Wednesday, 14 May 2014

उन्हाळा हवाहवासा

आता ठरवलं आहे रोज काहीतरी लिहायाचं. आपल्या आजूबाजूला इतकं काही घडत असतं कि त्यावर बोलण्यासारख खूप असतं .व्यक्त होणं महत्वाच. आपल्या नजरेन जे दिसतं ते सगळ्यांना तसचं दिसावं  यासाठी धडपड ही.
आपण आपल्या रोजच्या जगण्यात इतके गुंतून गेलो आहोत कि या उन्हाळ्यात दिलेल निसर्गाचं देण पण बघायला वेळ नाही आपल्याकडे. मे महिन्याच्या उकाड्याला नाव ठेवणारे आपण आजूबाजूला फुललेला निसर्ग बघत पण नाही. अतिशय सुंदर फुललेला लाल-पिवळा गुलमोहोर, पिवळा बहावा , जांभळा फर्न ट्री , हिरवा-पिवळा चाफा, पांढरा-गुलाबी चाफा, कवठी चाफा , आफ्रीकन ट्युलीप ट्री ,पांगिरा, पळस, सारंगा अजून बरेच सारे, आणि हे सगळे कमी काय म्हणून कुणाच्या तरी बाल्कनी मधून नाहीतर खिडकीमधून डोकावणारे गुलाब, मेफ्लोवर , लिली, मधुमालती, कामिनी, मोगरा, मोठ्या रस्त्यंावर मधोमध लावलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या बोगनवेली, .











हे सगळ कमी काय म्हणून तो आपली जीभ पण सुखावतो. आंब्याबरोबर जांभूळ, करवंद , विलायती चिंचा सारखी मेजवानी पण देतो. हा सगळा रानमेवा अतिशय चविष्ट लागतो. याच उन्हाळ्याच्या सुरवातीला झाड नवीन साज चढवून उभी असतात. 
इतकं सगळं हा उन्हाळा आपल्यावर उधळत असताना आपण मात्र हाश्श हुश्श करत त्याला नाव ठेवत असतो. आपल्या आयुष्यात येणारा उन्हाळा हा असा विविधतेने नटलेला येतो आणि जाणीव करून देतो , आजूबाजूला उन्हाच्या गरम झळा असल्या तरी तो सुंदर आहे, निसर्गाच्या सौन्दर्याची उधळण या काळात पण असते. आणि शरीराला जाणवणारा उकाडा डोळ्यांना आणि जिभेला सुखावणारा नक्कीच असतो. 

संध्याकाळची आठवण

मध्ये कधीतरी बरं वाटत नाही म्हणून घरीच थांबले होते. दुपारी थोडा बरं वाटायला लागलं आणि मग ४-४.३० वाजता बाल्कनी मधल्या झाडांना पाणी घातलं. पाणी घातलं आणि मंन बघता बघता भूतकाळात शिरलं .
आमच जुनं घर आठवलं, दोन्ही बाजूला दोन दोन खोल्या आणि मध्ये अंगण. खूप आधी , म्हणजे मी साधारण ४-५ वीत असेपर्यंत आमच्या अंगणात पारिजात होता. पेरूची दोन झाडं होती आणि मग भिंतीना लागून झाडांच्या कुंड्या होत्या. काही शोभेची झाडं तर काही फुलांची आणि जमिनीत लावलेल्या पिवळ्या फुलांचा वेल होता. चारही खोल्यांची दार अंगणात उघडायची. आणि मग एक मुख्य दरवाजा होता, जो बोळात उघडायचा. घर बंदिस्त होता आमचं. एका बाजूला बोळात उघडणारा दरवाजा तर दुसर्या बाजूला भिंत. घराचा आकार चौकोनी होता.
एका पावसाळी रात्री एकदम कड्कड असा आवाज झाला , कुठेतरी काहीतरी पडलं असावं, असा विचार करून आम्ही गप्प बसलो. आणि सकाळी उठून बघतो तो काय, पारिजातक पडला होता . त्याच्या पुढे कपडे वळत घालायचा एक लोखंडी बार होता म्हणून फक्त तो पुर्ण उन्मळून पडला नाही. त्याच्या आधारावर तो तसाच रहिला. पुढे बरीच वर्ष तो तसाच होता. त्याच्या खोबणीत दरवर्षी सुरवांटांचा डेरा पडायचा , मोठे मोठे बोटा एवढे जाड सुरवंट, बघून भीती पण वाटायची आणि किळस पण यायची.
झाडांवरचे पेरू एकदम मोठे आणि चवीला गोड असायचे. आम्ही त्याला 'खोबरी' पेरू म्हणायचो. हळू हळू त्या झाडांवर भरपूर माकड यायला लागली. आणी कौल फुटायचा त्रास सुरु झाला. शेवटी , बाबांनी पेरूची झाडं तोडायची ठरवली आणि मग पडता पडता वाचलेला पारिजात पण निघून गेला . पण या सगळ्यांत माझ्या वेली मात्र वाचल्या. सोपा आणि त्याच्या समोरच्या खोलीच्या छपरावर पसरल्या. त्यामुळे अंगणात १२ महिने सावली राहायला लागली.
या सगळ्या झाडांना पाणी घालण हे काम माझ्याकडे असायचं. रोज संध्याकाळी ४वाजता पाणी यायचं . नळाला पाण्याची पाईप लावून पाणी घालायचे मी. माझ्यासाठी हे पाणी घाळण एखाद्या सोहोळ्यापेक्षा कमी नसायचं.  वेलींवर भरपूर पाणी उडवून , त्याखाली जाउन उभी रहायाचे मी. त्या वेळी वेलींवरून पडणारे थेंब तोंडावर झेलायला मज्जा यायची. मस्त वाटत रहायच. ओलं अंगण , वरून ठिबकणार पाणी आणि संध्याकाळच प्रसन्न वातवरण , अहाहा, त्याची बातच काही और होती.
आज परत एकदा सगळ फिरून आले, वेलींखाली जाऊन उभी  राहिले,पाण्याचे थेंब झेलले आणि फ्रेश झाले. 

Monday, 12 May 2014

मे महिन्याच्या आठवणी

शर्वरीची सुट्टी सुरु झाली कि मला माझी सुट्टी हटकून आठवते . कधी एकदा परीक्षा संपतेय असा होवून जायचं मला. शेवटच्या पेपर चा अभ्यास कधीच व्हायचा नाही माझा. आणि जशी परीक्षा संपायची तशी एकदम खुश होवून जायची मी. फारसे प्लान नसायचेच. म्हणजे आताच्या पिढीचे प्लानिंग बघितली कि वाटत , बापरे! किती हि तयारी सुट्टीची!पण आमच्यावेळी सगळ बाबांच्यावरती अवलंबून असायच. वात बघत असायचो बाबा कधी एकदा बेळगाव ला घेवून जातात याची. आम्ही सगळे एकदम जायचो, म्हणजे मी, केदार , मोठे काका-काकू, त्यांची ४ मुलं. धमाल असायाची.
  बेळगाव ला ४नंबर काका राहायचा माझा. प्रत्येक मे महिन्यात त्याच्याकडे दत्तउत्सव असायचा. अजूनजुचे खूप लोक यायचे . खूप धमाल असयची. पंगती वर पंगती उठायच्या. आम्ही सगळे खूप मस्ती करायचो.
बेळगाव ला जाण्याची वाट बघण्याच कारण अजून एक होत, बाबा संकेश्वर ला एस. टी कॅन्टीन चा मेदुवडा आणि चटणी आणायचे. गाडी सुरु झाली कि कधी एकदा संकेश्वर येत याची आम्ही वात बघयचो. आम्हा सगळ्या भावंडांचा आवडता पदार्थ होता तो. आम्ही सगळे मोठ्या चवीने खायचो. अजूनही त्याची चव आठवते मला.
बेळगाव ला काका त्यावेळी अनगोळ माळ ला राहायचा. त्यानंतर त्याने ३-४ घरे बदलली पण माझ्या जास्त लक्षात राहिलेलं त्याच घर म्हणजे अनगोळ माळा वरचच. ४खोल्या , मागे अंगण आणि पुढे अंगण. पुढच अंगण भलामोठ होतं. तिथे मंडप घातलेला असयचा. आम्ही सगळी भावंडे तिथेच झोपायचो. आम्हा सगळ्यात भर पडायची ती म्हणजे माझ्या दोन आत्यांच्या मुलींची. आम्ही सगळे जवळ जवळ सारख्याच वयाचे आहोत, त्यामुळ दंगा धुडगूस तर बघूच नये, इतका असयचा. आणि त्यात भर म्हणजे जवळ राहण्या-या  मुलांची .सकाळी ६.३०-७ ला सुरु होणारा दिवस संध्याकाळी देवाच्या आरतीने संपायचा. सगळ्या आरत्या मोठ्याने म्हणायची आमची स्पर्धा असयची. मोठ्यामोठ्याने टाळ वाजवत आम्ही आरत्या म्हणायचो, आणि मधेच कुणी चुकला तर फिदीफिदी हसायचो. माग कुणीतरी मोठ आमच्याकडे डोळे मोठे करून बघायचे. तेवढ्यापुरते शांत व्हायचो आम्ही आणि थोड्यावेळात परत सुरु… आरती झाली रे झाली कि प्रसाद वाटायला आम्ही सगळे पुढे, ३-४ प्रकारचे प्रसाद असायचे.
रात्रीची आरती झाली कि पंगती बसायच्या, फारशी भूक नसायची कारण दिवसभर काही ना काही सुरु असायचच. माग मंडपात अंथरूण पडायची . पण लगेच झोपली तर ती वानरसेना कसली?? कुणाच्या नकला, कुणाचा नाच, कुणाच्या गोष्टी, भेंड्या, भांडण असा सगळ साग्रसंगीत व्हायचं आणि माग आजी किंवा काकू ओरडली कि झोपायचो. 
 खरच, खूप सुंदर दिवस होते. मनमुक्त जगण्याचे दिवस. ते परत तर येणार नाहीत पण त्यांनी निर्माण केलेल्या आठवणी मात्र नेहमी बरोबर असतील. एका सुंदर बालपणीच्या आठवणी.


Monday, 5 May 2014

भिती

खुप इच्छा होतेय आज, एखाद्या शांत रोड वर मनसोक्त भटकाव. पण असा रोड कुठे मिळणार? सगळीकडे इतकी गर्दी आहे की काही विचारु नये. आणि जरी एखादा रोड असा शांत मिळाळा तरी तिथुन एकटं जायची भिती वाटते. इतक्या वेड्यावाकड्या गोष्टी एेकल्या आहेत की,असा रस्ता दिसला तरी एकटं जाण्याची हिम्मत नाही. किती असुरक्षित झाल आहे सगळ. लोकांची मानसिकता इतकी विकृत कशी झाली? आणि ती पण इतक्या अचानक?! बलात्कार, खुन हे तर रोजच्या जगण्याचा भाग झाल्यासारखे वाटतात आता. हे आत्ताच घडत असेल अस नाही , आिधपण घडत असणार. पण मागच्या २-४ वर्षात हे प्रकार एवढे वाढले आहेत की बोलायची सोय नाही. का आता मुलिंना बोलायला बळ मिळाळ आहे या सगळ्यांविरुध्द बोलायच? काहीही असल तरी पावलोपावली भिती वाटते एवढ़ खरं. कशाचीही शाश्वती नाही. कधी काय घडेल आणि काय कानावर पडेल याची भिती वाटतं रहाते सारखी. याला उपाय? सध्या काहीच नाही. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत शांत रोड वरुन एकट जाण्याची हिम्मत नाही ,एवढ़ खर.

Saturday, 12 October 2013

चारोळ्या

पौर्णिमेचा चंद्र हळुच चोरपावली येतो,
तुझ्या आठवणी हळुच कुशीत ठेवुन जातो.

पारीजात फुलला तुझी माझी स्वप्ने घेवुन,
त्याला कळलेच नाही, रात्र गेली अमावस्येची होवुन.


जन्म माझा तुझ्यासाठी
श्वास माझा तुझ्यासाठी
स्वप्न माझी तुझ्यासाठी
आणि तु,
तु मात्र तिच्यासाठी

आता कुठे तु कळतो आहेस,
त्या चंद्रासारखा तुही हट्टी आहेस,
दर पौर्णीमेला तुझ्या आठवणी घेवुन येतो,
आणि माझ कसं चुकलं हेच सांगत रहातो.

तुला चंद्राची प्रतिमा द्यावी कशी?
ते निदान पौर्णिमेला भेटतो तरी,
तुझ्या माझ्यातली अमावस्या मात्र सुरुच आहे

तुझ्या माझ्यातला अव्यक्त हुंकार,
तुझ्या माझ्यातल अव्यक्त प्रेम,
सांगता सांगता राहुन गेलेल,
समजता समजता न समजलेल.


तु तू न राहिलास,मी मी न राहिले
तुझ्या माझ्या नात्याचे रंग बदलले
अव्यक्त व्यथा, व्यक्त कथा
सगळ सगळच बदललं.

चंद्राला पाहिले की तुझा भास होतो,
तुला शोधण्याचा मला मोह होतो,
तुझ्या मोहाने तुला शोधते आहे
विसरते आहे अमावस्या सुरुच आहे.

तुझ्या हातामधे माझा हात
तुझ्यामधे गुंतलेलं माझ मन,
सांग कसं सोडाव सगळं?
माणुस तोडला तरी, नातं तोडावं कसं?