Wednesday, 11 June 2014

माझं कोल्हापूर

प्रजू च्या मुंजीनंतर परत येताना , परत एकदा काहीतरी माग ठेवून आल्याची जाणीव झाली. कळव्याला येवून आता ९-१० वर्ष झाली आहेत. पण अजूनही कोल्हापूर ची ओढ तशीच आहे. मधल्या काळात जायला न जमल्यामुळे ती कमी झाली असं उगाचच वाटत होतं. पण तसं काहीच नाहीये. ती ओढ , परत येतेनाच एकटेपण सगळं तसच आहे.
  कोल्हापूरची ओढ मला कायम वाटतं आली आहे. "माझं कोल्हापूर" आता बदलत चाललं आहे पण हे बदलण पण अपरिहार्य आहे. अंबाबाई ची महालक्ष्मी झाली आहे , आधी ज्या देवळातून जाताना कुणाची परवानगी लागत न्हवती तिथे आता दर्शन घेणार असाल तरच प्रवेश मिळतो, आणि दर्शनाला जाव तर लांबच लांब रांग असते. गेल्या ४-५ वर्षात मी फक्त मुखदर्शन घेतलं आहे.

मी शाळेत असताना कधीच रांगेत उभ रहाव लागल नहिये. देवळात आलो कि सरळ आत प्रवेश मिळायचा , अगदी नवरात्रीत सुद्धा. शाळा सुटली कि देवीच दर्शन घ्यायचं आणि मग घरी जायचं , हे अगदी शाळा B.Com. संपेपर्यंत सुरु होतं. अर्थात कॉलेज ला गेल्यावर रांगा सुरु झाल्याच होत्या पण आत्तासारखी परिस्थिती न्हवती.
अंबाबाईच्या देवाळाशेजारी  आमची शाळा आहे. "विद्यापीठ हायस्कुल ". घरापासून अगदी १० मिनिट चालत जाण्याच्या अंतरावर . साधारण ५वी ला गेल्यापासुन मी आणि केदार आम्ही दोघेच शाळेत जायला लागलो. तो ७वी मध्ये होता. वांगी बोळातून बाहेर महाद्वार रोड ला यायचं आणि मग तेथून अंबाबाई च्या देवळातून शाळेला जायचा आमचा शिरस्ता होता. अंबाबाई च्या देवळाच्या बाहेर आणि शाळेच्या बाहेर एक बाई गोळ्या , चिंचा , आवळे, ओली आवळासुपारी असं सगळं घेवून बसायची. कधीतरी घरातून मिळालेल्या चार आण्यात मनसोक्त खाता येईल असा मेवा यायचा . परवा सहज चौकशी केली तर ५-१० रुपयाच्या खाली काही मिळताच न्हवतं. पण चव मात्र तीच , तोंडाला पाणी सुटणारी.
शाळेच्या बाहेर , पटांगणातच बकरे सरांच एक दुकान होतं . साध्या फळकुटांनी बनलेलं. त्यांच्याकडे मिसळ मिळायची . पावाची (bread ) ची भाजी आणि त्यावर हरभर्याची रस्सा उसळ. मस्त तिखट असायची ती.आता तशी मिसळ कुठेच मिळात नाही.
अजून एक मोठा जाणवलेला बदल म्हणजे लोकांनी स्वत:च्या घराचं परिवर्तन यात्रेकरुंच्या निवासासाठी केल आहे . करूदेत बापडे , पण हा बदल इतका जास्त आहे कि, सगळीकडे असे यात्रेकरू निवास दृष्टीस पडत आहेत. अजून एक म्हणजे, रिक्शावाल्यांच्या तोंडची भाषा बदलत चालली आहे, काही वर्षापूर्वी जिथे अस्सल कोल्हापुरी भाषा ऐकू यायची तिथे आता "किधर जाना है ?" असा ऐकायला मिळतं.
तीच गोष्ट रंकाळ्याची. लहानपणीचा रंकाळा अजूनही आठवतो मला. स्वछ:, शालिनी पलेस पर्यंतच असणारा, रंकाळा. तिथे मी आणि माझी भावंड जायचो, जाताना भडंग, शेंगदाणे वगैरे घेवूनच जायचो. तिथल्या गवतात बसून कागदावर भडंग खायची मजा काही औरच होती. शालिनी पाय्लेस च्या समोरच्या बागेत जाण म्हणजे खूप लांब आल्यासारख वाटायचं. तिथे जाणं म्हणजे चैन होती. तिथे गाड्यावर मिळणारी पाव भाजी( हाफ प्लेट ) आणि आइसक्रीम खाल्ल कि दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटायचा. आता मात्र सगळं बदललं आहे, रंकाळा सुशोभित करण्याच्या नादात पाणी घाण होत चाललं आहे याकडे मात्र दुर्लक्ष होत चाललं आहे.



तरीही, काही गोष्टी अजूनही तशाच आहेत, शिवाजी पेठ , तिथली भाषा , रांगडेपण, लोकांमधली माणुसकी , मदतीला धावून जाणं, सगळ तसचं तर आहे. म्हणूनच माझ कोल्हापूर मला प्रिय आहे.
आणि म्हणूनच माझी ओढ पण तशीच आहे.



1 comment:

  1. सुंदर अस्सल कोल्हापूरी लेख. !!

    ReplyDelete