , मला तो बूट इतका आवडला कि काही बोलायची सोय नाही. पण आधी जेवू आणि मग खेळ असा नानांनी सांगितलं . म्हणून मग आधी जेवलो . म्हातारीच्या बुटावर चढताना मज्जा आली. बराच वेळ खेळत राहिलो आम्ही.  नानांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग आम्ही परत यायला निघालो . खरतर बरीच दमले होते . परत येताना मी आणि स्वाती मावशीच्या मांडीवर डोक ठेवून झोपून गेलो . आणि दोनच दिवसांनी मी आणि मावशी कोल्हापूर ला परत आलो. परत आल्यावर मात्र तिथल्या सगळया गोष्टी सांगून आई च खूप डोकं खाल्लं होतं मी . 
माझ्या आठवणीत मुंबई कायम हि अशीच राहिली .